
सर्वच क्षेत्रातील कर्मचारी वर्गाला एआय कौशल्य शिकण्याशिवाय पर्याय नाही. येणाऱ्या काळात ‘एआयचा वापर शिकेल तो टिकेल’, ही काळ्या दगडावरची रेघ आहे! टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस(टीसीएस) या आयटी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने गेल्या आठवड्यात २०२६पर्यंत २% कर्मचारी कपात करणार असल्याची घोषणा केली आहे.
सुमारे ६.१३ लाख कर्मचारी असलेली ही कंपनी येत्या २ वर्षांत २% म्हणजेच १२,२०० कर्मचाऱ्यांना कमी करणार आहे. या कपातीची चर्चा देश विदेशात सर्वत्र अतिशय विस्तृतपणे होत आहे. कारण या कपातीद्वारे एक चिंताजनक ट्रेंड ठळकपणे अधोरेखित केला गेलाय. एक धोक्याची घंटा पहिल्यांदाच कानठळ्या बसाव्यात एवढ्या जोरजोरात वाजवण्यात आली आहे.
कर्मचारी वाढ आणि कपात या कुठल्याही कंपनीसाठी नेहमीच्या असलेल्या गोष्टीचा का एवढा बाऊ केला जात आहे? याला कारण आहे ही कपात करताना कंपनीने दिलेली कारणमीमांसा. आर्टिफीशिअल इंटेलिजेंस म्हणजे एआयचा, उत्पादकता वाढवण्यासाठी आणि मागणी तसा पुरवठा करण्यासाठी सुरू केलेला वापर, हे ह्या कपातीमागचे कारण आहे असे टीसीएस सांगते.
एआय वापरून अनेक कर्मचाऱ्यांचे काम एक कर्मचारी तेवढ्याच किंबहुना जास्त प्रभावीपणे करू शकतो ही झाली एक बाजू. त्याचबरोबर जागतिक कंपन्यांच्या सॉफ्टवेअर आणि सेवा संबंधीच्या मागण्याही आता एआय केंद्रित झाल्याने एआयमध्ये नैपुण्य असलेल्या कर्मचाऱ्यांचीच आता कंपनीला जास्त गरज आहे.
आणखीन एक महत्त्वाची गोष्ट - एआयकौशल्य वृद्धी करण्यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षणही दिले. हे प्रशिक्षण नीटपणे घेऊ न शकलेले, ते घेऊनही एआयकेंद्रित प्रणालींशी जुळवून घेऊ न शकलेले, स्वतःमध्ये योग्य बदल आणू न शकणारे, ज्यांची कामे एआयद्वारे सहजपणे स्वयंचलित करणे शक्य आहे अशा सर्वांना घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनी सांगते.
एका फटक्यात मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करणारी टीसीएस ही पहिली कंपनी असली तरी या आधीही इन्फोसिस, मायक्रोसॉफ्ट, ओला इलेक्ट्रिक, गपशप अशा शेकडो देशी-विदेशी कंपन्यांनी याच कारणामुळे कर्मचारी कपात सुरू केली आहे. भारताच्या आयटी बूमची केंद्रस्थाने असलेल्या बंगळुरू, हैदराबाद आणि पुणे यांसारख्या शहरांमध्ये या साऱ्याचे पडसाद गेल्या काही वर्षांपासून उमटू लागले आहेत. एका अंदाजानुसार, गेल्यावर्षी सुमारे ५०,००० आयटी कर्मचाऱ्यांनी एआयमुळे नोकऱ्या गमावल्या.
भारतात दरवर्षी सुमारे १० लाख युवती- युवक आयटी क्षेत्र संबंधित प्रशिक्षण घेऊन बाहेर पडतात. अगदी अलीकडेपर्यंत, भारतातील आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपन्या दरवर्षी सुमारे ६ लाख पदवीधरांना नोकरी देत असत. मात्र गेल्या दोन वर्षांत हा आकडा लक्षणीय प्रमाणात घटून सुमारे १.५ लाखांपर्यंत आला आहे, असे ‘टीमलीज डिजिटल’ या भारतातील मानवी संसाधन आणि कर्मचारी भरती सेवा पुरवणाऱ्या अग्रगण्य कंपनीचा एक अहवाल सांगतो.
आणखी एका वेगळ्या रिपोर्टनुसार भारतातील आघाडीच्या सहा आयटी सेवा कंपन्यांमध्ये नवीन कर्मचाऱ्यांची भरती ७२%नी घसरली आहे. या साऱ्या नोकऱ्यांच्या संख्येच्या उतरंडीला एआयच जबाबदार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. पण यातही एक विरोधाभास आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान व सेवा क्षेत्रातील कंपन्यांची प्रमुख संघटना असलेल्या ‘नासकॉम’नुसार २०२६पर्यंत भारताला १० लाख एआय व्यावसायिकांची गरज भासेल, पण आजघडीस भारतातील २०% सुद्धा आयटी व्यावसायिकांकडे एआय निपुणता नाही असं नासकॉमच म्हणणं आहे.
भारताच्या २८३ अब्ज डॉलर्सच्या सॉफ्टवेअर उद्योगाला या कौशल्य विसंगतीमुळे उतरती कळा लागू शकते असं तज्ज्ञ सांगतात. वरील विश्लेषण जरी सॉफ्टवेअर उद्योगाबद्दल असले तरीही, झपाट्याने वाढत असलेल्या एआयच्या सर्वसमावेशकतेमुळे, त्याच्या वापराने आणलेल्या उत्पादकतेतील क्रांतीमुळे, आर्थिक ते वैद्यकीय या साऱ्याच क्षेत्रातील - नोकऱ्यांसंबंधीचे चित्र ढोबळमानाने असेच बदलणार आहे.
या प्रचंड उलथापालथीमध्ये येणाऱ्या काळात तग धरून राहायचं असेल तर सर्वच क्षेत्रातील कर्मचारी वर्गाला एआय कौशल्य शिकण्याशिवाय पर्याय नाही. येणाऱ्या काळात ‘एआयचा वापर शिकेल तो टिकेल’, ही काळ्या दगडावरची रेघ आहे! दूर कशाला, तुमच्या अवतीभवती डोळसपणे नजर मारलीत तर माझ्या म्हणण्याची सत्य-असत्यता तुम्हांला पटेल. तुमचे जे सहकारी एआय टूल्स शिकून घेऊन ते प्रभावीपणे वापरायला लागले आहेत त्यांची उत्पादन क्षमता आणि त्याबरोबर त्यांची कामाच्या ठिकाणावरील वटही वाढली असेल.
तर जे, ‘आहे ना नोकरी, काय करायचंय एआयसारख्या किचकट डोक्याला ताप देणाऱ्या गोष्टी शिकून?’, असे म्हणणारे कुठल्याही हुद्द्यावर असुद्या, त्यांचे महत्त्व -सहकारी, वरिष्ठ, आणि अर्थात कंपनी साऱ्यांच्याच दृष्टीने कमी झालेलेच असेल. ही एआय कौशल्यवाल्यांकडील ओढ दिसामासाने वाढत जाणार आहे आणि ही कौशल्ये आत्मसात न करू शकणारे, सगळ्यांनाच नकोसे होणार आहेत.
यासंबंधीची स्वजागृती वेळीच करून घेतील, बदलाची तयारी दाखवतील, आपल्या क्षेत्र वा उद्योग-पूरक एआय कौशल्य प्रशिक्षण घेतील तेच या स्पर्धात्मक जगात टिकतील. बाकीच्यांना कधीही बाहेरचा दरवाजा दाखवला जाऊ शकतो, हे आता प्रत्येकाने ध्यानात ठेवायचेय.
शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा. क्षेत्र कुठलेही असू द्या, एआय तुमची नोकरी, तुमची बढती हिरावून घेणार नाही, पण एआयमध्ये नैपुण्य संपादन केलेली कोणतीही व्यक्ती मात्र ती नक्की खेचून घेऊन जाऊ शकते. तसे व्हायला द्यायचं नसेल तर तुमच्याकडे फक्त एकच पर्याय आहे. होता होईल तेवढ्या लवकर एआय कौशल्य आत्मसात करणे. यासाठी अजूनपर्यंत केली नसेल तर सर्वांत आधी चॅटजीपीटी, जेमिनाय, क्लाऊडसारख्या एंट्री लेव्हलच्या एआय टूलशी दोस्ती करा.
नी मग त्यांनाच विचारा सल्ला - मी अमुक क्षेत्रात आहे, माझे शिक्षण, अनुभव तमुक आहे, मी कुठली एआय टूल्स शिकायला हवीत, कुठलं प्लॅटफॉर्म, कोणते नवे तंत्रज्ञान, आत्मसात करायला हवे? आणि तो सल्ला शिरसावंद्य मानून स्वतःची कौशल्य वृद्धी करायला सुरुवात करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे करण्यासाठी पाहिजेत ते जगभरातील अगदी आयआयटी, एमआयटीसारख्या नवख्या संस्थांचेही कोर्सेस ऑनलाइन उपलब्ध आहेत. गरज आहे ती फक्त योग्य मानसिकतेची आणि इच्छाशक्तीची.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.