...तर पत्रकार कसा असावा? - संपादकीय

Lokmanya Tilak Journalism: एक ऑगस्ट म्हणजे टिळक पुण्यतिथी हा दिवस गोव्यात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. लोकमान्य टिळक हे झुंजार पत्रकार होते.
Lokmanya Tilak
Lokmanya TilakDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

एक ऑगस्ट म्हणजे टिळक पुण्यतिथी हा दिवस गोव्यात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. लोकमान्य टिळक हे झुंजार पत्रकार होते. पण त्यावेळी पत्रकारितेची व्याख्या वेगळी होती. त्यावेळी ब्रिटिशांचे साम्राज्य असल्यामुळे पत्रकारिता हे हत्यार म्हणून वापरले जायचे. लोकमान्यांनी या हत्याराचा वापर फारच प्रभावीपणे केला. केसरी या मराठा वृत्तपत्राने तर त्या काळात ब्रिटिश साम्राज्यात अक्षरशः थरथराट निर्माण केला होता.

मराठी केसरीबरोबर टिळकांनी मराठा हे इंग्रजी दैनिकही सुरू केले. पण हे दै. ‘केसरी’एवढा प्रभाव टाकू शकले नाही. काळ बदलला तसे पत्रकारितेचे स्वरूपही बदलत गेले. लोकमान्यांच्या काळात पत्रकारितेतून परकीयांशी झगडावे लागत होते.

स्वातंत्र्यानंतर पत्रकारांना स्वकीयांशीच झगडावे लागले. लोकशाही जागृत ठेवण्याकरता ही बाब आवश्यक होती. त्यामुळेच पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा खांब म्हणून ओळखले जाऊ लागले. १४ जुलै १९६१ रोजी पानशेतच्या पुराने पुणे शहराची अक्षरशः दुर्दशा केली होती, पुण्याचा अन्य शहरांशी संपर्कही तुटला होता, तेव्हा मुंबईहून पुण्याला धावून येणारे पहिले पत्रकार अत्रे होते.

चिखलात उभे राहून पुणेकरांच्या तक्रारी ऐकणारे अत्रे मला आजही आठवतात. दुसऱ्या दिवशीचा मराठा हा पुणेकरांच्या याच व्यथांनी भरला होता. सामान्यांविषयी कळवळा दाखविणारी अत्रेंची लेखणी राजकारण्यांना मात्र कोणतीही दयामाया दाखवत नसे. मात्र अत्रेंच्या निधनानंतर ‘मराठा’ची सद्दी संपली.

Lokmanya Tilak
Goa AI Camera E Challan: एआय कॅमेऱ्यांद्वारे ऑटोमॅटिक ई-चलन; 26 ठिकाणी कडक नजर, मडगाव नियंत्रण कक्षातून कारवाई

त्यानंतर माधव गडकरी, नारायणराव आठवले, यांसारख्या पत्रकारांनी पत्रकारितेचा वसा कायम ठेवला. ‘गोमन्तक’चे माजी संपादक नारायणराव आठवले यांनी तर आमच्यासारखे अनेक पत्रकार घडवले.

मडकई होडी दुर्घटना असो वा अन्य कोणतीही सामान्यांना सतावणारी घटना असो आठवल्यांची लेखणी प्रखर व्हायची. मराठी चळवळीला ऊर्जा देणारेही आठवलेच होते. ‘गोमन्तक’मधून तुटो हे मस्तक, फुटो हे शरीर मराठीचा गजर सोडू नये, असे आवाहन करत आमच्यासारख्या युवकांच्या मनावर मराठीप्रेम बिंबविणारेही आठवलेच होते.

Lokmanya Tilak
Goa Crime: 'रोड रेज'च्या वादातून सुरीने वार; तरुण गंभीर, नास्नोळा येथील घटना; संशयिताला अटक

दै. ‘गोमन्तक’ आजही आपली परंपरा सांभाळून आहे. कला अकादमीच्या मराठी ‘अ’ गट नाट्य स्पर्धेतील परीक्षक लाच प्रकरण, गोवा विद्यापीठातील अनागोंदी उजेडात आणून ‘गोमन्तक’ने बाणा कायम ठेवला आहे.

आजकाल पत्रकारितेच्या क्षेत्रावर विश्‍वासार्हतेबद्दलचे जे काळे ढग दाटू लागले आहेत, ते दूर करण्याकरता सर्व पत्रकारांनी कटिबद्ध व्हायला पाहिजे. पत्रकारितेच्या जनहितासाठी निर्भीडपणे समस्यांशी भिडण्याच्या वृत्तीशी प्रामाणिक राहण्याची शपथ घ्यायला पाहिजे. अन्यथा फक्त पत्रकार दिन साजरा करून व लोकमान्यांची महती गाऊन काहीच साध्य होणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com