Bhoma Flyover: गडकरीजी, देवी सातेरी आणि तिच्या भावाची ताटातूट थांबवा; गोव्यातल्या ग्रामस्थांची आर्त हाक

Bhom Villagers Oppose Flyover: माननीय नितीन गडकरीजी, आम्हा भोम रहिवाशांकडून आपल्यास विनम्र विनंती आहे, की कृपया आपण आमच्या येथल्या आदिवासी देवदेवतांचे रक्षणकर्ते व्हा.
गडकरीजी, आमच्या देवांचं रक्षण करा! बहीण-भावाची ताटातूट होऊ देवू नका; भोमवासीयांची आर्त हाक!
Nitin GadkariDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Bhoma Flyover National Highway Why Villagers Opposing

प्रमोद भोमकर

माननीय नितीन गडकरीजी, आम्हा भोम रहिवाशांकडून आपल्यास विनम्र विनंती आहे, की कृपया आपण आमच्या येथल्या आदिवासी देवदेवतांचे रक्षणकर्ते व्हा. प्रस्तावित भोम-शहापूर रस्ता विस्तारीकरणात आमच्या भोम गावात होऊ घातलेल्या उड्डाण पुलामुळे देवी सातेरी व तिचा भाऊ नारायण देव यांच्यात ताटातूट व्हायचे संकट निर्माण झाले आहे. कृपया आपण स्वत: हस्तक्षेप करून, ही ताटातूट थांबवावी जेणे करून या देवदेवतांचा गावावर रोष येणार नाही.

गडकरीजी, आमच्या देवांचं रक्षण करा! बहीण-भावाची ताटातूट होऊ देवू नका; भोमवासीयांची आर्त हाक!
St. Xavier Exposition: पाकिस्तानी नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य; ठावठिकाणा जाहीर न करण्याचा गृह मंत्रालयाचा आदेश

जगप्रसिद्ध मंगेश व महालसा या देवळाकडे पोहोचण्याआधी एका टेकडीची चढण लागते, त्या चढणीच्या आधीचा गाव म्हणजे कुंडई व त्याच्याही आधीचा एक गाव म्हणजे आमचा भोम गाव. आमच्या गावाची सुरुवात बाणस्तारी पुलापासून लगेच होते. आमच्या गावातील रस्ता अगदी अरुंद असून पूर्वीपासून तेथे दररोज वाहतूक कोंडी होते. शिवाय आमच्या गावच्या जत्रेचा रथोत्सव असला की येथे पाच पाच तास वाहतूक कोंडी होते.

यासाठी २००३ साली त्यावेळचे भाजप आमदार विश्वास सतरकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री कै. मनोहर पर्रीकर यांच्याकडे रस्ता रुंदीकरणाची मागणी केली. त्यानुसार आराखडे तयार झाले, पण गावातून रस्ता नेण्याची कल्पना आवडली नाही. त्यांनी त्यावेळचे सार्वजनिक खात्याचे वरिष्ठ अभियंते व आताचे राज्यप्रमुख अभियंते पार्सेकर यांना बायपासचा आराखडा तयार करायला सांगितला. त्यांनी तो तयार करून त्यांना सादर केला. पण पुढील चार वर्षांत त्यांची सत्ता गेली व प्रस्ताव शीतपेटीत गेला. आता भोम-शहापूर रस्ता विस्तारीकरणात तेथूनच रस्ता काढला जाईल असे आम्हांला वाटत होते, पण तसे झाले नाही. आता आहे त्याच ठिकाणी रस्ता रुंदीकरणाची प्रक्रिया चालू आहे. या आराखड्यात एका आदिवासी श्रद्धास्थानाचे पतन होत आहे याची माहिती आपल्याकडे पोहोचली नसावी.

चांगले रस्ते हवेच, पण त्यासाठी निसर्ग, इतिहास-संस्कृती यांचा विनाश नको. आपण हे स्वत: आपल्या नागपूर शहरात करून दाखविले आहे. येथल्या रस्त्यावरून जाताना एखाद्या गावातून जात आहोत याचा भास होतो. आपण लक्ष घातल्यास, आमच्या गावातही हे करणे शक्य आहे. आमच्या गावाचे नाते थेट संभाजी महाराजांशी आहे. १६८३साली पोर्तुगिजांवर स्वारी करण्यासाठी त्यांचे सैनिक त्यावेळी आमच्या गावापर्यंत पोहोचले होते. पुढे बाणस्तारीत लागणारी नदी पार करायची होती. पण त्या आधीच त्यांना माघारी जावे लागले व तिसवाडीत पोर्तुगीज बचावले.

आमचा गाव नव्या काबिजादीत येतो म्हणून पुढची दोनशे वर्षे आमचे गाव मराठी संस्थानिकांच्या आधिपत्याखाली राहिला अन् आमच्या आदिवासी गावाचे अस्तित्व जशास तसे शाबूत राहिले. १८८१साली जेव्हा आमचा गाव पोर्तुगीज राजवटीखाली आला तरी आमच्या वारसास्थळांना कुणी हात लावला नाही. पुरातत्त्व खात्यात १९०७चे दस्तऐवज आहेत, ज्यात आमच्या गावची संपूर्ण जमीन कोमुनिदादच्या नावाखाली आहे. याचाच येथे १८८१पूर्वी येथे आदिवासीची गावकरी व्यवस्था होती. आदिवासींनीच पूजाअर्चा करावी अशी सातेरी, म्हारू, सटी, मल्लिकार्जुन, बाराजण, पीर, नारायण देव यांची छोटी छोटी मंदिरे येथे होती. येतील नारायण देवळाजवळ असलेले तळे व पिराच्या घुमटीजवळ असलेली नागझररूपी तळी, यांची नोंद पुरातत्त्व खात्यात उपलब्ध असलेल्या सव्वाशे वर्षापूर्वीच्या पोर्तुगीज दस्तऐवजात सापडते.

गडकरीजी, आमच्या देवांचं रक्षण करा! बहीण-भावाची ताटातूट होऊ देवू नका; भोमवासीयांची आर्त हाक!
IFFI Goa 2024: सिनेरसिकांची गोवा बनणार 'पंढरी'...!

आदिवासी हा निसर्गरूपी देवतांचा भजक. त्याची देवदेवस्की देवझाडे, वारूळ व जलस्थळे यांच्यात सामावलेले असते. या प्रस्तावित रुंदीकरणात मंदिरे सुरक्षित ठेवली जातील असे सांगितले जात आहे पण आदिवासींची गाव देवस्की मूर्तीपुजेपुरती मर्यादित नाही. येथे चिरा-विटांची मंदिरे सुरक्षित ठेवून श्रद्धास्थानी असलेली बरीच देवझाडे, वारुळे नामशेष होणार आहेत. त्यातल्या त्यात ‘बाराजण’ ही राखणदार देवाच्या जागेचे महत्त्व फार मोठे आहे. ते आदिवासीचे ऐतिहासिक ग्रामस्थळ आहे.

हजारो वर्षापूर्वी येथे बारा सीमाराखणदाराची त्या काळची ‘जिल्हा परिषद’ भरायची. हे स्थळ नष्ट करणे म्हणजे आदिवासीचा इतिहासच पुसून टाकणे, कारण तो कधी इतिहास लिखित स्वरूपात नसतो, असतो तो मौखिक साहित्यात व अशा खाणाखुणांत. या व्यतिरिक्त येथे हजारो वर्षांपासून घुडी, विडी, विडा, चोरु, रोट असे आदिवासी ग्रामदेवस्की विधी होत असलेले तब्बल सत्तावीस स्थळबिंदू रस्ता बांधकामामुळे नष्ट होणार आहे.

कै. मनोहर पर्रीकर यांची दूरदृष्टी आपल्यासारखीच. जो मनोहरभाईनी ‘बायपास’ सूचित केला होता, तो तांत्रिक विचार करूनच केला असावा. आज गावाच्या मधोमध उड्डाणपुलाद्वारे रस्ता उंचीवरून नेण्याचा प्रयत्न होत आहे पण भाईनी त्याच उंचीसाठी गावाच्या वेशीवर असलेल्या डोंगर वापरण्याचा विचार पुढे आणला होता. येथे डोंगर कापणीचा आक्षेप घेण्यात अर्थ नाही कारण या डोंगराच्या पायथ्यापासून शिखर माळापर्यंत कुंडई औद्योगिक वसाहत पसरली आहे. आताचा प्रस्तावित रस्ता झाल्यास, रस्ता व डोंगर पायथा या दरम्यान एक भूखंड पट्टा तयार होईल, हा धोका मनोहरभाईंनी ओळखला असावा. हा भूखंड उद्योजक व बिल्डरांसाठी सोन्याचा नव्हे डायमंडचा तुकडा ठरेल. कुणी सांगावे, या भुखंडाचे सौदे कधीपासून सुरू झालेलेही असतील.

आपल्याकडील अभियंत्यांना जमिनीचा सर्व्हे प्लॅन कळतो पण त्या प्लेनमध्ये दाखवली या जमिनीच्या पावित्र्याचा सर्व्हे करता येत नाही. प्रस्तावित आराखड्यात पंचायत घर पाडावे लागणार असा अहवाल ते देतील, पण त्यासोबत येथल्या देवतांचे संपूर्ण ‘पंचायतन’ पाडावे लागणार, याचा उल्लेख नसेल. येथले ‘पंचायतन’ म्हणजे आधी उल्लेख केलेल्या सर्व देवतांचे गावामधील भुखंडात असलेले एक गृहसंकुल.

आता कालांतराने जमिनी हक्क लोकांकडे किंवा कोमुनिदादकडे गेले असतील पण येथील देवस्की आदिवासींकडूनच होते. या जन-जमिनीत देवतांच्या एकामेकांकडे जाण्याच्या वाटा ठरलेल्या आहेत. हा रस्ता या वाटा नष्ट करणार आहे. देवी सातेरीचा भाऊ नारायण देव वर्षभर निद्रित अवस्थेत असतो. वर्षातून एक रात्र तो जागा असतो, त्या दिवशी देवी त्याच्याकडे रात्रीसाठी राहायला जाते, हाच तो जत्रोत्सव. देवीच्या या जाण्या येण्याच्या वाटेवर आता उड्डाणपूल आडवा येणार आहे.

शिवाय, नारायण मंदिराच्या खाली एक तळी आहे. या तळीतील पाण्यावर उमटणाऱ्या प्रतिबिंबातून देवी आपल्या निद्रावस्थेतील भावावर नजर ठेवते अशी इथल्या आदिवासींची भावना आहे. ती तळीच आता ‘एनएसएचटी’ होणार आहे. त्याचप्रमाणे ‘पीर’ राखणदाराची नागझर ही तळीही आता नष्ट होणार आहे. थोडक्यात हा विस्तारीत रस्ता वा उड्डाणपूल आमच्या देवतांच्या ‘पंचायतना’ची मधोमध विभागणी करून आमच्या देवतांमध्ये ताटातूट करणार आहे.

आपले नम्र, भोम गावातील आदिवासी ग्रामस्थ

पूर्वीच्या काळी नव्या पुलाचे काम सुरू झाले की गावात अशी एक भीती पसरायची. पुलाच्या खांबासाठी नरबळीची गरज असते म्हणून त्यासाठी लहान मुले चोरणारी टोळी गावागावांत फिरते, ही ती भीती. आज आमच्या गावात अशाच तर्‍हेची भीती पसरली आहे. उड्डाण पूल याच जागी बांधण्याच्या हट्टात आमच्या हजारो वर्षाच्या ‘पंचायतन’ वारशाचा बळी जाणार आहे, असे आम्हांला मनापासून वाटते आहे. म्हणून, नितीन गडकरीजी आपण स्वत: यात लक्ष घाला व आमच्या देवतांचे रक्षणकर्ते व्हा, अशी विनम्र विनंती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com