अग्रलेख: निष्काळजीपणा नव्हे, सदोष मनुष्यवध! हडफडे दुर्घटनेने हादरवलं; नियमभंगाच्या कुबड्यांवर तग धरलेली व्यवस्था

Arpora Nightclub Fire: जोवर आपण सोयीऐवजी सचोटी, आडवाटेने जाण्याऐवजी नियमपालनाचा मार्ग निवडून त्यावर चालत नाही, तोवर आपत्ती येतच राहतील. शेवटी, निवडही आपलीच आणि परिणामही आपलेच!
Goa Nightclub Fire
Goa Nightclub FireDainik Gomantak
Published on
Updated on

रुक्मा सडेकर

जोवर आपण सोयीऐवजी सचोटी, आडवाटेने जाण्याऐवजी नियमपालनाचा मार्ग निवडून त्यावर चालत नाही, तोवर आपत्ती येतच राहतील. शेवटी, निवडही आपलीच आणि परिणामही आपलेच!

हफड्यात (Arpora) घडलेल्या भीषण दुर्घटनेने तमाम गोमंतकीयांना पुन्हा एकदा हादरवून सोडले आहे. याच्या तात्काल प्रतिक्रिया म्हणून सोशल मीडियावर सामूहिक रोष उसळला आहे. सरकारवर, सत्ताधाऱ्यांवर, व्यवस्थेवर, राजकारण्यांवर, संबंधित खात्यांवर, पंचायतीवर, त्या आस्थापनाच्या मालकांवर आणि अजून कित्येकांवर आरोपांचा वर्षाव होत आहे. पाहू जाता तोही योग्यच आहे! या विनाशासाठी ते सर्व जबाबदार आहेत आणि त्यांना कठोर शिक्षा मिळायलाच हवी, यात दुमत असण्याचे कारण नाही. हे केवळ आगीच्या दुर्घटनेमुळे गेलेले जीव नाहीत, हा सर्व संबंधितांनी केलेला सदोष मनुष्यवध आहे.

आपण जेव्हा एक बोट समोरच्यास दाखवतो, तेव्हा तीन बोटे आपल्याकडेच वळलेली असतात. जिने गाठलेला कळस पाहून आपण शिव्या घालतो त्या व्यवस्थेची उभारणी आपल्याच दुर्बलतेवर, लोभावर, तडजोडींवर आणि दांभिकतेवर झाली आहे, हे आपण विसरतो. एका फेसबुक पोस्टने आणि ‘गुड गव्हर्नन्स’चे स्तोम माजवणाऱ्यांच्या भयाण शांततेने हे वास्तव माझ्या डोळ्यांसमोर उभे केले. व्यवस्थेविरुद्ध तीव्र निषेध व्यक्त करणारी ती पोस्ट एका नामांकित बांधकाम उद्योजकाची होती.

Goa Nightclub Fire
Arpora Nightclub Fire: हडफडे नाईट क्लब दुर्घटनेला कायदेशीर वळण! 'एसआयटी' चौकशीसाठी हायकोर्टात याचिका दाखल; 16 डिसेंबरला सुनावणी

भावना उदात्त होती, पण प्रश्न स्पष्ट होता; त्याने बांधलेल्या सर्व इमारती या व्यवस्थेने घालून दिलेल्या नियमांचे पूर्णपणे पालन करतात का? आपल्याला परवानग्या लगेच हव्या असतात, शॉर्टकट हवेत, कर चुकवायचे असतात आणि जरा ‘ऍडजस्टमेंट’ हवी असते. त्यासाठी आपणच लिफाफे सरकवतो - कधी गुपचूप, तर कधी उघडपणे - आणि नंतर म्हणतो की व्यवस्था भ्रष्ट आहे. काही करण्यापेक्षा, आपण कुरकुरतोच जास्त!

घरे, कॉलनी, व्यावसायिक संकुले, शाळा, रुग्णालये बांधली जातात तेव्हा बहुतांशी कागदपत्रे निर्दोष असतात; पण ‘सुरक्षा मानकां’चे पालन बहुतेक वेळा फक्त कागदावरच असते. आगीसारख्या घटनांनी काळवंडलेले स्वत:चे चेहरे लपवण्यासाठी नैतिकतेचे मुखवटे लावत संताप व्यक्त करतो. आपण काम व्हावे म्हणून पैसे देत असू तर स्वत:च पोसलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध बोलण्याचा अधिकार मात्र आपण गमावून बसतो. जे काहीजण तडजोड करण्यास नकार देतात, जे प्रत्येक नियम पूर्ण करेपर्यंत तग धरून राहतात, केवळ त्यांनाच व्यवस्थेवर राग व्यक्त करण्याचा नैतिक हक्क आहे. इतरांना जराही नाही.

Goa Nightclub Fire
Arpora Nightclub: 'बर्च क्लब'वर कोणाचा वरदहस्त? 'त्या' वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने पोलिसांना कारवाईपासून रोखल्याचा धक्कादायक खुलासा!

सभोवतालच्या बहुतांश इमारती, घरे, मॉल्स, संकुले, दुकाने वगैरे सगळी बांधकामे नियमभंगाच्या कुबड्यांवर तग धरून आहेत. त्यातील अर्ध्याहून अधिक बांधकामे कधीही कोसळतील अशी आहेत. ‘रोमिओ लेन’ क्लबमधील माणसे जात्यात होती, आम्ही सुपात आहोत; इतकाच काय तो फरक!

आपण नियम वाकवतो, जे वाकत नाहीत ते मोडतो. एवढे करून वर तसे करणे अभिमानाने मिरवतोही. अगदी आपले जीव वाचवणारे हेल्मेट, सीटबेल्ट यांसारखे प्राथमिक नियम पाळायलादेखील आपण तयार नसतो. ट्रॅफिकमध्ये वेगाने धावणाऱ्या दुचाकींवर पुढे-मागे लहान मुलांना बसवून जाणाऱ्या निर्भीड पालकांना काय म्हणावे, तेच कळत नाही. असे लहान, लहान नियम मोडल्यानेच मोठे नियम मोडण्याची सामूहिक मानसिकता तयार होते.

Goa Nightclub Fire
Arpora Fire News: शॉर्ट सर्किटमुळे हडफडे गेस्ट हाऊसमध्ये आग, 70 हजारांचे नुकसान

गोव्यात (Goa) किती इमारतींत आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचे सुरक्षा-मार्ग आहेत? किती इमारती आग नियंत्रणात आणणाऱ्या प्रणालींनी सुसज्ज आहेत? शाळांमध्ये मुलांना अग्निशमन करण्याचे प्रशिक्षण दिले जाते का? आग लागलेली जागेपासून माणसांना सुरक्षित स्थळी नेण्याची सराव-सत्रे, प्रात्यक्षिके किती महाविद्यालयांमध्ये आयोजित होतात? रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण आहे का? आग विझवणारे यंत्र कधी व कसे वापरायचे हे आम्हांला तरी माहीत आहे का? ‘अग्निशमन यंत्रणा सुसज्ज नव्हती’, असे म्हणतो तेव्हा ती वापरण्यासाठी आपण कितपत सज्ज आहोत, याचा विचार करतो का? पुन्हा तशीच एखादी घटना घडेपर्यंत आपण निवांत, निश्‍चिंत असतो. कमजोर इमारती, भूकंप, पूर, वादळे, विजा, सुनामी वगैरेंचे सावट कायम आहे; आणि त्याला सामोरे जाण्याची आपली तयारी जवळजवळ शून्य आहे.

Goa Nightclub Fire
Goa Nightclub Fire: 'हा अपघात नव्हे, 25 जणांचा खून! हडफडे नाईटक्लब दुर्घटनेवरून आमदार लोबो संतापले; Watch Video

लोकशाहीचा स्वघोषित चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांत हिंमत आहे का असुरक्षित इमारतींची यादी जाहीर करण्याची? नाव घेऊन उघड करण्याची? सतत पाठपुरावा करण्याची? अधिकाऱ्यांना आणि मालकांना लाजवण्याची? तुटलेल्या पायवाटा, रस्त्यातले खड्डे, ओसंडणारी कचरापेटी, लोंबकळणाऱ्या तारा रोज दाखवताना जीव घेऊ शकणाऱ्या इमारतींबाबत मौन का? तिथे कोण गळचेपी करतोय? कुठे जातो तो पत्रकारितेतला निर्भीडपणा?

Goa Nightclub Fire
Goa Nightclub Fire: 'ही दुर्घटना म्हणजे भाजप सरकारच्या भ्रष्ट व्यवस्थेने घेतलेले बळी'! हडफडे अग्नितांडवावरून विरोधकांचा हल्लाबोल

आपण राग व्यक्त करू शकतो. भावनिक पोस्ट्स लिहू शकतो. हॅशटॅग करू शकतो. दोष इतरांवर ढकलू शकतो; पण त्याचे परिणाम नाही. ते आपल्यालाच भोगावे लागतात. आपणच व्यवस्था आहोत आणि अव्यवस्थितही. गुणदोषांचे हे आपल्यापासून सुरू होत असलेले आवर्तन, शेवटी आपल्यापाशीच येऊन थांबते. जोवर आपण सोयीऐवजी सचोटी, आडवाटेने जाण्याऐवजी नियमपालनाचा मार्ग निवडून त्यावर चालत नाही, तोवर आपत्ती येतच राहतील. शेवटी, निवडही आपली आणि परिणामही आपलेच!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com