Acid Attack Goa: 'न्यायव्यवस्था न्याय देऊच शकत नाही, आपल्यालाच करावं लागेल' चित्रपटांनी रुजवलेली मानसिकता धारगळ ॲसिड हल्ल्याला जबाबदार?

Attack Goa: धारगळ येथे अ‍ॅसिड हल्ल्याच्या प्रकाराला अनेक आयाम आहेत. त्याकडे केवळ एक घटना म्हणून पाहून चालणार नाही.
Acid Attack Goa
Acid Attack GoaDainik Gomantak
Published on
Updated on

धारगळ येथे अ‍ॅसिड हल्ल्याच्या प्रकाराला अनेक आयाम आहेत. त्याकडे केवळ एक घटना म्हणून पाहून चालणार नाही. सामाजिक पातळीवरील स्थित्यंतरांमुळे उद्भवणाऱ्या परिणामांच्या शृंखलेतील तो एक अतिव दु:खद प्रकार! दोन पौगंडावस्‍थेतील मुलांमधील मैत्री, त्यातून निर्माण झालेले आकर्षण आणि पालकत्व या परिघातून पुढे अनपेक्षित लाभलेले वळण भलत्‍याच मार्गाला येऊन ठेपले.

कळणे-दोडामार्ग येथील एक युवती शिकण्यास म्हापशात येते. तेथे समवयस्क युवकाशी तिचा झालेला परिचय, निर्माण झालेला स्नेह व त्‍यामधून नाजूक भावबंधातून मुलीचा झालेला मृत्यू आणि त्यास मुलीच्या वडिलांनी युवकास जबाबदार धरून त्याच्यावर केलेला अ‍ॅसिड हल्ला हे ‘मला वाटते तीच खरी बाजू’ या बळावलेल्या सामाजिक वृत्तीचे दर्शन आहे.

मुलीच्या मृत्यूने व्यथित पित्याला कायद्याचा आधार घेण्यास कोणी रोखले नव्हते. परंतु त्याने बदला घेण्याचा चुकीचा मार्ग अवलंबला. अल्पवयीन मुलांमुलींमध्ये आकर्षण निर्माण होणे मानसशास्त्रीयदृष्ट्या गैर नाही. ती भावना येते आणि जातेही. ती ज्याच्या मनात राहते त्याला भयंकर त्रास होतो. अर्थात अशा नाजूक स्थितीत पालक हे मुलांसोबत परिपक्वपणे की हुकूमशहासारखे वागतात, यावर बऱ्याच बाबी अवलंबून राहतात.

Acid Attack Goa
Goa Politics: पक्षशिस्त मोडल्यास 'डायरेक्ट अ‍ॅक्शन', दामू नाईकांचा आर्लेकर-आजगावकर यांना इशारा; म्हणाले, "सांगणार नाही, थेट कारवाईच करणार"

उपरोक्त प्रकरणातील मुलीचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला, जो संशयास्पद असल्याचा तिच्या कुटुंबीयांचा दावा होता. त्यामधून पुढे सूडनाट्य घडले. मुलांचे पालकांशी मैत्रिपूर्ण संबंध राहिल्यास आयुष्यातील सुखदु:खे ‘शेअर’ केली जातात. संस्‍कारक्षम वयात मुलांसोबत आई-वडील लागतात. नातेवाइकांकडे तरल भावना कशा जपल्या जाणार? पालकांकडूनच पाल्ल्यांना भावनिक साथ लागते. परंतु कळणेतील त्या युवतीच्या नशिबी ते नव्हते.

तसेच सतरा वर्षीय युवक, ज्याला अद्याप आयुष्याची पुरती तोंडओळखही झालेली नाही, त्याच्या बदल्याची मानसिकता अघोरीच. काहीही झाले की कायदा हाती घेऊन स्वत: न्याय करण्याची वृत्ती घातक आहे. सत्तरीतील बर्वे खून प्रकरणात तेच घडले होते. संवाद वाढावा, ही काळाची गरज बनली आहे.

सरकार, प्रशासन व न्यायव्यवस्था आपल्याला न्याय देऊच शकत नाही, अशा अत्यंत नकारात्मक भावनेतून अलिकडे गुन्हे घडू लागले आहेत. पूर्वी सर्व पर्यायांचा विचार केला जात असे. त्यात सामाजिक, कायदेशीर, सनदशीर मार्ग स्वीकारले जात असत व त्यांना कार्य करायला आवश्यक वेळ दिला जात असे. झालेला अन्यायही न्याय्य मार्गातून न्याय मिळवूनच दूर केला जात असे. आज तशी परिस्थिती का नाही, याचा विचार करण्‍याची वेळ आली आहे.

पोलिस यंत्रणा योग्य तपास करेल की नाही, केलाच तर खऱ्या दोषीचा गुन्हा न्यायालयात सिद्ध करू शकतील की नाही, सिद्ध करू शकले तर न्याय मिळेल की नाही, या सगळ्या प्रश्नांची शृंखला उभी राहते. यातून जे उत्तर शोधायचे त्याची भूमिका चित्रपट माध्यमांनी आधीच तयार केली आहे. ‘आपल्याला व्यवस्थेकडून न्याय मिळणार नाही; आपल्यालाच तो करावा लागेल’, ही मनोभूमिका अगदी ‘स्लो पॉयझनिंग’सारखी चित्रपटांनी रुजवली.

Acid Attack Goa
Goa Made Liquor Seized: गोव्यातून कर्नाटकला दारू तस्करी, शक्कल लढवली पण... 12 लाखांचे मद्य जप्त

झुरळ मारायला घाबरणारे सहजपणे माणसे मारू लागले. कथा, कादंबऱ्यांतही गेल्या काही दशकांत जे ऐतिहासिक किंवा मूळ लिखाणात खलपुरुष होते त्यांना ‘त्यांच्यावर अन्याय झाल्याने ते तसे वागले’, अशा गोंडस विचारांखाली महान बनवण्यात आले. याचा परिणाम असा झाला की, प्रत्येक न्याय हाती तलवार घेऊनच मिळवण्याची वृत्ती वाढली. दुसरी बाब अशी- सरकार, प्रशासकीय यंत्रणा नियमांचा वापर अडवणुकीसाठी करते, तेव्हा ते पाळलेच पाहिजेत हे समाजमनावरील बंधन आपसूक नाहीसे होते. सगळी भीती नाहिशी होते.

एका वेगळ्याच अर्थाने माणसे निर्भय बनतात. पापभिरू असणे हा मूर्खपणा ठरतो. ‘बदला’ घेणे हे पौरुष ठरते. सगळ्याच गुन्ह्यांना गोंडस नावे व कारणे ठरवली जातात. समाजमनाने इतकी दशके जे पेरले आहे, तेच उगवत आहे. ‘न्याय मिळेल’ हा पूर्वी असलेला विश्वास पुन्हा रुजवण्यासाठी प्रत्येकाला अनंत काळ, अतोनात प्रयत्न करावे लागतील. ‘बदला’ घेणे सोडून बदलावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com