

मुकेश थळी
वृक्षवल्ली, सृष्टी, हिरवाई, वर्षभर खळखळणारे, झुळूझुळू वाहणारे मंजूळ झरे, डोलणारी शेतं, तळी, थंड शीतल कुळागरे अशा प्रदेशात निसर्गाच्या मांडीवर लाड करणारं बालपण मिळणं हे भाग्य. मला ते मिळालं.
म्हार्दोळ महालसा मंदिराच्या समोर जो रस्ता जातो तो वर आकारवाड्यावर. जितकं आत जाल तितकं जैवविविधतेचं वैभव व संपदा तुम्हांला मोहून टाकेल. रंगीबेरंगी रानफुलं, रानफळं यांची नुसती गच्च गर्दी. काजूची बाग डाव्या बाजूला.
आत जाल तर माळरानं. मरड. दाट दाट गवताची कुरणे. गुरं आलापाचा रियाझ करणाऱ्या गायकासारखी शांत शांत चरत असलेली. पक्ष्यांचे थवे वेगवेगळ्या प्रकारचे. नाना रंग. स्वरमंडल वाजवल्यासारखे नादांचा चिवचिवाट करत हवेत गिरक्या घेत बागडणारे. किड्यांचा गुंजारव.
मोगरेमावशेच्या घरापुढे कठीण चढण आहे. वळण असलेली. वनराईतून बरंच पुढं माझं आजोळ. अगोदर एक खोलगट चरासारखी उतरण असलेली पायण आहे. तिला ‘भाणापायण’ म्हणत. तिथून उतरताना उतरायचे सायास होत नसत. घसरून, गडगडत आपोआप खाली.
वर मार्गाच्या दुतर्फा हर तर्हेची रानफुलं. नक्षत्रांसारखी. विविध रंगी, विविध ढंगी. वेली झुडपे गर्द. तंग. नीला व मेधा या भगिनींना त्यांच्या लहानपणी मोगरेमावशेची नात श्रीमती सांभाळायची. त्यांचा हात घट्ट धरून श्रीमती त्यांना वनस्पतीविश्वाची श्रीमंती दाखवत आकारवाड्याकडे मार्गस्थ व्हायची. नीला व मेधा या बहिणी म्हणजे गौर कांतीच्या जपानी बाहुल्याच.
मुरड्या. बालसुलभ प्रश्न निरागसपणे विचारत बागडायी. श्रीमती त्यांना घोडूक दाखवायची. काजूची बी पावसात माळरानातील पालापाचोळ्यात जमिनीत उगवून अंकुरून वर येते, बाहेरचं कवच पडायच्या मार्गावर असतं.
दोन हिरवेगार दल सुंदर दिसत. उल्हास-मोहिनी म्हार्दोळकरांच्या या लेकी, घोडूक विस्मयाने पाहत. या घोडकाची दले आम्ही तोंडाकात घालून खात. नीला, मेधा ही मानवी फुले शोभतील अशी. त्यांचं घर बाजाराजवळ डोंगर पायथ्याशी. अधूनमधून ही मंडळी संध्याकाळी आकारवाड्याच्या निसर्गसृष्टीत रमतगमत फेरफटका मारायची. फुलपाखरे, बिरमुट्या टक लावून बघायची. मेधाचे डोळे भेदक, काळे होते.
विविध वनस्पती, कीटक, किडे, सरडे, साप ही आकारवाड्याच्या जैव विविधतेची संपदा होती. पाण्याचे नैसर्गिक जीवनदायिनी स्रोत उदंड. मुळात पाणी पीत होतो ते पाटाचे. नळ, विहिरीचे पाणी असले प्रकार नव्हते. जंतूंचा विकार होईल ही भिती, गंड (भयरोजोळोप) नव्हता. डोंगर दरीतून आलेल्या या वाहत्या पाण्यावरच आमचं पोषण झालं. विहीर खूप वर्षांनी खणली गेली.
भेडसां, पिटकोळीचीं लालबुंद फळे, जांभळे, जांभ, चारां, चुन्नां, कणेरां, करवंदे, काजू, फणस, अननस, पपनस (तोरींग), आंतेरां (रामफळ) अशी कैक फळे. पावसात काकड्या, चिबूड, दोडकी, कारातीं, भाजी यांचे मळे फुलत.
सालदाटी आणि छोटी पिठूळ पौष्टिक सुकुंडी केळी खाल्ली ती कुळागरातच. चवदार. बाजारात मिळणारी बहुतेक वेलची केळी गोव्याबाहेरील. कुळागरातील कैऱ्या (आमल्यो) उत्तमच. लोणचे किती मस्त, स्वादिष्ट. कुळागरातील बिमले, करमले जेवणात लज्जत आणत. पिकलेल्या घोंटांच्या सांसवाची चव न्यारी.
निसर्ग हा श्रीमंत दाता. तो उदार हस्ते देत असतो. आजोळच्या घरानजीक झाडपाल्याची औषधे देणारा चिंतू होता. सरपी या कातडीच्या रोगावर चिंतूचं औषध रामबाण असायचं. दूरदुरून लोक येत. मीच अनेकांना त्याच्याकडे घेऊन गेलो.
चिंतू पोटात घ्यायला औषध द्यायचा. अंगावर लेप सारवायला द्यायचा. केळीच्या सुक्या पानापासून घट्ट पॅक केलेल्या त्याच्या पुड्या घरी तयार असत. त्या पॅकींगमध्ये त्याचं कौशल्य दिसे. अनेक विकारांवर गुणकारी ठरणारी ही आयुर्वेदिक औषधी पाळे, मुळे, पाला, पाने रानातील दुर्गम भागात आहे. चिंतू वडिलांकडून ही विद्या शिकला होता. सर्दी झाल्यावर मी त्याच्याकडूनच कसाय घेत असे. त्याचा भाऊ गजा औषधे देत असे. आता धाकटा भाऊ पपन देतो.
एक बोधकथा आठवली. एक वृद्ध माणूस अक्रोड लावत होता. अक्रोडच्या शेतीची लागवड मशागत करत होता. शेतीच्या कुंपणाबाहेरून त्याला एकाने हसत विचारलं - ‘आजोबा, काय हे? कशाला त्रास घेता हा?....
तुम्ही लावलेले अक्रोड तुम्हांला मिळणार का?’ आजोबांनी शांतपणे उत्तर दिले - ‘कुणी तरी लावलेले अक्रोड, मी आयुष्यभर खाल्ले. मग मी पुढच्या पिढीसाठी लावून, ते देणे थोडे तरी फेडायला नको का?’ विचारणारा गोठल्यासारखा स्तिमित झाला.
आकारवाड्याचं प्रकृतीचं वरदान व प्रसाद, माझी हाडे मजबूत करण्यास आधारभूत ठरला. निसर्गाची ऊब, मांडी, मिठी व वरदहस्त जीवनात प्रेमळ उष्णता निर्माण करते व जीवनयात्रेची घोडदौड सुकर करते. हे वाक्य पर्यावरण पुस्तकातील नव्हे. हा माझा अनुभव.
नीला, मेधाचा हाच अनुभव असेल. वाटेवर बकुळीची फुले वेचीत चालत, रानफुलं खुडत डोंगरदऱ्यांचं दर्शन घेणारी, गवताच्या पात्याच्या टोकावरील जलबिंदू व त्यातील निळाई कुतूहलाने पाहणाऱ्या तेव्हाच्या चिमुकल्या भगिनी आज कर्तृत्ववान झाल्या. नीला डेन्टिस्ट, क्लिनिक सावर्डे. मेधा आर्किटेक्ट, बंगळुरूत. मृदू, ऋजू - आईवडिलांसारख्या. सालस, शालीन. कारण त्यांच्याकडे पोर्टेबल बॅकपॅक आहे तो निसर्गशक्तीचा.
आज निसर्गाचा र्हास करण्यास क्रूर माणूसच पुढं निघालाय. पायावर कुर्हाड मारत. निसर्गाशी एकरूप व्हायचं सोडून मानवाला मॉल संस्कृतीचा आभासी कृत्रिम चमचमाट आवडू लागला आहे. मचमचीत खाणंजेवणं, तासन्तास दिशाहीन भटकणं. आपलं स्वास्थ्य, नैसर्गिकता बिघडत चाललीय याचं भान हरवलं.
आकारवाड्यासारखी अनेक नैसर्गिक नंदनवने शाबूत आहेत. काही सुंदर स्थळे आम्ही आमच्यासहित विकायला चाललो आहोत की काय असं विदारक दृश्य दिसतं. जमिनी, शेतजमिनी, डोंगर सगळेच कत्तल करून बिल्डर लॉबीला विकायला लागलो तर इमारतीची जंगले विस्तारतील. डोंगर ओरबाडल्यावर नंतर पश्चात्ताप करून फायदा नाही.
निसर्गाकडे आपण खेळू शकत नाही. समतोल बिघडला की हवामान बदलापासून कित्येक परिणामांना तोंड द्यावे लागेल.
प्रत्येक ऋतुमानाप्रमाणे आकारवाड्याला हरित आच्छादनाचं एक वेगळं बहुरूप, रंग, अंगलोट, आभा कपडे परिधान केल्यासारखे प्राप्त होत असे. जीवन एकसुरी न होता या बदलांमुळे आनंदी होत असे. सहाही ऋतूंचे भवतालातील ऋतुचक्राचे हे सोहळे आम्ही अनुभवले. त्यामुळे शक्तिवर्धक चालना मिळाली.
आतील प्रतिभेचे झरे पुष्ट झाले. आज जे दुष्टचक्र चाललंय ते विनाशाकडे, पतनाकडे जाण्यापासून रोखायला हवं. हिरवाई हा आमच्या जगण्याचा प्राणवायू. त्याचा विसर न व्हावा. उतू नये, मातूही नये.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.