konkani Drama Competition: राजकारणाचे विविध कंगोरे दाखवणारे 'द ट्रॅप'; स्पर्धेतील चुरस शिगेला

Goa Kala Academy konkani Drama Competition: आगळ्या संहितेचे तुल्यबळ सादरीकरण; रसिकांची उत्स्फूर्त दाद
Goa Kala Academy konkani Drama Competition
Goa Kala Academy konkani Drama CompetitionDainik Gomantak

Goa Kala Academy konkani Drama Competition

कला अकादमीची कोकणी नाट्य स्पर्धेची चुरस आता शिगेला पोहोचायला लागली आहे. कालच्या ‘हयवदन’ पाठोपाठ नटरंग क्रिएशन्स नार्वे डिचोली या संस्थेने सादर केलेल्या ‘द ट्रॅप’ या नाटकामुळे स्पर्धेला आता लय प्राप्त होऊ लागली आहे.

या स्पर्धेतील हे ११ वे पुष्प. गो.पु. देशपांडे यांच्या ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ नाटकावर आधारित हे नाटक राजकारणातील विविध कंगोरे दाखवते. या नाटकाचे कोकणी रुपांतर मिलिंद बर्वे यांनी केले आहे.

सुरुवातीलाच जरी या नाटकातील संदर्भ कोणाशी संबंधित नसल्याचे जाहीर केले असले तरी काही संदर्भ हे राज्यातील राजकीय स्थितीशी जुळतात यात शंकाच नाही. हा योगायोग आहे. असे मानले तरी प्रेक्षक यामुळेच या प्रसंगाशी समरस होऊ शकतात हे ही तेवढेच खरे आहे. श्रीधर कुलकर्णी या वादग्रस्त व्यक्तीच्या चौकशीकरिता चौघांची कमिटी बसविली जाते. आणि इथूनच नाटकाला प्रारंभ होतो.

कुलकर्णी हे विद्यापीठाच्या निवडणुकीवेळी झालेल्या गोंधळाला जबाबदार असल्याचा त्यांच्यावर आरोप असतो. आणि या कमिटीत आमदार कांबळी, कुलगुरू वागळे, प्राध्यापक मोघे यांचा समावेश असतो.

आणि यावेळी कुलकर्णींचे मागचे धागेदोरे उलगडत जातात. कुलकर्णी हा एक चळवळी माणूस असल्यामुळे त्याचे माजी आमदार असलेल्या त्याच्या वडिलांशीही पटत नाही. हेही ‘फ्लॅशबॅक’मधून उलगडले जाते. त्याला खरेतर आमदार होण्याची संधी असते, पण स्पष्टवक्त्या स्वभावामुळे त्याला ही संधी हुलकावणी देते.

वडिलांच्या मरणाला श्रीधर जबाबदार असल्याचा आरोपही त्याचे काका करत असल्याचे दाखवले आहे. त्याचबरोबर राजकारणामुळे त्याचे त्याच्या पत्नीशी असलेले मतभेदही या फ्लॅशबॅकमधून दिसतात. श्रीधर चांगला नाटककारही असतो, नाटकामुळेच त्याचे माधवी या मुलीशी सुत जुळलेले असते.

पण तिथेही तो तडजोड करायला तयार नसल्यामुळे स्पर्धेत त्याच्यावर अन्याय होत राहतो. आणि इथेच त्याचे प्रेयसी माधवीशी मतभेद होतात. एवढे होऊनही तो आपले विचार सोडत नाही. आणि जो चौकशीचा फार्स करायला जी कमिटी नेमलेली असते तीही त्याला हेच सांगत असते.

Goa Kala Academy konkani Drama Competition
South Goa : दक्षिणेत भाजपला ‘प्रयोग’ परवडेल का? मतदारांकडे लक्ष

तू गप बसत असशील तर सगळे थांबवता येईल,अन्यथा तुझ्यावर कारवाई केली जाईल असा गर्भित इशारा त्याला आमदार कांबळीकडून देण्यात येतो. पण तो याला सरळसरळ नकार देऊन आपली झुंजार वृत्ती कायम असल्याचे सूचित करतो.

‘हारेंगे नही हम...गीत गाते रहेंगे हम’ या सकारात्मक गीतावर नाटकाची सांगता होते. यात श्रीधर कुलकर्णीची लढाऊ वृत्ती ठायीठायी दिसते. मूळ ‘ उद्ध्वस्त धर्मशाळा’ला कला अकादमीच्या ‘ब’ गट मराठी नाट्य स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांना या नाटकाचा चांगलाच अनुभव असल्याचे दिसले. आणि कोकणी रूपांतरणातही हा अनुभव प्रत्ययाला येत होता.

बॉम्ब ब्लास्ट, बाबरी मशीद, इत्यादी बाबींचा उल्लेख झाल्यामुळे प्रेक्षकांच्या भूतकाळातील आठवणी जाग्या होऊ लागतात. हे नाटक संपूर्णपणे श्रीधर कुलकर्णीभोवती फिरते. त्यामुळेच कुलकर्णींची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरते. मिलिंद बर्वे यांनी ही भूमिका अप्रतिमरित्या वठवून नाटकाचा डोलारा सांभाळला.

त्याला तोलामोलाची साथ सरस्वती तथा माधवीची भूमिका करणाऱ्या चैती कडकडे यांनी दिली. सुरुवातीला कुलकर्णीची बायको असलेली सरस्वती व नंतरच्या प्रसंगातील युवा माधवी यातला फरक ही कडकडे यांनी योग्यरित्या प्रकट केला आहे. इतर भूमिकांत आमदार कांबळे झालेले शाम शेटगावकर यांन भूमिकेचा रुबाब चांगला प्रकट केला.

खासकरून शेवटच्या प्रसंगातील त्यांचे संवाद व त्यांची देहबोली लक्षात राहण्यासारखी होती. एखाद दुसऱ्या ठिकाणी काही पात्रांचे संवाद चुकल्यामुळे थोडा रसभंग झाला. फ्लॅशबॅकचा जोड मिळाल्यामुळे हे नाटक काहीशे एक सुरी वाटत असले तरी प्रेक्षकांवरची पकड शेवटपर्यंत राखण्यात हे नाटक यशस्वी ठरले.

नितीन नाईक यांनी आपल्या सजग दिग्दर्शनाद्वारे संहितेला योग्य न्याय दिला. आमदार कांबळी, वागळे, मोघे, व नार्वेकर टीव्ही बघत असताना फ्रीज होणे आणि तेव्हा फ्लॅशबॅकमधून कुलकर्णीचा भूतकाळ दाखविणे तसेच तो पत्नी सरस्वतीशी बोलत असताना रंगमंचावर असलेल्या चारी पात्रांनी त्यांना पाठ करून दोन्ही बाजूला बसणे.

असे प्रसंग प्रभावीपणे घेऊन नाईक यांनी आपली छाप सोडली. उमेश कारबोटकर यांची प्रकाशयोजना व दीपक गांवस यांचे पार्श्‍वसंगीतही नाटकाच्या जातकुळीला शोभेल असेच होते. गावकर यांचे नेपथ्य डोळ्यात भरण्यासारखे होते. पिंजरा बरेच काही सांगून जात होता. एकंदर राजकीय संहितेचे तुल्यबळ सादरीकरण करून ‘द ट्रॅप’ ने स्पर्धेत ठसा उमटवला हे निश्‍चित.

तरीही गर्दी कमीच

नाट्यस्पर्धेत ‘एक से एक बढकर’ कलाकृती सादर होत असल्या तरी राजीव गांधी कलामंदिर मात्र फुल्ल होताना दिसत नाही. त्यामुळे अजूनही गर्दीचे कोडे सूटेनासे झाले आहे. प्रस्तुत द ट्रॅप नाटकाला लोकांची बऱ्यापैकी गर्दी असली तरी बऱ्याच खुर्च्या आजही रिकाम्या दिसत होत्या.

त्यात विशेष म्हणजे या नाटकाला फोंड्याबाहेरच्या लोकांचीच जास्त गर्दी दिसत होती. त्यामुळेच कलेची खाण म्हणून गणल्या जात असलेल्या अंत्रुज महालातील प्रेक्षक कोठे आहेत, असा प्रश्‍न कलामंदिरात अनेकजण विचारताना दिसत होते.

प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यश

सुरुवातीची बरीच नाटके ही फक्त केवळ दोन तासाची असल्यामुळे काही नाटके विषयाचे आकलन करण्यात कमी पडली होती. पण द ट्रॅप हे व काल सादर झालेले ‘हयवदन’ या नाटकाने दोन तासाची मर्यादा ओलांडून विषयाचा वेध समर्थपणे घेतला. द ट्रॅप या आजच्या नाटकाला ही प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘आपल्या आमदारांना उमेदवारी देण्यापेक्षा तुम्ही विरोधी पक्षातून आणलेल्या उमेदवारांना उमेदवारी कशी देता?’ यासारख्या वाक्यांना प्रेक्षागृहातून टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला. यामुळेच स्पर्धेच्या कसोटीबरोबरच प्रेक्षकांचेही मनोरंजन करण्यात प्रस्तुत कलाकृती यशस्वी ठरली यात शंकाच नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com