

पणजी ही गोव्याची राजधानी. या राजधानीच्या पलीकडे असलेल्या बेती, वेरे, रेईस मागूश या गावांची ओळख अनेकांना आहे. पण मांडवी पुलाखालून जाणाऱ्या रस्त्यावरून तुम्ही डावीकडे वळलात, वाड्या-वाड्यांतून पुढे गेलात की एक शांत, साधं आणि आपुलकीनं भरलेलं गाव भेटतं, ते म्हणजे बिठ्ठोण.
या गावाला ‘पेन्ह-द-फ्रान्स’ हे दुसरं नावही आहे. चर्चच्या नावावरून पडलेलं हे सरकारी दप्तरातील नाव. मात्र गावकऱ्यांच्या ओळखीचं आणि त्यांच्या जिव्हाळ्याचं नाव आजही ‘बिठ्ठोण’च आहे. “पेन्ह-द-फ्रान्स हे नाव कागदोपत्री असेल; पण आम्ही सारे ‘बिठ्ठोण’च म्हणतो,” असे गावकरी अभिमानाने सांगतात. या गावात सर्व धर्मांचे लोक एकत्र नांदतात, एकत्र राहतात आणि सण-उत्सव साजरे करतात. मांडवीच्या रायबंदर पाट्यावर उभं राहिलं की समोर दिसतं ते आमचं गाव.
पांढऱ्या शुभ्र रंगात नटलेलं चर्च जणू गावाचं स्वागत करत उभं आहे. तेथून पुढे गेलं की भेटतं मारुतीचं मंदिर. या मंदिराला नमस्कार करून पुढे गेलं की रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी जुनी-नवी घरे आपुलकीने उभी दिसतात. पूर्वीची कौलारू घरे आता नव्या रूपात सजली असली, तरी त्यातली उब अजूनही तशीच आहे. पूर्वी अरुंद असलेले रस्ते आज रुंदावले आहेत.
गावाने आपली जुनी कात टाकत नवं रूप धारण केलं आहे. १९६१ पूर्वी गावात सुविधा कमी होत्या. वैद्यकीय आणि शैक्षणिक सोयींचा अभाव होता. गावकऱ्यांचं लक्ष कायम पणजीकडे असे. तेव्हा पणजीहून ‘वाफोर’ किंवा ‘गॅझोलीन’ बोटी सकाळी सुटत आणि विविध धक्क्यांवर थांबत ‘बिठ्ठोण’ धक्यावर येत. त्या बोटीने येणाऱ्या सामानाची वाट पाहत गावकरी आधीच धक्यावर येऊन उभे राहत. डोक्यावर, खांद्यावर सामान घेऊन ते आपल्या वाड्यांकडे निघत. विशेषतः गणेश चतुर्थीच्या आधी गावात अशी लगबग दिसे.
आम्ही लहान असताना त्या बोटीची वाट पाहणं, काहीतरी आपल्यासाठी येईल या आशेने थांबणं, हीच आमची उत्सुकता असे. आज सगळं बदललं आहे. वाफोर इतिहासजमा झाला आणि प्रत्येकाच्या घरात चारचाकी आली. वाहतूक व्यवस्थेने जीवनशैलीच बदलून टाकली. या गावात जन्मजात कलागुण असलेले अनेक कलाकार होते. गणेशमूर्ती, सरस्वतीच्या मूर्ती, तसेच पणजीतील सप्ताहातील चित्ररथांसाठी लागणाऱ्या देखण्या मूर्ती गावातच तयार होत.
फर्निचर बनवणारे, घरे बांधणारे, होड्या तयार करणारे कारागीरही याच मातीचे. आज ती कला हरवत चालली असली, तरी तिच्या आठवणी अजून जिवंत आहेत. आज बिठ्ठोण बदलत आहे. नदीकिनारी छोटे हॉटेल, कॅसिनो, बँक्वेट हॉल उभे राहत आहेत. रस्ते अरुंद असल्याने पार्किंगची समस्या भासते; पण गावकऱ्यांच्या समजुतीमुळे कुठलीही तक्रार नाही, कुणालाही अडचण नाही. गावाचं रूप बदलत असलं, तरी माणसांचा स्वभाव मात्र तसाच आहे. समाधानी, शांत आणि कुणालाही त्रास न देणारा. हेच या मातीचं खरं मोठेपण आहे, असं मला नेहमी वाटतं.
सुभाष फडते
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.