पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळाल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. भाजपकडून मुख्यमंत्री प्रमोद सावंतांना विधीमंडळ गटनेता म्हणून निवडण्यात आलं आहे. मात्र मुख्यमंत्रीपदासाठी आता वाद पेटण्याची शक्यता आहे. प्रमोद सावंतांना आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आव्हान देण्याची शक्यता असल्याने गोव्यात नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
भाजपच्या विजयानंतर आता केंद्रीय निरीक्षक गोव्यात येतील आणि त्यानंतर विधीमंडळ पक्षाची बैठक होईल. आधी केंद्रीय संसदीय मंडळाची बैठक होईल. त्यानंतर राज्यात सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी आम्ही राज्यपालांकडे जाऊ, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. आता प्रमोद सावंत विधीमंडळ गटनेते असले तरीही त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावासाठी विरोध होण्याची शक्यता आहे. प्रमोद सावंत आणि विश्वजीत राणे यांच्यातील शीतयुद्ध सर्वश्रुत आहे. त्यामुळे विश्वजीत राणे मुख्यमंत्रीपदासाठी दावा करु शकतात. विश्वजीत राणेंनी असा पवित्रा घेतल्यास मात्र भाजपसमोर मोठा पेच निर्माण होऊ शकतो.
साखळी मतदारसंघात डॉ. प्रमोद सावंत यांचा अगदी कमी फरकाने विजय झाला आहे. काँग्रेसच्या धर्मेश सगलानी यांनी मुख्यमंत्री सावंतांना (Pramod Sawant) कडवी झुंज दिल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री निवडून आले असले तरीही त्यांना ही निवडणूक सोपी गेली नाही हे निश्चित. मात्र विश्वजीत राणेंनी अगदी सहजपणे विजय मिळवला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंतांना 12250 मतं मिळाली असून काँग्रेसच्या धर्मेश सगलानी यांना 11584 मतं मिळाली आहेत. प्रमोद सावंत फक्त 666 मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. दुसरीकडे वाळपई मतदारसंघात विश्वजीत राणेंना 14462 मतं मिळाली आहेत, त्यांच्यासमोर रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या मनोज परब यांचं तगडं आव्हान मानलं जात होतं. पण मनोज परब यांना 6377 मतं पडल्याने विश्वजीत राणे 8,085 एवढ्या मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत.
विश्वजित राणेंसाठी आणखी एक जमेची बाजू म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला पर्ये मतदारसंघही भाजपच्या ताब्यात आला आहे. विश्वजीत राणेंच्या पत्नी दिव्या राणेंनी आपली विधानसभेतली जागा पक्की केली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी विशेष प्रयत्न करुनही डिचोलीत भाजपच्या (BJP) राजेश पाटणेकरांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे विश्वजीत राणेंचं पारडं जड असल्याचं चित्र आहे. साखळीतही विश्वजीत राणेंनी प्रमोद सावंतांच्या विरोधात छुपा प्रचार केल्याचं बोललं जात आहे, ज्याचा फटका मुख्यमंत्र्यांना बसला आहे. काँग्रेसच्या (Congress) धर्मेश सगलानींना याचा फायदाच होणार होता, मात्र त्यांचा निसटता पराभव झाला. आता सत्तास्थापनेच्या दाव्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी विश्वजीत राणे काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.