Konkani Drama Competiton: आमची येसाय, प्रेक्षकांच्या सहनशक्तीची परीक्षा; नाट्यसमीक्षा

Amchi Yesay Review: कला अकादमीची ४९ वी कोकणी नाट्य स्पर्धा स्पर्धात्मक रंगभूमीला म्हणून एक वेगळा दर्जा असतो. या रंगभूमीकडे एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहिले जाते.
Amchi Yesay Review
Amchi Yesay ReviewDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगूत

कला अकादमीची ४९ वी कोकणी नाट्य स्पर्धा स्पर्धात्मक रंगभूमीला म्हणून एक वेगळा दर्जा असतो. या रंगभूमीकडे एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहिले जाते. तिथे सवंग करमणुकीला म्हणा वा ओव्हर ॲक्टिंगला बिलकुल स्थान नसते.

स्पर्धात्मक रंगभूमी म्हणजे रंगभूमीला एक नवी दिशा देण्याचा प्रकार असतो आणि कला अकादमीच्या कोकणी नाट्य स्पर्धेत काही संस्थांनी तर हे कार्य इमानेइतबारे केलेही आहे. म्हणूनच तर या कोकणी स्पर्धेला एक वेगळाच दर्जा प्राप्त झाला आहे.

पण काही संस्था याची जाण न ठेवता हौशी रंगभूमीवर चपखलपणे बसू शकणारी नाटके स्पर्धात्मक रंगभूमीवर घेऊन येतात. त्यामुळे स्पर्धेची मजा किरकिरी तर होतेच, त्याचबरोबर स्पर्धेची लयही बिघडून जाते. ब्रह्मदेव युवक संघ ब्रह्मकरमळी - सत्तरी या संस्थेने सादर केलेले ‘आमची येसाय’ हे नाटक बघितल्यावर याचा प्रत्यय यायला लागतो.

लेखक संजीव बर्वे यांना या संहितेद्वारे नेमके काय सांगायचे हेच कळले नाही. एका गावातील लोक उत्सवाकरता नाटक सादर करण्याचे ठरवतात आणि त्याकरता तालीम घेतात अशी या नाटकाची थोडक्यात कथा.

यात पहिला अंक नाटक कोणते करायचे यावर जातो आणि दुसरा अंक ठरविलेल्या ‘वस्त्रहरण’ नाटकाचे संवाद पात्रे कशी बोलतात हे दाखवण्यात जातो. ना शेंडा ना बुडखा अशातला हा प्रकार. पहिला अंक थोडाफार तरी सुसह्य होता, पण दुसरा अंक मात्र प्रेक्षकांच्या सहनशक्तीची अक्षरशः परीक्षा घेतो. येणारे प्रत्येक पात्र ताल स्वरात ओरडताना दिसत होते.

Amchi Yesay Review
konkani Drama Competition: राजकारणाचे विविध कंगोरे दाखवणारे 'द ट्रॅप'; स्पर्धेतील चुरस शिगेला

महाभारतातील पात्रे असल्यामुळे त्यांना दिग्दर्शकाने ओरडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे की काय असे या नाटकाचा दुसरा अंक बघितल्यावर वाटायला लागते. नाटकाच्या शेवटी एक पात्र आपला वैयक्तिक राग दुसऱ्या एका पात्रावर काढतो आणि त्याला मारायला बघतो. यावर मग नाटकात तात्या झालेले संजीव बर्वे अशा वैयक्तिक भांडणामुळे हौशी रंगभूमीवरच्या नाटकांवर परिणाम होत असतो असा संदेश देऊन जातात.

पण असे प्रकार पूर्वी व्हायचे. आता हौशी रंगभूमी ही कात टाकायला लागली आहे हे लक्षात घ्यायला हवे. या नाटकात पात्रे भरपूर, पण कोणाचा पायपोस कोणाला आहे असे शेवटपर्यंत वाटलेच नाही. महाभारतातील गांधारी नाचते ते पाहून तर हसावे की रडावे तेच कळत नव्हते. दुःशासन तर एवढा जोर जोराने हसत होता की प्रेक्षकांचे कान फुटून जातील की काय असे वाटत होते. गोंधळात गोंधळ म्हणजे काय प्रकार असतो याचे प्रात्यक्षिक या नाटकाने दाखवले असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.

Amchi Yesay Review
Konkani Drama Competition: कोकणी नाट्यस्पर्धा रंगणार 20 फेब्रुवारीपासून, वीस नाटकांचा सहभाग

स्पर्धात्मक रंगभूमीवर तरी अशाप्रकारच्या नाटकांची बिलकुल अपेक्षा नसते. महाभारत दाखवण्यापोटी या नाटकाने महाभारतातील पात्रांचे ‘विडंबन’ केल्याचेच दिसून आले. एवढी पात्रे असूनसुद्धा एकही पात्र ठळकपणे लक्षात राहत नाही यातच या नाटकाचा दर्जा अधोरेखित होतो. दिग्दर्शक प्रवीण मराठे यांनी दिग्दर्शक म्हणून नेमके काय केले हे शेवटपर्यंत कळले नाही.

त्यांची प्रकाश योजनाही यथातथाच होती. त्यातल्या त्यात उल्लेखनीय म्हणून मंगेश गावस यांच्या पार्श्वसंगीताचे नाव घ्यावे लागेल. त्यांच्या पार्श्वसंगीताने प्रयोगाला थोडाफार तरी गेटअप आणला. बाकी सगळा आनंदी आनंदच होता. यामुळे कालच्या नाटकाने थोड्याफार उंचावलेल्या अपेक्षांवर या नाटकाने पाणी सोडले आणि त्यामुळेच ही ‘आमची येसाय’ प्रेक्षकांच्या सहनशक्तीची ‘येसाय’ ठरून स्पर्धेचा आलेख आकुंचित करून गेली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com