

मिलिंद म्हाडगुत
इफ्फीने गोमंतकीय सिनेकर्मींना काय दिले, इथपासून इफ्फी बाहेरचा कसा होऊ लागला इथपर्यंत अनेक सवाल घेऊन गोव्यातला २२वा व एकंदरीत ५६वा इफ्फी सुरू झाला आणि एकाचेही उत्तर न देता तो संपलासुद्धा.
परत एकदा हाती काहीच लागले नाही. आमीर खान, अनुपम खेर, ‘शोले’फेम दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचे मास्टर क्लासेस चांगले व ज्ञानवर्धक होते हे जरी खरे असले तरी त्याचा किती फायदा गोव्यातील सिने कलाकारांना होऊ शकतो हा प्रश्न तिथेच राहिला. मुख्य म्हणजे या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या प्रत्येक आवृत्तीगणिक गोव्यातला सिनेकर्मी उपरा होताना दिसायला लागला आहे.
या महोत्सवाच्या समारोप सोहळ्याचेच उदाहरण घ्या; सगळे कलाकार, सगळे सन्माननीय व्यक्ती बाहेरचे. एका मुख्यमंत्र्यांचा अपवाद वगळता या कार्यक्रमात गोमंतकीयांचे नामोनिशाणसुद्धा दिसले नाही.
मुख्यमंत्री म्हणतात, की गोवा सिनेनिर्मितीचा हब करणार म्हणून. पण यामुळे गेल्या २२ वर्षांत हा ‘हब’ करण्याचा प्रयत्न का झाला नाही हा प्रश्न उपस्थित होतोच. आणि त्याचबरोबर सध्याची गोव्यातील चित्रपट निर्मिती(?) पाहता हा हब होणार तरी कसा असेही वाटायला लागते.
स्पष्टपणे बोलायचं तर गेल्या २२ वर्षांत गोव्यातील चित्रपट क्षेत्राचा उलटा प्रवाह सुरू झालेला दिसत आहे. आता इफ्फीतल्या गोमंतकीय विभागाचे उदाहरण घ्या. पूर्वी या विभागात पूर्ण लांबीचे चित्रपट दिसायचे. आता त्यांची जागा वीस- तीस मिनिटांच्या लघुपटांनी घेतली आहे.
पूर्ण लांबीच्या चित्रपटांची निर्मिती रोडावली असल्यामुळे त्यांची जागा लघुपट घ्यायला लागले आहेत हे उघडच आहे. लघुपट कितीही चांगला असला तरी तो चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाऊ शकत नाही हे लक्षात घ्यायला हवे. तो फक्त महोत्सवापुरताच मर्यादित राहत असतो.
कोणतीही कलाकृती जेव्हा प्रेक्षकापर्यंत पोहोचते तेव्हाच त्या कलाकृतीचे खऱ्याअर्थी सार्थक होत असते. पण गोव्यात आर्थिक मर्यादेमुळे ते शक्य होताना दिसत नाही. आणि त्याचेच पडसाद यंदाच्या इफ्फीच्या गोमंतकीय विभागात उमटताना दिसले.
गेल्या वर्षी खास गोमंतकीय सिनेकर्मींकरता आयोजित केलेले ‘मास्टर क्लासेस’सुद्धा यंदाच्या इफ्फीत दिसले नाहीत. गेल्या वर्षी मिळालेल्या कमी प्रतिसादामुळे हे क्लासेस आयोजित केले गेले नसावेत असे वाटते. याचा अर्थ आपण एक पाऊल पुढे जाण्याच्या ऐवजी दोन पावले मागे जाताना दिसायला लागलो आहोत. आणि दुःखाची गोष्ट म्हणजे याचा कोणीही आढावा घेताना दिसत नाही. इफ्फी एकदाचा संपला, की मनोरंजन संस्था अज्ञातवासात जायला मोकळी होते.
या महोत्सवाचे कवित्व काय याचा विचार करण्याची जबाबदारी आपली आहे असे मनोरंजन संस्थेला कधी वाटलेच नाही.
इफ्फीला साधारण एक महिना असताना जागे व्हायचे आणि उरलेले ११ महिने ‘सायलंट मोड’मध्ये राहायचे ही मनोरंजन संस्थेची स्थिती गेली अनेक वर्षे आपण अनुभवतो आहोत. आता एनएफडीसी हा महोत्सव स्वायत्त करण्याचे बोलत आहे. खरे तर ही मागणी जुनीच आहे. लाल फितीतून बाहेर काढून हा आंतरराष्ट्रीय महोत्सव कलाकारांच्या हातात द्यावा, ही मागणी गेली कित्येक वर्ष होत आहे.
पण सरकारला आपले वर्चस्व सोडायला नको असल्यामुळे हा महोत्सव अजूनही लाल फितीत अडकलेला आहे. आता एनएफडीसीने बोलल्याप्रमाणे कृती केली तर कलाकारांचे भाग्य उजळले यात शंकाच नाही. पण तो दिवस कधी येणार हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. तोपर्यंत इफ्फीच्या नावावर चाललेला ‘गोंधळ’ बघणे एवढेच गोमंतकीयांच्या हाती राहिलेले आहे.
यंदा तर या गोंधळाने कहरच केला. बुकिंग नसल्याचे कारण सांगून चित्रपटगृह अर्धे रिकामे असूनसुद्धा प्रतिनिधींना चित्रपट पाहण्यापासून वंचित ठेवले. यंदाच्या उद्घाटन व समारोपाच्या चित्रपटांची निमंत्रणेसुद्धा बऱ्याच नोंदणीकृत सिनेनिर्माते - कलाकारांना मिळू शकली नाही. त्यामुळे स्थानिक सिने कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांची अनुपस्थितीही जाणवली.
या महोत्सवाचा उलटा प्रवाह कसा सुरू झाला आहे हे अधोरेखित होते. गोवा यजमान असूनसुद्धा इफ्फीच्या प्रत्येक विभागात ‘भायल्यां’चे वर्चस्व दिसायला लागले आहे.
अगदी सूत्रसंचालनापासून ते आयोजनापर्यंत सगळीकडे बाहेरच्यांचे राज्य आहे. गेल्या २२ वर्षात आपल्याला एखादा स्थानिक सूत्रसंचालक मिळू नये यातूनच सरकारचा या महोत्सवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रतीत होतो. ‘गोमंतकीय कलाकार, सिनेकर्मींचे इफ्फीत स्थान काय?’, यावर परिसंवाद ठेवण्याची वेळ आली आहे. अर्थात परिसंवाद ठेवून काही फायदा होईल की काय याचीही शंकाच आहे म्हणा!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.