

‘ॲपल’मधील नेतृत्वबदल म्हणजे बदलत्या काळाची हाक ओळखून दिलेला प्रतिसाद. उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांच्या क्षेत्रातील स्पर्धा तीव्र होत आहे. भारतासारख्या देशांनीही नवसर्जनाच्या या उद्योजकीय ‘महाउत्सवा’त सामील होण्याची गरज आहे.
न वसंशोधन, नवसर्जन ही आजच्या युगातील एक कमालीची प्रभावी शक्ती आहे. त्या जोरावरच उच्च तंत्रज्ञानाधारित कंपन्यांची सुसाट वाटचाल सुरू आहे. विशेषतः संगणकाधारित संवादक्षेत्र ज्या गतीने वाढत आहे, ती गती अक्षरशः भोवळ आणणारी म्हणावी लागेल. या क्षेत्रातील कंपन्यांची अब्जावधीची उलाढाल हे त्याचेच फलित. सतत नवीन कल्पनांचा पाठपुरावा करीत उत्पादनांचे आराखडे तयार करणे, ती सगुण, साकार रूपात प्रत्यक्षात तयार करून बाजारात आणणे आणि जागतिक स्तरावरील प्रचंड बाजारपेठ काबीज करणे यात माहीर असलेल्या ‘ॲपल’ने कायम पहिल्या तीन क्रमांकांत आपले स्थान टिकवले.
‘आयफोन’ याच कंपनीची देन. याशिवाय आयपॅड, एअरपॉड, मॅजिक की बोर्ड, मॅकबुक, आरोग्यविषयक संवेदक बसवून तयार केलेले अद्ययावत घड्याळ, एअरटॅग (वस्तूशोधक) अशा विविध उत्पादनांमुळे ‘ॲपल’ चांगलेच नावारूपाला आले. कूक यांनी गेल्या १५ वर्षांत कंपनीला मोठ्या उंचीवर नेले. नऊ अब्ज डॉलरवरून २०२५ मध्ये कंपनीची उलाढाल ४१६ अब्ज डॉलरवर पोचली.
साधारणपणे अशा प्रकारचे यश मिळाले की, आपल्याकडे त्या नावाभोवती दैवत्वाचे वलयही तयार होते. तिचे स्थान जणू अपरिवर्तनीय मानले जाते. कूक यांनी मोठी कामगिरी बजावली असली तरी नव्या आव्हानात्मक परिस्थितीत कंपनीला नव्या नेतृत्वाची गरज भासत असल्याचे दिसते. ‘नोबडी इज इन्डिस्पेन्सिबल’, हाच या क्षेत्राचा मूलमंत्र बनला आहे.
पासष्टीतील टीम कूक यांच्याकडून पन्नाशीतील जॉन टर्नस यांच्याकडे सूत्रे येणे हा पिढीतील बदलही आहे. टर्नस येत्या सप्टेंबरमध्ये कंपनीची सूत्रे हाती घेतील. त्यांना ‘हार्डवेअर मॅन’ म्हणून ओळखले जाते. याआधी उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे आणि त्यांच्याबाबत असे सांगितले जाते की, उत्पादनांची नस अन् नस त्यांना माहिती असते. कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाच्या विकासपर्वात ‘हार्डवेअर’चे महत्त्व वाढणार, हे लक्षात घेऊन हा नेतृत्वबदल झाल्याचे दिसते.
नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपुढे आव्हान असेल ते कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उत्पादकता वाढवण्याचे. आपली वैशिष्ट्ये टिकवून विस्तार साधण्याचे. कृत्रिम प्रज्ञेविषयीच्या ‘संशोधन आणि विकासा’वर कंपनी दहा ते बारा अब्ज डॉलर खर्च करीत होती. इतर कंपन्या शेकडो अब्ज डॉलरची यासाठी तरतूद करीत असताना ‘ॲपल’ याबाबतीत काहीशी सावध वाटचाल करीत होती, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या ‘ॲपल’ कंपनी एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर उभी आहे.
त्यामुळेच या नेतृत्वबदलाकडे कंपनीच्या भावी धोरणात्मक दिशेचा निर्णायक टप्पा म्हणून पाहावे लागेल. सध्या तंत्रज्ञान क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हा सर्वांत वेगाने विकसित होणारा घटक ठरत आहे. ‘ॲपल’ने आतापर्यंत हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या समन्वयातून आपली वेगळी ओळख निर्माण केली असली, तरी ‘एआय’ क्षेत्रात स्पर्धक कंपन्यांनी घेतलेली आघाडी ही एक मोठी चिंता आहे. जॉन टर्नस यांच्यासमोर कंपनीला ‘एआय-केंद्रित’ नवकल्पनांकडे वळवण्याचे मोठे आव्हान असेल.
त्याचबरोबर, अलीकडच्या काळात ‘ॲपल’च्या नवीन उत्पादनांमध्ये अपेक्षित त्या प्रमाणात क्रांतिकारक बदल दिसून आले नाहीत. आयफोन, मॅक किंवा इतर उत्पादनांच्या सुधारित आवृत्त्या बाजारात येत असल्या तरी ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या ‘नेक्स्ट बिग थिंग’म्हणता येतील, अशी निर्मिती साध्य झालेली नाही.
त्यामुळे संशोधन आणि विकास क्षेत्रात अधिक गुंतवणूक करून नवकल्पनांना चालना देण्याचे आव्हान टर्नस यांच्यापुढे असेल. निर्मितीक्षेत्रात चीनवरील मोठ्या प्रमाणातील अवलंबित्व हीदेखील एक गंभीर बाब आहे. जागतिक पुरवठा साखळीतील अडचणी आणि वाढते भूराजकीय तणाव यामुळे उत्पादनप्रक्रियेत विविधता आणण्याची गरज निर्माण झाली आहे.
‘ॲपल’सारख्या कंपन्यांची कामे चीन, भारत, व्हिएतनाम आदी देशांत केली जातात. आपली या क्षेत्रातील उपस्थिती ‘ॲपल’सारख्या बड्या कंपन्यांनी शोधलेल्या नवकल्पनाधारित उत्पादनांचे भाग मागणीबरहुकूम निर्माण करून त्यांना पुरवण्यापुरती मर्यादित आहे. आपण नवसर्जनाच्या या उद्योजकीय ‘महाउत्सवा’त कधी सामील होणार हा प्रश्न आहे. ‘ॲपल’सारख्या कंपन्या केवळ विशिष्ट उत्पादनांसाठी ओळखल्या जात नाहीत, आपापल्या क्षेत्रांत ते जी ‘इकोसिस्टिम’ तयार करतात, त्यातून त्यांचा दबदबा निर्माण होतो.
अशा कंपन्या जगातील एक जणू सत्ताकेंद्रच बनतात. जगाच्या वेगवेगळ्या भागांत अशाप्रकारची उद्यमशीलता तयार झाली तरच या सत्तेचे काही प्रमाणात विकेंद्रीकरण होईल. भारतासह काही विकसनशील देश ज्या नव्या बहुध्रुवीय जागतिक रचनेचा आग्रह धरत आहेत, त्यादृष्टीनेही हे आवश्यक आहे. केवळ तेवढ्यासाठीच नव्हे तर अर्थपूर्ण विकासासाठीदेखील भारतानेही या ‘मैदाना’त उतरायला हवे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.