Konkani Drama Competition: कल्पकतेचे साक्ष देणारे, विलक्षण अनुभूतीचे नाट्य 'भोगपर्व'

Bhogparva Konkani Drama: वैभव कवळेकर यांची ही संहिता एक थोडासा घमेंडी राजा धनंजय ऊर्फ राया, त्याचा मित्र प्रजय व त्याची प्रेयसी पण नंतर महाराणी झालेली संजीवनी या तिघांभोवती फिरते.
Bhogparva Konkani Drama
Bhogparva Konkani DramaDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: कालच्या रटाळ प्रयोगामुळे कला अकादमीच्या ५०व्या कोकणी नाट्यस्पर्धेचा कमी झालेला वेग आजच्या सियावर राम गिमोणे-डिचोली या संस्थेने सादर केलेल्या ‘भोगपर्व’ या नाटकाच्या प्रयोगाने परत एकदा गतिमान झाला. लेखन-दिग्दर्शन-अभिनय व तांत्रिक बाबी यांचा उत्कृष्ट समन्वय साधल्यावर कशी विलक्षण अनुभूती मिळू शकते, याचा प्रत्यय देणारा असा हा उत्कट प्रयोग. स्पर्धेतील हे १४वे पुष्प.

वैभव कवळेकर यांची ही संहिता एक थोडासा घमेंडी राजा धनंजय ऊर्फ राया, त्याचा मित्र प्रजय व त्याची प्रेयसी पण नंतर महाराणी झालेली संजीवनी या तिघांभोवती फिरते. एका अरण्यात गेलेल्या राया व प्रजय यांना एक वाघ एका मेरूची शिकार करताना दिसतो आणि हे दृश्य रायाच्या स्वप्नात परत परत यायला लागते.

इथे प्रजय व संजीवनी एकमेकांवर प्रेम करत असतात; पण राया तिला बळजबरीने आपली राणी करतो आणि ती दोघे एकत्र आलेली पाहून राया ‘प्रजय’ला तुरुंगात घालतो व रागाने त्याचे हात तोडतो; पण नपुंसक असलेल्या रायाला आपला वंश वाढवण्याकरता अपंग प्रजयचीच मदत घ्यावी लागते.

तो त्याला एका अरण्यात एक ‘बुटी’ आणायला पाठवतो; पण चुकीने त्या बुटीचा प्रसाद तो स्वतः प्राशन करतो आणि गरोदर राहतो. यातून काय निष्पन्न होते, याचे उत्तर नाटकाच्या उत्तरार्धात मिळते. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी अशी ही बंदिस्त संहिता.

या संहितेला थोडे राजकीय कंगोरेही आहेत. यात राजाविरुद्ध कारस्थाने करणारे आणि त्यात यशस्वी होणारे तीन मंत्रीही आहेत. मात्र, पुरुष गरोदर राहतो हे न पटणारे; पण कल्पनाविलास म्हणून ठीक आहे. कटकारस्थान हा व्यवस्थेचाच एक भाग, मुक्ती म्हणजे मनाची अवस्था, नियती माणसाला वाट दाखवते, अशा प्रकारच्या संवादांतून वास्तव्य सूचित केले आहे.

कवळेकरांच्या बंदिस्त संहितेला ‘चार चांद’ लागू शकले ते अश्वेश गिमोणकर यांच्या सजग दिग्दर्शनामुळे. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत गिमोणकरांची या माध्यमावर असलेली पकड प्रतीत होत होती.

मग तो रायाचा अंतरात्मा बोलतो तो प्रसंग असो वा प्रजयचे हात तोडतात तो प्रसंग वा तीन मंत्री कटकारस्थान करतात तो प्रसंग वा प्रजय-संजीवनीचा प्रणय प्रसंग वा मध्यंतराच्या वेळी येणारा धूर वा रायाच्या स्वप्नात येणारे वाघ व मेरू असो.

प्रत्येक प्रसंग दिग्दर्शकाच्या कल्पकतेचे साक्ष देणारे होते. यामुळे अडीच तासांचा हा प्रयोग कुठेच कंटाळवाणा झाला नाही. राया आक्रोश करताना संजीवनीने तटस्थ उभे राहणे हा नाटकाचा शेवट प्रेक्षकांना अंतर्मुख करून गेला.

त्यांनी पुऱ्या रंगमंचाचा योग्य वापर करून प्रयोगाला गती मिळवून दिली. त्यांची स्वतःची प्रकाशयोजना असल्यामुळे दुधात साखर पडल्यासारखे झाले. यातले अनेक प्रसंग केवळ प्रभावी प्रकाशयोजनेमुळे सजीव होऊ शकले. खासकरून अरण्यात एकटा गेलेल्या प्रजयकडे अदृश्य शक्ती बोलते तो प्रसंग वा राया मरणाच्या दारात असताना त्याचा अंतरात्मा बोलतो तो प्रसंग; केवळ प्रकाशयोजनेमुळे जिवंत होऊ शकले.

Bhogparva Konkani Drama
Konkani Drama: सर्जनशीलतेचा प्रत्यय देणारी व्हिजुअल ट्रिट - ‘इन सर्च ऑफ सर्वायव्हल’

यातले तिन्ही प्रमुख कलाकार बाजी मारून गेले. साईनंद वळवईकर यांनी घमेंडी राजा मोठ्या झोकात उभा केला. त्यांचा शेवटचा आक्रोश तर काळजाला हात घालणारा होता. त्याचा मित्र प्रजयच्या भूमिकेत संघर्ष वळवईकर लोकांची मने जिंकून गेले.

अपंग झाल्यानंतरची त्यांची देहबोली तर अफलातून होती. संजीवनीच्या भूमिकेत तस्लिमा मयेकर चांगल्या शोभल्या. प्रजयबरोबरच्या प्रणय प्रसंगांएवढेच त्यांनी रायाबरोबरचे संघर्षमय प्रसंगही प्रभावीपणे साकारले. त्यांचा मुद्राभिनय तर दाद देण्यासारखाच.

Bhogparva Konkani Drama
Konkani Drama Competition: वृद्धांच्या व्यथा मांडणारी उत्कृष्ट कलाकृती, 'बापू-गांधी'

संजय फाळकर, प्रकाश पाळणी व गोकुळदास गावस यांनी मंत्र्यांचा कावेबाजपणा समर्थपणे अधोरेखित केला. ज्ञानदीप च्यारी यांच्या सुबक नेपथ्यामुळे प्रयोगाला उठाव प्राप्त होऊ शकला. त्याचप्रमाणे संजय गावस यांच्या ‘टू द पॉइंट’ पार्श्वसंगीतामुळे योग्य वातावरण निर्मिती होऊ शकली. एकंदरीत ‘भोगपर्व’ नाटकाचा प्रयोग प्रेक्षकांना एक विलक्षण अनुभूती देण्याबरोबर स्पर्धा एकदम कळसावर घेऊन गेला एवढे निश्चित. त्याबद्दल संपूर्ण संचाचे हार्दिक अभिनंदन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com