Aviation Safety: अहमदाबाद विमान दुर्घटना आणि समुद्रात बुडालेल्या 'इकारस'ची प्राचीन ग्रीककथा
विकास कांदोळकर
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर इकारसच्या प्राचीन ग्रीककथेची आठवण झाली: ‘इकारस आणि त्याचे वडील डेडालस, यांचा तुरुंगवास. डेडालसने मुलाला उडून पळून जाण्यास मदत करण्यासाठी धातू आणि मेणाचे पंख बनवले. पंख नष्ट न होण्यासाठी मुलाला समुद्र किंवा सूर्याजवळ जास्त उडू नये अशी ताकीद दिली.
महत्त्वाकांशी इकारस उड्डाणाच्या आनंदात भान हरपून खूप उंच उडाला. सूर्याने त्याच्या पंखांचे मेण वितळवून त्याला समुद्रात बुडवले.’ इकारसच्या मिथकावर, विशेषतः चिंतनशील पद्धतीने अभ्यास करताना दिसून येते की मिथक मानवी सामर्थ्यांवर, दोषांवर, महान आकांक्षांवर, तसेच अत्यंत वेदनादायक कमतरतांवर लक्ष केंद्रित करते. यावरून पुराणकथा का टिकून राहतात यांचे रहस्य उमगते.
तसेच आपण केवळ नवीन कथा निर्माण करण्याऐवजी, जतन होऊ शकणाऱ्या विस्तृत इतिहासावर लक्ष केंद्रित न करता, सर्जनशील अभिव्यक्तीसाठी मिथकांचा वापर का करतो यांचे ज्ञान येते.
मानवाची आकाशात झेप घेण्याची इच्छा प्राचीन आहे. रामायण, इकारस, इ. मिथकांपासून ते आधुनिक विमानांपर्यंत, उड्डाणकलेने मानवजातीला नव्या उंचीवर नेले. परंतु, या तंत्रज्ञानाचा वापर मानवतेच्या शांतता आणि प्रगतीबरोबर विध्वंसासाठीही झाला. अहमदाबाद विमान दुर्घटनेने आणि त्यानंतरच्या बेजबाबदार विधानांनी मानवी संवेदनशीलतेचा अभाव अधोरेखित झाल्यामुळे, उड्डाण कलेच्या विकासाचा, त्याच्या सकारात्मक-नकारात्मक पैलूंचा आणि जबाबदारीच्या आढावा घेणे गरजेचे वाटले.
उड्डाण कलेची सुरुवात प्राचीन काळात चीनमध्ये पतंगांपासून झाली. उड्डाण यंत्रांचे डिझाइन करण्याचा मान १५व्या शतकातील लिओनार्दो-दा-विंची यांना दिला जातो. त्यांच्या काळात प्रत्यक्ष उड्डाण शक्य झाले नाही.
१७८३मध्ये मॉन्टगॉल्फियर बंधूंनी गरम हवेच्या फुग्यांचा शोध लावला, ज्याने मानवाला प्रथम आकाशात उडण्याची संधी दिली. १९०३मध्ये राइट बंधूंनी पहिले यशस्वी मोटारचलित विमान उडवून उड्डाण कलेच्या नव्या युगाची सुरुवात केली.
१९२०-३०च्या दशकात व्यावसायिक उड्डाणे सुरू होऊन १९५०च्या दशकात जेट इंजिनच्या आगमनाने हवाई प्रवास अधिक जलद आणि कार्यक्षम झाला. भारतात, १९३२मध्ये एअर इंडियाची स्थापना झाली.
आज भारतात दरवर्षी २४० दशलक्ष प्रवासी हवाई प्रवास करतात. विमानाच्या शोधामुळे प्रवास आणि मालवाहतुकीत क्रांती झाली. जगात जलदगतीने प्रवास झाल्यामुळे व्यापार, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढली, रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना मिळाली.
शांततापूर्ण हेतूंना चालना देणाऱ्या उड्डाण कलेचा युद्धातील वापर विध्वंसक ठरला. पहिल्या महायुद्धात विमानांचा वापर टेहळणीसाठी आणि बॉम्बहल्ल्यासाठी झाला, तर दुसऱ्या महायुद्धात, जर्मन ‘लुफ्टवाफे’चे युरोपवर हवाई वर्चस्व दिसले आणि हिरोशिमा आणि नागासाकीवरील अणुबॉम्ब हल्ल्यांनी विमानांच्या विनाशकारी शक्तीचे आकलन झाले. सद्य:स्थितीत, अनेक देश आपली ‘हवाईशक्ती’ वाढवण्यासाठी अब्जावधी रुपये खर्च करतात, ज्यामुळे शांततेऐवजी विध्वंसाला प्रोत्साहन मिळते.
विमान अपघात ही उड्डाण कलेची दुर्दैवी बाजू आहे. तांत्रिक बिघाड, मानवी चूक किंवा हवामानामुळे होणारे अपघात बहुतेकवेळा मोठी जीवितहानी करतात याची भूतकाळात अनेकवेळा जाणीव झाली आहे.
अलीकडेच, अहमदाबाद येथे एअर इंडियाचे ‘बोइंग ७८७ ड्रीमलायनर फ्लाइट’, लंडनला जाताना उड्डाणानंतर काही सेकंदांत कोसळले. या दुर्घटनेत २४२पैकी २४१ प्रवाशांचे आणि जमिनीवरील कित्येक नागरिकांचे होरपळून मृत्यू झाले. ‘ब्लॅक-बॉक्स’मधील माहितीमुळे अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होण्याची ‘आशा’ आहे.
केंद्रीय मंत्र्यांचे घटनास्थळाला भेट दिल्यानंतरचे बोलणे आणि वागणे अत्यंत बेजबाबदारीचे आणि मानवी संवेदनशीलतेचा अभाव असल्याचे जाणवले. विमान अपघात रोखण्यासाठी सुरक्षा प्रोटोकॉल आणि नियामक यंत्रणांकडे ध्यान केंद्रित न करता जनतेचे लक्ष्य भलतीचकडे वळविण्याचे प्रयत्न, सुरक्षा उपाययोजनांचे महत्त्व कमी करणारे तसेच पीडितांवर अन्याय करणारे वाटले. निष्पक्ष चौकशीसाठी सर्व ‘संबंधितांचे’ राजीनामे उचित ठरले नसते का?
मृतांच्या कुटुंबीयांना केवळ आर्थिक मदत पुरेशी नसून जबाबदारी-निश्चिती, पारदर्शक-तपास आणि सुरक्षिततेबाबत कठोर कारवाईची आवश्यकता आहे. भारताचा सुरक्षा-स्कोर जागतिक सरासरीपेक्षा जास्त असला तरी हवाई वाहतूक नियंत्रणातील रिक्त जागा, तंत्रज्ञानाचा अभाव आणि अपघात तपास ही आव्हाने कायम आहेत. ‘ब्लॅक-बॉक्स’ विश्लेषणातून मिळालेल्या निष्कर्षांवरून, सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये सुधारणा करून, भविष्यातील अपघात टाळले पाहिजेत.
उड्डाण कलेने मानवाला आकाशात झेप घेण्याची शक्ती दिली, पण तिच्या दुरुपयोगामुळे आणि निष्काळजीपणातून होणाऱ्या अपघातांमुळे मानवतेच्या प्रगतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. अहमदाबाद दुर्घटनेने सुरक्षा आणि जबाबदारीच्या मुद्द्यांना अधोरेखित केले आहे. तंत्रज्ञानाचा वापर शांतता आणि प्रगतीसाठी केला पाहिजे, विध्वंसासाठी नव्हे. ‘देशी आणि जागतिक उड्डाणांत’ वर्चस्व स्थापू पाहणाऱ्या ‘अतिमहनीय’ व्यक्तींनी, आपली ‘जबाबदारी’ ओळखून, समाजाच्या संवेदनशीलतेचा आदर राखून, तंत्रज्ञानाच्या आणि मानवी ‘सुरक्षा-मानकांचे’ उचित पालन करून, अशा दुर्घटना टाळणे योग्य नव्हे काय?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.