

प्रतापसिंह राणे मुख्यमंत्री असताना गोव्यातील प्रमुख शहरांचा असा वाहतूक मास्टर प्लॅन तयार करण्याचा निर्णयही झाला होता, पण तो तडीस गेला नाही. आता तरी तसा आराखडा तयार केला गेला, तर नवीन रस्ते वा उड्डाणपूल उभारण्याचे प्रयोग तरी बंद होतील.
मडगाव - पणजी या गोव्यातील सर्वात गजबजलेल्या रस्त्यावर बांबोळी येथे गोमेकॉसमोर तयार होणारा मृत्यूचा सापळा दूर करण्यासाठी तेथे उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव सांबांखाच्या संबंधित विभागाने तयार केला आहे.
नुकतेच त्याचे सादरीकरणही केले गेले आहे. वास्तविक हा रस्ता ओलांडण्यासाठी तेथे भुयारी मार्ग आहे व त्यात अनेकदा काही कोटी खर्चून सुधारणा करण्यात आलेल्या असल्या तरी प्रत्यक्षात हा भुयारी मार्ग त्यात साचत असलेल्या पाण्यामुळे निरुपयोगी ठरून सध्या भटक्या गुरांच्या निवाऱ्याचे ठिकाण बनलेला आहे.
दुसरा मुद्दा म्हणजे नवा झुआरी पूल उभारताना वेर्णा - बांबोळी - मांडवी पुलापर्यंत नवा सहापदरी महामार्ग बांधण्यात आलेला आहे, पण बांबोळी भागात त्यानंतर जे काही भीषण अपघात झालेले आहेत, त्यात कोणाच्या चुका आहेत त्याचा शोध खरे म्हणजे घेण्याची गरज आहे.
कारण या नव्या महामार्गाची आखणी करताना केवळ आराखडा तयार केला गेला नव्हता, तर विशेष कन्सल्टंट नेमले गेले होते व त्यांच्या देखरेखीखाली काम केले गेले होते, असे असताना अशा गंभीर स्वरूपाच्या त्रुटी कशा राहून गेल्या व त्याला कोण जबाबदार त्याचा शोध घेणे गरजेचे आहे. कारण अजून हा प्रकल्प ठेकेदाराकडेच आहे व त्याचे संबंधित खात्याकडे हस्तांतरण झालेले नाही.
त्यामुळे राहिलेल्या त्रुटी दूर करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराकडे जात नाही का असा प्रश्न उभा रहातो. पण ज्या पद्धतीने संबंधितांकडून जी सारवासारव चालू आहे व बांबोळीत नवीन उड्डाणपुलाचे घोडे दामटले जात आहे ते पाहिले तर राहून गेलेल्या चुकांवर पांघरूण घालण्याचे प्रयत्न तर संबंधितांकडून सुरू नाहीत ना, असा संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.
काही महिन्यामागे याच भागात झालेल्या एका अपघातात राष्ट्रीय स्पर्धेतील पदाधिकारी मृत्युमुखी पडले होते. त्यावेळी या रस्त्याची आखणी करताना चुकीची पध्दत अवलंबिल्याचा आरोप काहींनी केला होता.
त्यानंतर परवा अशाच आणखी एका अपघातांत चार वाहनांचे मोठे नुकसान झाले व त्यानंतर परत एकदा हा रस्ता चर्चेत आला होता, पण संबंधित यंत्रणेने त्याकडे लक्ष न देण्यामागील कारण कोणते याचा जसा शोध घेणे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे प्रचंड खर्च करूनही अपघात होणे थांबणार का याचे उत्तर शोधणेही गरजेचे आहे. कारण नवीन सहापदरी रस्ता उभारताना येथेच उड्डाणपूल बांधला होता, पण त्या पुलामुळे सोयीपेक्षा गैरसोयीच अधिक झाल्याचे आता होऊ लागलेल्या अपघातांवरून आढळून येत आहे.
त्यापूर्वी काही वर्षांपूर्वी मुख्य रस्ता ओलांडणे लोकांना अशक्य होऊ लागल्यानंतर तेथे मुख्य रस्त्याच्या खाली भुयारी मार्ग पादचाऱ्यांसाठी तयार केला गेला, पण त्याचा वापर मात्र झाला नाही. कारण कोणीच तो गांभिर्याने घेतला नाही.
लोकांनी त्याचा अवलंब करावा म्हणून बराच खर्च करून तेथे बाजूने व्यापारी गाळे उभारले गेले, पण त्यांचाही वापर झाला नाही. मात्र, नंतरच्या काळात म्हणजे कुजिरा शिक्षण संकुल तयार झाल्यावर तिकडे वाहने जाण्यासाठी ते गाळे हटवून तो भुयारी रस्ता केला गेला. मात्र, आता नवा उड्डाणपूल करताना पुन्हा या व्यवस्थेत बदल केला जाईल असे संकेत मिळतात. त्यामुळे अशा या खर्चिक कल्पना नेमक्या सुचतात तरी कोणाला असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.
गोव्यात अनेक भागांत यापूर्वी केले गेलेले पादचाऱ्यांसाठीचे भुयारी मार्ग कुचकामी ठरले आहेत ते त्यात पावसाळ्यात भरणाऱ्या पाण्यामुळे वा पादचाऱ्यांकडून न होणाऱ्या त्यांच्या वापरामुळे. नावेली, नुवे, वेर्णासारख्या भागात खासदार निधींतून तयार केलेले असे भुयारी मार्ग बंद आहेत.
चांदर, सुरावली, पेडा - मडगाव येथे रेल्वे मार्गांमुळे व असे भुयारी मार्ग बांधले गेले, पण त्यात पावसाळ्यात पाणी भरते अशा लोकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे असे मार्ग बांधावयाचे झाले तर या समस्येचा विचार होणे गरजेचे आहे. बांबोळीत जरी नवा असा भुयारी मार्ग येणार नसला, तरी पणजीत पार्किंग प्रकल्प ते सांता मोनिका जेटी दरम्यान हल्लीच भुयारी मार्गाचा जो विचार पुढे आला आहे, त्यामुळे असा मार्ग सोईस्कर ठरेल का याचा प्रथमच विचार व्हायला हवा.
कारण तो मांडवी नदीला भिडून राहणार असल्याने भरतीच्या वेळी समस्या उद्भवू शकते. त्याच अनुषंगाने आणखी एक मुद्दा येतो तो म्हणजे तेथे प्रथम लोखंडी पादचारी पुलाचा प्रस्ताव होता, पण गोव्यातील खारट हवामानामुळे तो म्हणे नाकारला गेला मग बांबोळी येथे फुलांच्या खुरसाजवळ रस्ता ओलांडण्यासाठी असा लोखंडी पादचारी पूल कोणत्या आधारावर उभारला जात आहे असा प्रश्न पडतो.
कारण तेथे लोखंडाला गंज येणार नाही का? यापूर्वी मिरामार येथे शारदा मंदिर हायस्कूल जवळ उभारलेला तसेच मडगावच्या कोकण रेल्वे स्टेशनकडील असा पदपूल सतत येत असलेल्या गंजामुळे गतवर्षी मोडून काढला आहे. मग फुलांच्या खुर्साजवळील पूल कसा टिकणार याचे उत्तर मिळत नाही.
खरे म्हणजे गोव्यातील एकंदर वाहतूक व्यवस्थेचा मास्टर प्लॅन आता गरजेचा ठरला आहे. राज्यातील वाढती वाहन संख्या, त्यांच्याशी तुलना करता अपुरे व अरुंद रस्ते, पार्किंगसाठी नसलेल्या जागा पाहिल्या तर आताच असा प्लॅन गरजेचा आहे.
मागे एकदा म्हणजे प्रतापसिंह राणे मुख्यमंत्री असताना गोव्यातील प्रमुख शहरांचा असा वाहतूक मास्टर प्लॅन तयार करण्याचा निर्णयही झाला होता, पण तो तडीस गेला नाही. आता तरी तसा आराखडा तयार केला गेला, तर नवीन रस्ते वा उड्डाणपूल उभारण्याचे प्रयोग तरी बंद होतील. खरेच गरज असतील तर तसे पूल बांधाच पण ते बांधताना ठेकेदारांची नव्हे, तर सर्वसामान्य लोकांची सोय पाहिली जावी असे सुचवावेसे वाटते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.