Shravan Barve Murder: तकलादू झालेल्या नातेसंबंधांचा शेवट हिंसेने का? सामाजिकदृष्ट्या ही धोक्याची घंटा

Goa Murder Case: आपण मुलाच्या खांद्यावरून जावे, अशी इच्छा सामान्यत: वडिलांची असते; पण, इथे वडिलांनी मुलाचा खून करण्याइतपत काय घडले होते, याचा विचार होणे आवश्यक आहे.
Goa Murder Case
Murder CaseDainik Gomantak
Published on
Updated on

आंबेडे येथील श्रवण बर्वे याचा खून केवळ त्याच्या कुटुंबापुरता सीमित नाही. तो समाजासाठी हादरा आहे. तारुण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या, नव्या आशा-आक्षांकांना कवेत घ्यायची स्वप्ने पाहण्याच्या वयातील कोवळ्या मुलाचा वडील, सख्खा भाऊ या संशयितांनी केलेली हत्या एखाद्या भडक, हिणकस वेबसीरीजमधील कथानकाहून तसूभरही कमी नाही. घट्ट होणारे नात्यांचे बंध नकोसे का वाटू लागले आणि त्याचा शेवट हिंसेने का व्हावा, यावर सामाजिक अंगाने चिंतन होणे आवश्यक आहे.

आंबेडे प्रकरणी वडील देविदास व बंधू उदय अटकेत आहेत. त्यांनी वासुदेव नामक कामगाराला पैसे व भूखंडाचे आमिष दाखवून त्याच्या साहाय्याने श्रवणला जीवनातून कायमचे उठवले. एक खरे, गुन्हे लपत नाहीत, छडा लागतोच. वर्षापूर्वी बंगळुरस्थित सूचना सेठ हिने सिकेरीत नवऱ्यावरील रागातून आपल्या पोटच्या गोळ्याचा जीव घेतला होता, आता आंबेड्यातील ही घटना. दोन्ही घटनांमध्ये मारणारा व मरणारा रक्ताच्या नात्याचे होते.

नातेसंबंध हा समान दुवा. सामाजिकदृष्ट्या ही धोक्याची घंटा आहे. सूचना सेठ ही शहरी, बदलत्या वातावरणातील उच्चशिक्षित तरुणी; परंतु नातेसंबंधात आलेली कटुता व त्यातून निर्माण झालेला मानसिक तणाव ती कुणापाशी व्यक्त करू शकली नाही. बर्वे कुटुंब हे ग्रामीण भागात राहिलेले. त्यांची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तरीही त्यांनी अघोरी पाऊल का उचलले?

वडील देविदास यांचे व श्रवणचे खटके उडायचे. त्याचे पर्यवसान हाणामारीतही व्हायचे. मुलापासून होणारा त्रास कमी होण्यासाठी त्यांनी किमान पाचवेळा पोलिसांकडे धाव घेतली होती. तेथे त्यांच्या समस्येचे निराकरण झाले नाही आणि हीच बाब पुढील घटनेस अप्रत्यक्षरीत्या कारणीभूत ठरली असावी.

संबंधित व्यवस्थेकडून समस्या दूर करण्यासाठी आवश्यक प्रतिसाद न मिळाल्याने असाहाय्य बनलेल्या पित्याने टोकाचे पाऊल उचलले असावे. तत्पूर्वी त्यांनी मुलापासून दूर राहून पाहिले होते, हे पोलिस तपासातून उघड झाले आहे. मारण्याचा उद्देश श्रवण लहान असतानाही साध्य होऊ शकला असता.

एखाद्या व्यक्तीला होणाऱ्या त्रासाचे कायद्याच्या चौकटीत निवारण न झाल्यास काय होऊ शकते, याचे हे उदाहरण म्हणता येते. अशा तक्रारींमध्ये पोलिस अटक करतात व सोडून देतात. परंतु काही प्रसंगी अटकेतील व्यक्तींना समुपदेशनाची, उपचारांची गरज असते. त्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेणे हे देखील कर्तव्य आहे. पोलिसांनी श्रवणला मनोविकार तज्ज्ञांकडे नेले होते का, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे व तो दुर्लक्षून चालणार नाही.

तणाव निवारण कौशल्याचा अभाव हे सामाजिक दुखणे साधे राहिलेले नाही. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये समस्या हाताळण्यास माणसे असत. आता विभक्त कुटुंबांमध्ये ती कमतरता प्रकर्षाने जाणवते. श्रवण याची हत्या हा अक्षम्य गुन्हा आहे. वडील देविदास व भाऊ उदय हे तूर्त संशयित असले तरी त्यांचे कधीच कुणी समर्थन करू शकणार नाही. परंतु या प्रकरणाद्वारे सामाजिक अंगाने बोध घेणे आवश्यक आहे.

समस्या, व्यथा दूर करण्याच्या कौशल्यांचा अभाव, विविध माध्यमांतून हिंसेचे सातत्याने होणारे उदात्तीकरण घातक ठरते आहे. घरातील पुरुषांना व्यसनाधीनतेने ग्रासलेली अनेक कुटुंबे विविध समस्यांना सामोरी जातात. ज्यांचा आवाज केवळ लोकलज्जेस्तव चार भिंतींमध्ये राहतो. अनेकदा सहनशीलतेचा अंत होतो. आपणच अडचणीत येऊ या भीतीपायी घरातील वाद सोडविण्यास बाहेरील व्यक्ती पुढे येत नाहीत.

अशा प्रकारांतून कुटुंबे जर्जर होतात. खरे तर अशावेळी साह्य करणाऱ्या व्यवस्था हव्यात. प्रत्येक समाजात संघटना आहेत, त्या काय करतात? ग्राम व्यवस्थेमधील इतरांना सुरक्षितता देण्याचा हेतू आज का विसविशीत झाला, याचा विचारही व्हायला हवा. आंबेडे येथील प्रकरणात ज्यांनी गुन्हा केला त्यांना जरूर कठोरात कठोर शिक्षा मिळावी, जेणेकरून असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत, अशी जरब बसेल; परंतु त्यासोबत सामाजिक अंतरंगातील सुप्तावस्थेतील लाव्‍ह्याचीही जाणीव हवी.

Goa Murder Case
Shravan Barve Murder: आदल्यादिवशी शिजला 'श्रवण'च्या खुनाचा कट! कामगाराला पैसे, भूखंडाचे आमिष दाखवून काढला काटा

देविदास व उदय बर्वे यांनी नीच कृत्य करून वडील व भाऊ यांच्या नात्याला काळिमाच फासला आहे. कुटुंबात भांडणे असणे गैर नाही, त्यासाठी पोटच्या गोळ्याचा व पाठच्या भावाचा खून करणे निश्चितच नीचपणाचे आहे. कृती अजिबात समर्थनीय नाही, होऊच शकत नाही.

पण, कुटुंबामध्ये कायिक, वाचिक आणि मानसिक हिंसा घडते तेव्हा पोलिसांनी त्याकडे फक्त एक तक्रार या कायदेशीर दृष्टिकोनातून न पाहता, समाजात पुन्हा असे घडू नये यासाठी प्रयत्न करणेही गरजेचे आहे. त्यासाठी समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ यांना यात सहभागी करून घेतले पाहिजे. या प्रकरणी वेगळे राहणे, संबंध न ठेवणे हे पर्याय उपलब्ध होते. अनेक कुटुंबांत ते केलेही जातात.

Goa Murder Case
Shravan Barve Murder: पोटच्‍या मुलाचा खून करणे योग्य होते का? सत्तरीवासीयांना धक्का, 'श्रवण'चा मृतदेह गावी न नेल्‍याने बळावला संशय

आपण मुलाच्या खांद्यावरून जावे, अशी इच्छा सामान्यतः वडिलांची असते; पण, इथे वडिलांनी मुलाचा खून करण्याइतपत काय घडले होते, याचा विचार होणे आवश्यक आहे. केवळ तपासाचा एक भाग म्हणून किंवा दोषीला शिक्षा करण्यासाठी म्हणूनच नव्हे तर अशा अनेक श्रवणना वाचवण्यासाठी. समाजात बरवेपण टिकावे म्हणून खलांचे खलत्व, वाकडेपण वेळीच घालवण्याकडेही जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com