पणजी: देशात प्रतिष्ठेच्या बनलेल्या गोव्याच्या आठव्या विधानसभेसाठी आज शांततेत मतदान पार पडले. 2017 सालच्या तुलनेत तीन टक्क्यांनी मतदान कमी झाले असून एकूण 80 टक्के मतदान झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी दिली. यंदा घसरलेल्या मतदानाची आकडेवारी कुणाच्या पथ्यावर पडणार, याबाबत तर्क-वितर्कांना ऊत आला आहे.
मात्र, या कमी झालेल्या मतदानामुळे प्रस्थापितांचे धाबे दणाणले असून अनेक ठिकाणच्या लढती चुरशीच्या बनल्या आहेत.कुणाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात 78.94 टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान साखळीत 89.64 टक्के झाले तर सर्वांत कमी मतदान बाणावलीत 70.02 टक्के झाले. दक्षिण गोव्यात यंदा 79.84 टक्के, तर उत्तर गोव्यात 78.15 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जनतेने केलेल्या या मतदानाचा कौल कुणाच्या बाजूने असणार? कोण बाजी मारणार आणि कुणाचे सरकार स्थापन होणार, याची आता सगळ्यांनाच उत्कंठा लागली आहे. 10 मार्चला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे पुढील 25-26 दिवस निवडणूक निकालाविषयी वेगवेगळे तर्क-वितर्क व्यक्त करण्यात येतील.
राज्यात पाच गुन्ह्यांची नोंद
शांततेत मतदान पार पडले असले तरी पाच गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक राजेश कुमार यांनी दिली. कोलवा येथे रोख रक्कम वाटताना एकाला अटक केली. त्याच्याकडून 1 लाख 19 हजार 270 रुपये जप्त केले. फोंडा येथे मतदान यंत्राचे मोबाईलच्या साहाय्याने फोटो घेताना गीतेश नाईक याला पोलिसांनी अटक केली. अशाच प्रकारे पर्वरी येथे मतदान यंत्राचे मोबाईलवर फोटो घेताना संदीप मांद्रेकर याला अटक केली. ओल्ड गोवा येथे मतदान करण्यापासून रोखल्याबद्दल एकावर गुन्हा नोंदवला.
12.72 कोटींची मालमत्ता जप्त
निवडणूक आचारसंहितेच्या काळात पोलिस व अबकारी खात्याने घातलेल्या छाप्यात सुमारे 12.72 कोटींची मालमत्ता जप्त केली. त्यामध्ये 6.68 कोटींची रोख रक्कम, 3.57 कोटींचा मद्यसाठा, 2 लाखांचे सुवर्ण व चांदीच्या वस्तू तसेच 1.2 कोटींच्या अंमली पदार्थांचा समावेश आहे.निवडणूक आयोगाने तक्रारी दाखल करण्यासाठी सी व्हिजिल ॲप उपलब्ध केले होते. या ॲपवर 612 तक्रारी आल्या यापैकी 60 टक्के तक्रारी अधिकृत होत्या. या तक्रारींवर त्वरित भरारी पथकाने कारवाई केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.