

नारायण खराडे
गोव्यात जिथे आमदार विकत घेतले जातात आणि नोकऱ्या विकल्या जातात तिथे नाट्यस्पर्धेची बक्षिसे विकत घ्यायचा कुणी प्रयत्न केला असेल तर मला त्यात आश्चर्य वाटत नाही. पण त्याचबरोबर दुसरी गोष्ट ही की ज्यांच्यावर नाटक स्पर्धेची बक्षिसे विकत घेण्याचा आरोप होत आहे, त्यांच्या घरावर केवळ आरोप होत आहे म्हणून बुलडोझर फिरवायची गरज नाही.
एखाद्याला आरोपी बनवायचे आणि लगेच त्याच्या घरावरून बुलडोझर फिरवायचा किंवा मोर्चा घेऊन जायचा ही आपल्याला सवय झाली आहे. ते इथे होऊ नये. पण, या प्रकरणाची योग्य ती चौकशी झालीच पाहिजे.
जे काही घडले आहे त्याबद्दल आम्हा सर्वांना अजून निश्चित काही माहिती नाही. पण, ते खरे असेल तर ती आश्चर्य करण्याजोगी बाब निश्चितच नाही. कारण, गोव्याचा जो सांस्कृतिक व्यवहार आहे, विशेषत: सरकारी क्षेत्रात चालणारा, त्यात अशाप्रकारच्या गोष्टी सर्वसामान्य आहेत.
‘गोमन्तक’मधील कालच्या एका बातमीत आपल्या संस्कृती खात्याच्या मंत्र्यांचे विधान छापले आहेत. ते म्हणतात, ‘मला हे सारे वाचून धक्का बसला.’ याचा अर्थ त्यांना आपल्या खात्याबद्दल आणि गोव्यातील एकूण सांस्कृतिक व्यवहाराबद्दल काहीच माहिती नसावे. असा व्यवहार झाला असल्यास तो काही पहिल्यांदा झालेला नाही.
सात-आठ वर्षांपूर्वी या ‘अ’ गट राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल झाल्यानंतर एका वर्तमानपत्रात बातमी आली होती, की एक स्पर्धक संघ परीक्षकांना घेऊन चहापानासाठी कसा किनाऱ्यावर गेला होता, वगैरे.
त्या वेळी वर्तमानपत्रात ‘चहापान’ असा उल्लेख होता पण, यावेळी ‘गोमन्तक’ने आपल्या बातमीत अधिक सुस्पष्टता ठेवली आहे. ज्या संस्थेबद्दल ही बातमी आली होती त्या संस्थेबद्दल मी एक गोष्टही सांगू शकतो की त्या संस्थेची त्यावेळी खजिनदार असलेली व्यक्ती, त्याच वेळी कला आणि संस्कृती संचालनालयाचे उपसंचालकपद भूषवत होती.
अनेक वर्ष ही व्यक्ती एकीकडे कला आणि संस्कृती खात्याची उपसंचालक होती आणि त्याचवेळी या संस्थेशी खजिनदार म्हणूनही निगडित होती. अशी परिस्थिती असताना त्या विशिष्ट संस्थेला कला आणि संस्कृती संचालनालयाकडून वर्षानुवर्षे किती फायदा होत होता ही गोष्ट संचालनालयाच्या फाईली तपासता उघड होऊ शकेल.
‘एपस्टीन’ फाईलसारख्या प्रकरणामधून ज्या गोष्टी आता एकेक करून उघड्यावर येऊ लागल्या आहेत तशी कला आणि संस्कृती संचालनालयासंबंधी एक फाईल नक्कीच तयार होऊ शकते.
‘धक्का बसला आहे’, ‘लांच्छन लागले आहे’ असे जे उद्गार या प्रकरणासंबंधी ऐकू येऊ लागले आहेत किंवा इथे जे काही घडत आहे, ते पूजा नाईक प्रकरणासारखे होऊ नये. केवळ एक व्यक्ती लांच्छनास्पद ठरते, तिला आयुष्यातून उठवण्याचे प्रयत्न होतात, हे बरोबर आहे का? एखादी व्यक्ती कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करते आणि मंत्र्याला काहीच ठाऊक नसते हे खरे असेल काय?
आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षकांना ५० हजार रुपये देण्याची जी बाब होती ते पैसे नेमके कोण देणार होते, त्याचाही शोध घेतला गेला पाहिजे. फक्त काही व्यक्तींना गुन्हेगार ठरवून प्रश्न सुटता कामा नये. तो अतिशय सोपा मार्ग ठरतो आणि बाकी सारा भ्रष्टाचार तसाच चालू ठेवायला सोईस्कर वाव मिळतो.
मध्यंतरी कला आणि संस्कृती खात्यासंबंधी लोकांच्या मनात बराच असंतोष होता, त्यांच्या संबंधीच्या काही गोष्टी खटकणाऱ्या होत्या. त्यातून गोविंद गावडे यांच्या विरोधात मोहीम सुरू झाली. गोविंद गावडे यांनी अनेक चुका केल्या होत्या त्याबद्दल वादच नाही.
योगायोगाने शिवाजी महाराज यांची जयंती होती, त्याचदिवशी हे प्रकरण उघडकीला आले हा एक मनोरंजक योगायोग आहे. गोविंद गावडे यांची शिवाजी महाराज ही आवडती भूमिका आहे. गोविंद गावडे यांच्यावरच खापर फोडून काही होणार नाही कारण, हा भ्रष्टाचार खूप खोलवर पोहोचला आहे आणि त्याला अनेक लोक जबाबदार आहेत. त्यामुळे एकाच व्यक्तीचा बळी घेऊन काहीच साध्य होणार नाही.
आपल्या देशात न्यायमूर्तींच्या ताब्यातील जागेत जळलेल्या नोटा वगैरे मिळतात, न्यायाधीश सत्ताधीशांबरोबर आरती करतात त्यामुळे सगळेच न्यायाधीश असेच असतील असे काही लोकांना वाटू शकते त्यातून कदाचित त्यांनी हे केले असेल.
लोकांचा विश्वास संपादन करणे हे न्यायाधीशांसाठी आजचे एक मोठे आव्हान आहे. अशावेळी ‘त्या’ न्यायाधीशांनी नाही परंतु या नाट्यस्पर्धेच्या न्यायाधीशांनी (परीक्षकांनी) तरी ते केले या दृष्टीने त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. कदाचित या परीक्षकांवरही काही काळाने अप्रत्यक्षपणे कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यांना परीक्षक म्हणून यापुढे कदाचित बोलावलेही जाणार नाही.
या प्रकरणात ‘खात्यात पैसे जमा करतो’ या प्रकारचे जे बोलणे झाले त्यातून हे स्पष्ट होत होते की हे आरोपी अगदीच नवखे आहेत. कारण अशावेळी ‘कॅश ट्रान्झेक्शन’ केले जाते किंवा त्यांचे संबंध सत्ताधारी पक्षाशी तरी असले पाहिजेत. म्हणजे, आपल्या मागे ‘ईडी’ लागणार नाही यांची त्यांना खात्री होती.
त्यादृष्टीने जे झाले ते गोमंतकीय रंगभूमीसाठी उत्तमच झालेले आहे. अतिशय भंपक गोष्टींना प्रतिष्ठा प्राप्त झाली होती आणि तीच उदाहरणे बनत चालली होती. त्या भंपक गोष्टी ‘एक्सपोज’ होणे गरजेचे होते. त्यांचा ‘पावित्र्य भंग’ झाला हे बरेच झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.