
मिलिंद म्हाडगुत
गेले तीन दिवस कला अकादमीच्या कोकणी नाट्य स्पर्धेत ‘एक से बढकर एक’ असे जबरदस्त आविष्कार बघायला मिळत आहेत. राकस व घट्टाण.. कोणाचें, पाठोपाठ आता गौरी तनय कला संघ धोणशी, नागेशी या संस्थेने सादर केलेल्या ‘ऊठ गा देवा’ या नाटकानेही स्पर्धेची रंगत वाढविली.
हे नाटक वस्तुस्थितीचे यथार्थ दर्शन घडविण्याबरोबरच प्रेक्षकांना अंतर्मुख व्हायलाही भाग पडते. आज गोव्यात देवाच्या जागासुद्धा बिल्डरांच्या घशात जाऊ लागल्यात, याचे वेधक चित्रण या नाटकात केले आहे. ३३ कलाकार असूनही नाटकाची पकड कोठेही ढिली होताना दिसत नाही. तुळशीदास धोणशीकर यांनी लिहिलेली ही संहिता प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते.
गावातला भाटकार देवाची जागा बिल्डरला विकतो. मात्र, वृद्ध दादी त्याला विरोध करतो. सुरुवातीला सारा गाव त्याच्यासोबत असतो. पण नंतर भाटकाराने पाच-पाच हजार रुपये दिल्यावर सगळा गाव भाटकाराकडे जातो.
अगदी दादीचा पुत्र रवीसुद्धा भाटकाराची साथ देतो. गावचा सरपंच व मंत्रीसुद्धा भाटकारासोबत असल्यामुळे तो बिनधास्त होतो. तो, त्याचे साथीदार, सरपंच, मंत्री, दादीचा पुत्र रवी सर्वजण दादीवर दबाव आणतात. रवी दादीला घराबाहेर काढतो, तर गावकरी त्याला गावाबाहेर काढतात. दादीबरोबर राहते ती एक गरीब छोकरी चिमणी.
नंतर त्याला भेटते वकील आरती. आणि इथून लढा सुरू होतो. ती जमीन मिराबाई या निपुत्रिक बाईने देवासाठी दान दिलेली असते. तिची जबाबदारी देवस्थानच्या कमिटीकडे दिलेली असते. पण भाटकाराने पैसे देऊन ती जमीन आपल्या नावावर करून घेतलेली असते. वकील आरती दादीची केस कोर्टात लढवते.
पण ते करताना तिला आणि दादीला अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. अगदी दादीला मारण्यापर्यंत त्यांची मजल जाते. दादीवरचा हा घोर अन्याय पाहून देव कसा उठतो, हा या नाटकाचा उत्तरार्ध. ही नाट्यसंहिता बऱ्याच प्रमाणात आजच्या परिस्थितीचे दर्शन घडविते. मंत्री आणि सरपंच हे पैसे मिळाल्यानंतर दादीची कशी ‘गेम’ करतात, पैशासाठी गावकरी दादीला कसे एकटे पाडतात, याचे वस्तुनिष्ठ चित्रण या नाटकात केले आहे.
शेवटी देव जागा होतो, हे दाखवून लेखकाने वाईट कृत्यांचा शेवट वाईटच होतो, हा संदेशही दिला आहे. धोणशीकर यांनीच हे नाटक दिग्दर्शित केल्यामुळे ते संहितेतील बारकावे समर्थपणे हाताळू शकले.
मुळात हे नाटक दिग्दर्शित करणे आव्हानच. एका बाजूला पात्रे भरपूर, तर दुसऱ्या बाजूला प्रवेशही भरपूर. त्यामुळे नाटकाचा बाज बिघडू नये, याची दक्षता दिग्दर्शकाने घेणे आवश्यक होते. ती जबाबदारी धोणशीकर यांनी यशस्वीरीत्या पेलली. परत परत ब्लॅकआऊट होऊनही दिग्दर्शकाने नाटकाची लय अबाधित ठेवली.
त्याकरता प्रकाश योजना, पार्श्वसंगीत व वस्तुस्थितीशी पूरक अशा गाण्यांचा आधार घेतला. प्रवेशाच्या शेवटी पात्रांना योग्य जागेवर फ्रीज करून त्याला पूरक असे पार्श्वसंगीत देऊन त्यांनी नाटकाची परिणामकारकता वाढविली.
जमावातील प्रत्येक कलाकाराला त्यांनी परिस्थितीनुरूप हालचाली दिल्या. पात्रांची ‘प्लेसमेंट’ही योग्य होती. ‘ज्या जाग्यार भाऊ आसा, थंय खाऊ आसा’, ‘गोयांत येऊन हिंदी उलयता’सारखे संवाद प्रेक्षकांची जबरदस्त दाद घेऊन गेले.
अभिनयाच्या बाबतीत बाजी मारली ती दादी अर्थात दुर्गादास नायक यांनी. दुर्गादास हे ही भूमिका जगले, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. त्यांचे बोलणे, चालणे, एवढेच काय, तर मुद्राभिनयही या भूमिकेची लज्जत वाढवून गेला.
दुसरा उल्लेख करावा लागेल तो चांदणी झालेल्या दूर्वा नायक यांचा. त्यांनी बोलण्याचा ढंग शेवटपर्यंत राखला. त्यांचा जोशही वाखाणण्यासारखाच. बेवड्याच्या छोट्या भूमिकेत केवल नायक प्रेक्षकांना रिझवून गेले. मंत्री सिद्धेश तिवरेकर, वकील प्रणिता काणकोणकर यांनीही भूमिकेला न्याय दिला. भाटकार म्हणून नितेश नायक योग्य वाटले तरी काही ठिकाणी त्यांनी केलेले ओव्हर ॲक्टिंग खटकते.
सुयश गावडे यांनीही रवीची भूमिका बऱ्यापैकी निभावली. इतर कलाकारांनीही भूमिका प्रभावीपणे निभावल्या. फुगड्या, धालो रंगमंचावर दाखवून गोव्याची ग्रामीण संस्कृती अधोरेखित केली. खेमराज पिळगावकर यांची प्रकाश योजना आणि गौरव गावडे यांचे पार्श्वसंगीत रसिकांना भावले. मात्र, काही प्रसंगांत पार्श्वसंगीत ‘लाऊड’ झाल्यामुळे संवाद नीट ऐकू येत नव्हते. प्रसाद गावडे यांचे नेपथ्य प्रयोगाची उंची वाढवून गेले. एकंदरीत ‘ऊठ गा देवा’ नाटकाचा प्रयोग रसिकांच्या बुद्धीला खाद्य देण्याबरोबर स्पर्धेचा आलेखही रुंदावून गेला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.