
वास्को: झुआरीनगर येथील बिट्स पिलानी कॅम्पसमधील कुशाग्र जैन (वय २० वर्षे) या विद्यार्थ्याचा मृत्यू हा एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. व्हिसेरा राखून ठेवला असून, त्याच्या फुफ्फुसावर सूज आणि मेंदूला इजा झाल्याचे सूत्रांनी सांगितलेे.
असे असले तरी याप्रकरणी पोलिसांचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. टेबल टेनिस खेळून आल्यानंतर कुशाग्रला थकवा जाणवत होता. त्यामुळे त्याने तब्बल चार बाटल्या एनर्जी ड्रिंकचे सेवन केले होते. एनर्जी ड्रिंकचे अतिसेवन त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुशाग्रने ड्रग्सचे सेवन केले होते का, याची पडताळणीसुद्धा केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुशाग्र जैन याच्यासंबंधी बिट्स पिलानीच्या व्यवस्थापनाकडून शनिवारी (ता. १६) माहिती
मिळाल्यावर पोलिस तेथे पोचले. कुशाग्रला तपासल्यावर संस्थेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले होते. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पाठविला होता. तेथे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी वेर्णा पोलिस स्थानकाचे निरीक्षक आनंद शिरोडकर पुढील तपास करीत आहेत.
या संस्थेतील चौघांच्या मृत्युमुळे पालक, विद्यार्थी आणि जनतेमधूनही चिंता व्यक्त केली जात आहे. हे मृत्यु शैक्षणिक तणाव की आणखी कशामुळे होत आहेत, हे तपासण्याची नितांत गरज आहे. अशा घटना शैक्षणिक कॅम्पसमध्ये घडत असल्याने त्याकडे काणाडोळा करता येणार नाही. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि कल्याण यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे. त्यामुळे यासंबंधी ‘एसआयटी’ तटस्थ व सखोल चौकशी करून सत्य उजेडात आणू शकते, असा दावा सिमोईस यांनी केला आहे.
बिटस पिलानी कॅम्पसमधील चौथ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने आज या घटनेची कॅम्पससह आजूबाजूच्या परिसरात दिवसभर चर्चा सुरू होती. असा कोणता प्रकार घडतो, की जेणेकरून या कॅम्पसमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटना घडत आहेत त्याचा शोध घ्यावा, असेही विद्यार्थी चर्चा करीत आहेत.
कुशाग्र जैन याचे पार्थिव अंतिम संस्कारांसाठी कुटुंबीयांकडे सोपविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. तथापि, व्हिसेराचे रासायनिक विश्लेषण, उतींची तपासणी, रक्ताचे विश्लेषण वगैरे तपशील सविस्तर अहवाल आल्यावर स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले.
या प्रकरणात संशयाला वाव राहू नये, यासाठी कुशाग्रच्या मृतदेहाची ‘इन कॅमेरा’ चिकित्सा करण्यात आली. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी व्हिसेरा राखून ठेवला असून तो उद्या तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सांकवाळ-झुआरीनगर येथील बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये गेल्या नऊ महिन्यांत एका पाठोपाठ चार विद्यार्थ्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याने या प्रकरणाचे तपास काम विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपवावे, अशी मागणी कुठ्ठाळीचे काँग्रेस नेते ओलांसियो सिमोईस यांनी केली आहे. ते म्हणाले की, बिट्स पिलानीमध्ये तिसऱ्या वर्षात शिकणारा विद्यार्थी कुशाग्र जैन हा शनिवारी आपल्या खोलीत मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या आकस्मिक मृत्युमुळे बिट्स पिलानी कॅम्पस पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यापूर्वी डिसेंबर २०२४ ते मे २०२५ या सहा महिन्यांच्या काळात तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.