Students Stress: न झेपणारे उच्च शिक्षण मुलांवर लादले जातेय का? बुद्धीने ‘कुशाग्र’ असणारी युवापिढी मनाने कमकुवत झाली आहे का?

Bits Pilani student Death: बॉक्स ऑफिसवर भरपूर गल्ला जमविणाऱ्या ‘थ्री इडियट्स’ चित्रपटाने देशातील उच्च शिक्षण आणि विद्यार्थ्यांवरील अभ्यासाच्या ताणाविषयी वास्तवभान देण्याचा प्रयत्न केला.
Student stress
Higher education mental health IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

बॉक्स ऑफिसवर भरपूर गल्ला जमविणाऱ्या ‘थ्री इडियट्स’ चित्रपटाने देशातील उच्च शिक्षण आणि विद्यार्थ्यांवरील अभ्यासाच्या ताणाविषयी वास्तवभान देण्याचा प्रयत्न केला. सिनेमा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता शिक्षणप्रणालीतील उणिवा उघड करणारा सामाजिक आरसा ठरला.

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनक असून तेच चित्रपटाने वास्तव रूपात उलगडले. चित्रपटाला सोळा वर्षे उलटून गेली. मात्र, त्याच समस्या कायम आहेत. महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे महत्त्व फक्त गुण आणि क्रमांकावर आजही ठरते. अर्थात या संदर्भात मतमतांतरे जरूर आहेत. हा मुद्दा आठवण्याचे कारण म्हणजे दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेले सांकवाळ येथील ‘बिट्स पिलानी’ विद्यार्थ्यांच्या मृत्युमुळे चर्चेत आलेय.

गेल्या आठ महिन्यांत चार विद्यार्थ्यांच्‍या झालेल्या मृत्यूने निर्माण झालेले संशयाचे मळभ व्यवस्थापनाच्या मौनामुळे अधिक गडद बनले आहे. भारतातील खाजगी तांत्रिक शिक्षणाची दिशा ठरविण्यात ‘बिट्स पिलानी’ने मौलिक भूमिका बजावली आहे. जागतिक स्तरावरील शिक्षण आणि संशोधनाच्या बळावर या संस्थेची परंपरा आजही कायम आहे. हजारो विद्यार्थी नवी स्वप्न उराशी बाळगून ‘पिलानी’त दाखल होतात.

बिर्ला कुटुंबाच्या पुढाकारातून ६१ वर्षापूर्वी स्थापन झालेल्या संस्थेने देशात आधुनिक, लवचीक आणि उद्योगाभिमुख शिक्षणाची परंपरा रुजवली. गोवा, हैदराबाद आणि दुबई येथे कॅम्पसेस स्थापन करून संस्थेने जागतिक पातळीवर लौकिक मिळवला. आयआयटी-जेईई किंवा राज्यस्तरीय सीईटीवर अवलंबून न राहता ‘बिट्स’ने स्वतःचा स्वतंत्र प्रवेशमार्ग तयार केला. स्वतंत्र परीक्षा अत्यंत कठोर मानली जाते. परिणामी तेथे प्रवेश मिळवून येणारे विद्यार्थी हुशार. परंतु हे असामान्यत्व पेलता न आल्याने अनेकांनी जीवन संपल्याची उदाहरणे आहेत.

Student stress
Bits Pilani: आतापर्यंत 4 जीव गेले, अजून किती हवे? ‘बिट्स पिलानी’तील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काँग्रेस आक्रमक

‘बिट्स पिलानी’ कॅम्पस्मध्ये यापूर्वी तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामागील कारणमीमांसा खरे तर व्हायला हवी होती. आताही कुशाग्र जैन नामक २० वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू संशयाच्या घेऱ्यात आहे. तपासातून मूळ कारण समोर आल्यावर संशय फिटतील. पण, न झेपणारे उच्च शिक्षण मुलांवर लादले जातेय का? बुद्धीने ‘कुशाग्र’ असणारी युवा पिढी मनाने कमकुवत झाली आहे का? हवी असलेली ‘एनर्जी’, ऊर्जा मिळवण्यासाठी विद्यार्थी ‘ड्रिंक’वर अवलंबून राहू लागले आहेत का, या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळणेही तितकेच गरजेचे आहे.

Student stress
Bits Pilani: 'कुशाग्र'च्या मृत्यूमागे एनर्जी ड्रिंक अतिसेवनाचा संशय! व्हिसेरा राखून ठेवला; फुफ्फुस, मेंदूला इजा

वाढता ‘आयक्यू’ आणि घटता ‘ईक्यू’ हे उच्च शिक्षण घेणाऱ्यांचे व्यवच्छेदक लक्षण बनू पाहत असेल, तर ते अतिशय गंभीर आहे. मृत्यूचे नेमके कारण ज्ञात नसताना केवळ तर्क करणे अप्रस्तुत असले तरी एकदम गैरलागूही नाही. भारतातील कुशाग्र बुद्धिमत्ता यातील कुठल्याही एका कारणाने जरी संपत असेल, तर ती अत्यंत गंभीर बाब आहे. समाजाला अजिबात न परवडणारी आहे. पोलिसतपास मृत्यूच्या कारणापाशी येऊन थांबतो. त्या मृत्यूचा जिवंत, जित्याजागत्या समाजावर काय परिणाम होतो, याची मीमांसा होणे तपासाइतकेच महत्त्वाचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com