Kiravant Drama: किरवंत; स्मशानकर्मे करणाऱ्यांच्या दुःख, व्यथांसोबत सामाजिक संदेश देणारे सादरीकरण; नाट्यसमीक्षा

Kiravant Drama about Caste Discrimination: श्री केळंबिका कलामंच, शिरोडवाडी, मुळगाव या संस्थेने प्रेमानंद गज्वी यांच्या ‘किरवंत’ या नाटकाचा शानदार प्रयोग कला अकादमीच्या ‘अ’ गट नाट्यस्पर्धेत सादर केला.
Kiravant Play Review
Dainik Gomantak
Published on
Updated on

Kiravant Play Review:श्री केळंबिका कलामंच, शिरोडवाडी, मुळगाव या संस्थेने गेल्या शतकात गाजलेल्या, प्रेमानंद गज्वी यांच्या ‘किरवंत’ या नाटकाचा शानदार प्रयोग कला अकादमीच्या ‘अ’ गट नाट्यस्पर्धेत सादर केला. किरवंत ब्राह्मण सिद्धेश्वर जोशी यांची व्यथा मांडताना गज्वी यांनी त्यांच्या कुटुंबातील रेवती, मधु, वासुदेव आणि समाजातील ढब्बूशास्त्री, वेदांतशास्त्री, दिगंबरशास्त्री यांच्यामधील संघर्ष नाटकात दाखवला आहे. शिवाय केशव अभ्यंकरसारख्या फसव्या धर्मवादीचे व्यक्तिरेखाचित्रण नाटकात केले आहे. किरवंताची दुःखातून मुक्त होण्याची धडपडही संहितेत दिसून येते.

सिद्धेश्वरशास्त्री जोशी हे जोशी यांचे घराणे अनेक पिढ्या अंत्येष्टी कर्म करीत आलेले आहे. आपल्या मुलाने व कुटुंबीयांनी हेच काम करीत राहावे, अशी सिद्धेश्वरशास्त्री जोशी यांची इच्छा आहे. स्मशानकर्मे करणाऱ्यांना लोक ‘किरवंत’ म्हणून ओळखतात, हाकारतात. किरवंताचे काम शास्त्रपुराणात श्रेष्ठ दर्जाचे, पुण्यमय काम मानले गेल्याचेही सांगितले जाते. मात्र, किरवंत स्मशान कर्म करतात म्हणून लग्न, पूजेसारख्या मंगल विधीसाठी त्यांना कोणी बोलवीत नाहीत आणि अंत्येष्टी कर्म हाच किरवंताचा धर्म बनलेला असतो.

सिद्धेश्वरचा सत्यनारायणाच्या पूजेतल्या अपमानाबाबत वासुदेव जाब विचारताना ढब्बूशास्त्री, दिगंबरशास्त्री आणि वेदांतशास्त्री त्याला जुमानत नाहीत. वेदांतशास्त्रीच्या आईच्या अंत्येष्टीसाठी सिद्धेश्वर येणार नाहीत, असे वासुदेव सांगतो. सिद्धेश्वरशास्त्रीला आपले कर्तव्य पार पाडले नाही, मोक्ष मिळणार नाही, याचे भय असते. एक किरवंत धर्मसंकट होऊन संघर्षाला उभा राहिला असून त्याचा बंदोबस्त करण्याची कल्पना दिगंबरशास्त्री देतात. शेवटी दिगंबरशास्त्री सिद्धेश्वरचं घर वाळीत टाकीत वेदांतशास्त्रींच्या आईचा अंत्यसंस्कार गोकर्णशास्त्रींच्याकडून करून घेतात. सिद्धेश्वरला वेदांतशास्त्रींची आई हडळ होऊन आपला गळा दाबते, अशी स्वप्नं पडू लागतात.

दिगंबरशास्त्री मधुला शाळेतून काढून वासुदेवाची हत्या करण्याचा मार्ग सिद्धेश्वराला सुचवतात. सिद्धेश्वर संतापतो, शिव्या-शाप देतो. दिगंबरशास्त्री सिद्धेश्वरला लाथ मारतो. आपल्या घरी मानसिक ताण वाढल्यामुळे तो मरण पावतो. त्याच्या आत्म्याला चिरशांती मिळवण्यासाठी गरुड पुराण ग्रंथ मधुच्या हाती दिले जाते.

दिग्दर्शक दत्ताराम बर्वे संहितेतील संवादांतून, स्वतःच्या अन्वयार्थाद्वारे, लेखकाची संकल्पना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यास कमालीचे यशस्वी ठरले. आपल्या सादरीकरणात त्यांनी गुणी कलाकारांच्या अभिनयातून आणि तंत्रज्ञ कलाकारांद्वारे, नृत्यकलात्मक घटक व अलंकार वापरून, विशिष्ट संकल्पनेतून आपल्याला हवा असलेला संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचविला. त्यांच्या, प्रयोगाच्या प्रत्येक टप्प्यांवरील प्रगल्भ ज्ञान आणि क्लृप्त्या प्रयोगाचे उद्दिष्ट साधण्यास मदत करते झाले.

यदुनाथ शिरोडकर यांनी वासुदेवची व्यक्तिरेखा उभी करताना प्रबोधन आणि परिवर्तन यांचे अचूक भान ठेवलेले दिसले. अपमानाच्या, अन्यायाच्या विरोधात जायची ‘जाणीव’ झालेला, ‘धर्म’, ‘ईश्वर’, मोक्ष ई. कल्पना न मानणारा, शास्त्री परंपरांना न जुमानणारा, सतत स्वाभिमान जागा ठेवणारा, समाजाला जागे करून न्याय्य मार्गावर नेणारा, आंधळेपणाने समाजाने स्वीकारलेल्या गोष्टींकडे तटस्थपणे पाहू शकणारा, वैचारिक, निर्भय, अभ्यासू, ‘विचारनायक’ त्यांनी आपल्या समर्थ अभिनयातून यशस्वीरीत्या उभा केला.

रोहिदास राऊत यांनी सिद्धेश्वरशास्त्री जोशी ही भूमिका करताना किरवंताच्या वाटेला आलेल्या अवहेलनेचे, अपमानाचे, अस्पृश्यतेचे, क्रूर विरोधाचे दर्शन घडवले आहे. किरवंताचे काम शास्त्रपुराणात श्रेष्ठ दर्जाचे मानणारा, आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यास भावाचे सर्व काही सोसणारा, यशस्वी नवरा आणि पिता होण्यास धडपडणारा, असाहाय्य, दुबळा नायक त्यांच्या अभिनयातून साकार झाला.

विविधरंगी आणि विविधढंगी असलेली ढब्बूशास्त्री ही भूमिका वरेश फडके यांनी त्यातील सूक्ष्म बारकांव्यासहित उत्कृष्टपणे सादर केली. अभ्यासाविषयी विशेष आस्था असलेला, अपमानाचे जिणे जगलेला व ते योग्य नाही हे आपल्या काकाकडून शिकलेला, वडिलांच्या वागण्याने आणि विचारांनी संभ्रमित झालेला, आपल्या आईची व्यथा ओळखणारा मधु हा अवनिश राऊत या मुलाने आपल्या अभिनयातून नीटपणे उभा केला.

Kiravant Play Review
Kala Academy: कला अकादमीच्या 'उणिवांकडे' लक्ष देणे महत्वाचे की 'इगो' कुरवाळणे?

मनाविरुद्धच्या गोष्टी स्वीकारायला भाग पाडलेली, आर्थिक, सामाजिक परिस्थितीच्या कोंडीत सापडलेल्या असाहाय्य स्त्रीच्या, तसेच पती मेल्यावर धीटपणा दाखवणाऱ्या रेवतीच्या भूमिकेत प्रांजल मराठे शोभून दिसल्या. दिगंबरशास्त्री झालेले दत्तात्रय बर्वे व वेदांतशास्त्री या समंजस भूमिकेत दयानंद राऊत शोभून दिसले. केशव अभ्यंकरच्या भूमिकेत सूरज राऊत यांनी अजून मेहनत घ्यावयास हवी होती.

दयानंद राऊत यांची नेपथ्याची मांडणी वातावरणाची भावना निर्माण करण्यास योग्य ठरली. नाटकाची प्रकाशयोजना अवी वळवईकर यांनी काही अपवाद वगळता योग्यपणे हाताळली. दृश्यांची जागा, वेळ, पात्रे आणि त्यांची परिस्थिती, भ्रम आदी दर्शविण्यास प्रकाशयोजनेचा फार आधार झाला. पार्श्वसंगीताची बाजू सचिन गावस यांनी यशस्वीरीत्या हाताळली. जितेंद्र परब यांची रंगभूषा आणि स्नेहल राऊत यांची वेशभूषा एकमेकांना पूरक ठरली. प्रयोग सादरीकरणासाठी नेपथ्य, प्रकाशयोजना यांच्याबरोबर एकसंधता राखण्यास रंगभूषा-वेशभूषा यांची योग्य मदत झाली.

Kiravant Play Review
Goa Theatre: गोव्यातील कलाकारांचा नवा आविष्कार 'कलासाद'

गोव्यात किरवंत पद्धत अधिकृतपणे नसल्याचे दिसते. तसेच गोव्यातील ब्राह्मण लोक इतर जातीच्या लोकांबरोबर गुण्या-गोविंदाने नांदत असतात. सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी सर्वत्र गाजत असलेल्या किरवंत या नाटकाचा प्रयोग शानदार झाला. नाटकात ‘अ’ गट नाट्यस्पर्धेत यापूर्वी भाग घेतलेले अनेक अनुभवी आणि गुणी कलाकार होते. महाराष्ट्रातील व्यावसायिक रंगभूमीला लाजवेल असे त्याचे सादरीकरण होते. ...तरीसुद्धा गोव्यात आज सामाजिक, आर्थिक, मानसिक, नैसर्गिक, राजकीय यासारखे अनेक प्रश्न थैमान मांडून असताना, गोव्याच्या स्पर्धात्मक रंगभूमीला नवीन प्रवाह न देणारे नाटक कला अकादमीच्या ‘अ’ गट स्पर्धेत काय कामाचे?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com