

सेरेंडिपीटी कला महोत्सवाच्या अनेक स्थानांपैकी दोनापावला परिसरातील नागाळी टेकडीवरील मैदान हे एक महत्त्वाचे स्थान आहे. ऐसपैस परिसर, पार्किंगची सोय वगैरे या स्थानाची वैशिष्ट्ये आहेतच त्याशिवाय इथे सादर होणाऱ्या कार्यक्रमांचे भव्य आणि कलात्मक स्वरूपही वैशिष्ट्यपूर्ण असते. देशातील अनेक गाजलेले, लोकप्रिय कार्यक्रम सेरेंडिपीटी कला महोत्सवाचा भाग बनून या स्थानावर सादर झाले आहेत.
सेरेंडिपीटी महोत्सवात या स्थानावर कुठले कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत याबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता असते. यंदाही 12 ते 21 डिसेंबर अशा 10 दिवसांच्या काळात या जागेवरील दोन भिन्न मंचांवर सादरीकरणे संपन्न होणार आहेत.
पहिल्या दिवशी सादर होणाऱ्या 'पॅलेट्स'मध्ये सॅड्रिक गेग्नेर आणि मार्क ऊस्टरहॉफ हे पॅलेट्स वापरून संतुलन सांभाळण्याच्या क्षमतेवर आधारलेली आव्हानांची मालिका मजेत ओलांडताना दिसतील. नृत्य आणि सर्कस या दोन्हींशी जुळणारे हे सादरीकरण आहे.
त्याच दिवशी सादर होणाऱ्या 'क्ले प्ले'मध्ये मातीपासून बनलेल्या ताल वाद्यांच्या सादरीकरणात गोव्याचे पारंपारिक वाद्य 'घुमट' केंद्रस्थानी असेल. गोव्याची लोकसंस्कृती अधोरेखित करण्यासाठी समेळ, घुम, ढोल ताशा आणि झांज यासारखी इतर प्रादेशिक तालवाद्ये देखील यात सादर होतील.
दुसऱ्या दिवशी सादर होणारा ‘रिव्हिजिट प्रोजेक्ट’ वैशिष्ट्यपूर्णरित्या जाझची जटिलता उलगडून दाखवणारा असेल. या बँडची सुरुवात 2014 मध्ये झाली, ज्यात हिंदी चित्रपट संगीतातील जुन्या खजिन्याला समकालीन फ्युजन स्पर्श दिला गेला.
त्याच दिवशी सादर होणारा 'मोटाऊन मॅडनेस' हा एका विशिष्ट पिढीला भारून टाकणाऱ्या आवाजाचा एक ऊर्जा उत्सव असेल. मायकल जॅक्सनसारख्या कलाकारांच्या सुवर्ण काळापासून प्रेरित झालेले हे सादरीकरण आहे.
तिसऱ्या दिवशी भारतीय शास्त्रीय संगीताचा समृद्ध वारसा उलगडणाऱ्या 'फेडिंग ट्रॅडिशन्स, इमर्जिंग साउंड्स' या कार्यक्रमात जेष्ठ आणि नवीन प्रतिभावान संगीतकारांमधील प्रदर्शनातून एक शक्तिशाली संवाद निर्माण होताना दिसेल.
पं. विश्वमोहन भट्ट (मोहन वीणा), मुराद अली (सारंगी) अश्विनी शंकर (शहनाई) या कसलेल्या भारतीय शास्त्रीय संगीतकारांबरोबर अनेय गाडगीळ (कीबोर्ड) प्रणव डाथ (ड्रम्स) अनुपम शोभाकर (गिटार) आणि इतरांचे हे सांगीतिक मिश्रण हा केवळ एक प्रयोग नाही तर सांस्कृतिक भूतकाळ आणि कलात्मक नवता यांचा एक अर्थपूर्ण शोध आहे.
चौथ्या दिवशी 'रिफ्लेट' (समकालीन नृत्य, हिपहॉप, रोलर स्केटिंग आणि दृश्य कला यातून निर्माण झालेले संवेदी जग), 'ओशन्स विंड्स' (इंडो ऑस्ट्रेलियन जाझ ग्रुप), 'वारसो' (प्रेमाच्या असंख्य छटांची जाणीव करून देणारा सेरेंडिपीटी साऊंडस्केप) हे कार्यक्रम सादर होतील.
पाचव्या दिवशी 'रिफ्लेट' बरोबर 'नाद वोयाज' (प्रथमेश च्यारी, सोनिक वेलिंगकर आणि वसीम खान या प्रतिभावान गोमंतकीय संगीतकारांचे सादरीकरण) आणि ‘उस्ताद’ हा कार्यक्रम सादर होईल. पं. झाकीर हुसेन यांना वाहण्यात येणाऱ्या ‘उस्ताद’ या संगीतमय श्रद्धांजलीत, ज्यांच्यावर उस्तादजींचा प्रभाव होता त्या संगीतकाराची एक प्रतिभावान पिढी जाझ, भारतीय शास्त्रीय, समकालीन संगीताचे सादरीकरण करतील. हा एक आनंदी संगीतमय उत्सव असेल.
सहाव्या दिवशी ‘ताल.इंक’ आपल्या 'ड्रम सर्कल'द्वारे ड्रम सर्कलचे फायदे आणि त्यात निहीत असलेला उपचारात्मक आनंद त्यांची ओळख करून देतील. त्यानंतर ‘दर्द ए डिस्को’ या सांगीतिक कार्यक्रमातून बॉलीवूड डिस्कोचा सुवर्णकाळ पुन्हा आठवला जाईल. बप्पी लहरी, कल्याणजी आनंदजी, बिड्डू यासारख्या संगीतकारांची लोकप्रिय गाणी आपल्याला पुन्हा जुन्या काळात नेतील.
सातव्या दिवशी सादर होणाऱ्या 'द गोल्ड स्टॅंडर्ड' मधून बॅलड्स, ब्लूज यातून पाश्चात्य संगीताच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. मॅन ऑफ द गोल्डन व्हॉइस म्हणून ओळखला जाणारा गॅरी लॉयर, बिजलीसारखी गाणारी वसुंधरा वी यांच्या सादरीकरणातून जाझचे समकालीन रूप स्पष्ट होऊ शकेल.
आठव्या दिवशी ‘कोकण फंक’ या कार्यक्रमामधून कोकण प्रदेशातील समृद्ध पारंपारिक संगीताची पुनर्मांडणी अनुभवता येईल. त्याच दिवशी सादर होणारे 'वाइल्ड वाइल्ड वुमन' हे भारतातील पहिल्या पूर्ण महिला हिप हॉप ग्रुपचे सादरीकरण हे न चुकवता येण्याजोगे असेल. मुंबईच्या रस्त्यांवर रुजलेली आणि अनेक भारतीय भाषांमध्ये अस्ख्खलित असलेली ही टीम पितृसत्ताकता, जातीयता, लिंगभेद यांना आव्हान देतेच परंतु त्याशिवाय प्रभावीपणे राजकीय भाष्यही करते.
नवव्या दिवशी 'क्रॅश' (जुगलबंदी स्वरूपात सादर होणारे भारतीय आणि डॅनिश नर्तकांचे सादरीकरण) या नृत्य सादरीकरणानंतर 'जटायू' हा चेन्नईमधील बँड कर्नाटक संगीत, जाझ आणि रॉक यांच्या मिश्रणातून भारतीय फ्युजनचे एक आगळे रूप सादर करेल. प्राचीन आणि आधुनिक, स्थानिक आणि जागतिक, पारंपारिक तरीही प्रयोगशील अशा ध्वनींमधून सादर होणारा हा आकर्षक प्रयोग आहे.
21 डिसेंबर रोजी, अंतिम दिवसाची 'टेईन टेईन टू टू लिव्ह' ही स्नेहा खानवलकर यांची मैफल ही रंग, कुतूहल आणि खेळकरपणा यात रंगलेल्या सेरेंडिपीटी कला महोत्सवाचा परिपूर्ण समारोप करणारी एक जादुई मैफल असणार आहे. यात अनेक लोकप्रिय आणि आवडती गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.