Konkani Drama Competition: युगान्त, ज्योतिष शास्त्राचे कंगोरे उलगडणारा नेटका प्रयोग; नाट्यसमीक्षा

Yugant Play Review: प्रस्तुत नाटकाला पैकीच्या पैकी गुण देता येत नसले तरी एक सुविहित आणि मुख्य म्हणजे स्पर्धेला पूरक असा प्रयोग सादर केल्याबद्दल संस्थेचे कौतुक करावेच लागेल.
Yugant Play Review, Konkani Drama Competition
Yugant Play ReviewDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

कला अकादमीची नाट्य स्पर्धा आता ऐरणीवर यायला लागली आहे. कालच्या ‘बॉफेस्त’ या नाटकाने थोडाफार आकुंचित झालेला स्पर्धेचा आलेख आजच्या श्री ओम साई दामोदर सांस्कृतिक संस्था नवेवाडे वास्को या संस्थेच्या ‘युगान्त’ या नाटकाने परत रुंदावला गेला. प्रस्तुत नाटकाला पैकीच्या पैकी गुण देता येत नसले तरी एक सुविहित आणि मुख्य म्हणजे स्पर्धेला पूरक असा प्रयोग सादर केल्याबद्दल संस्थेचे कौतुक करावेच लागेल.

भरत नायक यांच्या ज्योतिष शास्त्रावर आधारित असलेल्या या संहितेला बरेच कंगोरे असल्याचे दिसून येते. तसा हा व्यापक विषय. त्यामुळे या विषयाला हात घालणे, हे तसे आव्हानच. इंद्रकान्त हा ज्योतिष विद्येचा गाढा अभ्यासक असतो.

ज्योतिष विद्या हे एक शास्त्र असून त्याचा अभ्यास केल्यास त्याचा फायदा समाजाला होऊ शकतो, ही त्याची धारणा. त्याचा कुंडलीवर गाढा विश्वास. म्हणूनच तर कुंडली जमत नाही, म्हणून तो आपल्या मुलीला आलेल्या अनेक सोयरिकी नाकारतो. त्यामुळे कंटाळून त्याची मुलगी निमा मुसलमान अब्दुलाशी लग्न करून मोकळी होते.

राजन आणि रेश्मा या जोडप्याला इंद्रकान्त रेश्माला राजनपासून तिला मूल होणे शक्य नाही, असे सांगतो. त्यामुळे रेश्मा इंद्रकान्तचा मुलगा प्रकाश याच्याशी सूत जुळवून मोकळी होते. ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करून आपला वारसा पुढे चालवावा म्हणून इंद्रकान्तने आपल्या दोन्हीही मुलांना केलेली विनंती मुले नाकारतात.

इंद्रकान्तला एकाकी सोडून मुलगा व मुलगी घर सोडून जातात. त्यात परत इंद्रकान्त आपल्या मिशनमध्ये अपयशी ठरला म्हणून त्याचे दिवंगत वडील त्याला सारखे डिवचत असतात. म्हणजे तसा त्याला सारखा आभास होत असतो. आता इंद्रकान्तला त्याचा वारसदार मिळतो की काय? हा या नाटकाचा उत्तरार्ध. लेखक भरत नायक यांनी या संहितेत बरेच प्रश्न अधोरेखित केले आहेत.

ज्योतिष शास्त्र हे शास्त्र किती संयुक्तिक आहे, ते नेहमी बरोबर ठरते की नाही, याचे उत्तर त्यांनी प्रेक्षकावर सोडले आहे. दोन्ही बाजूंचा मागोवा घेण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्यच म्हणावा लागेल. रायकर नावाच्या उद्योगपतीला सिंगापूरला जाऊ नको, काहीतरी वाईट होईल, असे जे इंद्रकान्त सांगतो, ते त्या विमानाला अपघात झाल्यामुळे खरे ठरते आणि रायकराचे प्राण वाचतात.

दुसऱ्या बाजूला राजनला मूल होऊ शकणार नाही, असे जे भविष्य इंद्रकान्त सांगतो, ते त्याला मूल झाल्यामुळे खोटे ठरते. त्यामुळे लेखकाने हा प्रश्न खुल्या मैदानासारखा ओपन ठेवल्याचे ठायी ठायी प्रतीत होते.

दिग्दर्शक अरविंद शिंदे यांनी भरत नायकांची ही आव्हानात्मक संहिता चांगल्या प्रकारे पेश केली. रंगमंचावर कमी पात्रे वावरत असल्यामुळे त्यांना योग्य मुव्हमेंट देऊन त्यांचे ट्युनिंग साधण्याचा त्यांचा प्रयत्न बऱ्याच प्रमाणात सफल झाल्याचे जाणवले. तरीसुद्धा काही ठिकाणी पात्रांचा मेळ न जमल्यामुळे नाटक रेंगाळल्यासारखे झाले, हेही तेवढेच खरे.

तरीही दिग्दर्शकाने रंगमंचावर उभारलेल्या विस्तृत नेपथ्याला बऱ्यापैकी न्याय दिला, असेच म्हणावे लागेल. पहिला अंक आटोपशीर होता. दुसरा अंक मात्र ताणल्यासारखा आणि त्यामुळे थोडा कंटाळवाणा वाटला. दुसऱ्या अंकातील कमीत कमी दहा मिनिटे तरी संकलित करायला हवी होती, असे राहून राहून वाटत होते. त्यामुळे नाटकाचा परिणामही वाढू शकला असता. नाटकाचा शेवट मात्र समर्पक वाटला. भूमिकांत बाजी मारली, ती इंद्रकान्तची भूमिका साकारलेल्या महेश नावेलकर यांनी.

Yugant Play Review, Konkani Drama Competition
Konkani Drama Competition: ‘बॉ फेस्त’, न रंगलेले रहस्यनाट्य; नाट्यसमीक्षा

संपूर्ण नाटकाचा डोलारा या प्रमुख पात्रावर असल्यामुळे नावेलकरांवर मोठी जबाबदारी होती आणि ती जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. यात शंकाच नाही. संवाद डिलिव्हरी बरोबर त्यांचा मुद्राभिनयही वाखाणण्यासारखाच होता. खास करून मुलगामुलगी घर सोडून गेल्यानंतर त्यांनी केलेला विलाप व त्यांच्या तोंडी असलेले जीवनाची सच्चाई अधोरेखित करणारे संवाद रसिकांकडून दाद घेऊन गेले.

दुसरा उल्लेख करावा लागेल, तो शांताराम झालेल्या चंद्रकांत मांजरे करांचा. काहीशा विक्षिप्त वाटणारा, पण इंद्रकान्त व त्यांच्या कुटुंबीयांवर जिवापाड प्रेम करणारा शांताराम मांजरेकरांनी मोठ्या झोकात उभा केला.

Yugant Play Review, Konkani Drama Competition
Konkani Drama Competiton: ऊठ गा देवा! गोंयकरांचे प्रश्न मांडणारे सादरीकरण; नाट्यसमीक्षा

इतर पात्रांनीही आपापल्या भूमिकांना न्याय देऊन प्रयोगात मजा आणली. प्रवीण दाभोलकर यांचे नेपथ्य अगदी ‘टू दी पॉईंट’ वाटले. नितेश नाईक यांनी दिलेले पार्श्वसंगीत प्रयोगाला पूरक असे आणि त्या त्या मूडमध्ये नेणारे होते. दीपक म्हापणकर यांची प्रकाश योजनाही समयोचित अशी होती. एकंदरीत एका वेगळ्या विषयाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करणारे हे नाटक बरेच काही सांगून गेले असले तरी काही खास करून दुसऱ्या अंकातील त्रुटीमुळे अपेक्षे एवढी झेप घेऊ शकले नाही. एक नीट नेटका प्रयोग बघण्याचे समाधान मात्र प्रेक्षकांना मिळू शकले, एवढे खरे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com