फोंडा तालुक्यातील चारपैकी फोंडा व शिरोडा या दोन जागा गेली कित्येक वर्षे कॉंग्रेसचा बालकिल्ला म्हणून गणल्या जात होत्या. 2017 साली फोंड्यातून कॉंग्रेसचे रवी नाईक यांनी 3050 तर शिरोड्यातून कॉंग्रेसचे सुभाष शिरोडकर यांनी 5 हजार मतांनी विजय प्राप्त केला होता. पण यावेळच्या निवडणुकीत दोन्ही मतदारसंघ कॉंग्रेसच्या हातातून निसटले.
रवी नाईक आणि सुभाष शिरोडकर यांनी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये उडी मारल्यानंतर शिरोडा व फोंड्यातील समीकरणे बदलली. रवी आणि सुभाष यांचे कार्यकर्ते, जे कॉंग्रेसमध्ये होते. ते भाजपमध्ये (BJP) दाखल झाले. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांतील कॉंग्रेसची शक्ती बरीच कमी झाली. शिरोड्यात तर कॉंग्रेसची वाताहत झाल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. येथे कॉंग्रेसच्या तुकाराम बोरकर यांना फक्त 1,953 मते प्राप्त झाली. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी शिरोड्यावर राज्य करणाऱ्या कॉंग्रेसला यावेळी आपली अनामत रक्कम वाचविणेसुध्दा शक्य झाले नाही.
शिरोड्याच्या मानाने फोंड्यात (Ponda) परिस्थिती बरी आहे. येथे कॉंग्रेसचे राजेश वेरेकर यांना 6,800 हून अधिक मते प्राप्त झाल्यामुळे ते शर्यतीत असल्याचे दिसून येत आहे. त्यांना जरी तिसरा क्रमांक प्राप्त झाला असला तरी त्यांच्यात व विजयी ठरलेल्या भाजपचे उमेदवार रवी नाईक यांच्याच मतांचा मोठा फरक नाही. पण तरीही या मतदारसंघावर असलेले कॉंग्रेसचे वर्चस्व बरेच कमी झाल्यासारखे वाटते. कारण, वेरेकर यांना मिळालेल्या मतांत त्यांच्या वैयक्तिक मतांचे लक्षणीय प्रमाण आहे. गेल्यावेळी कॉंग्रेसतर्फे लढताना रवी नाईक यांना 9,450 मते प्राप्त झाली होती. त्या मतांशी तुलना करता यावेळी कॉंग्रेसची मतपेढी 2,500 पेक्षा अधिक मतांनी कमी झाल्याची दिसते.
मडकई आणि प्रियोळ मतदारसंघात कॉंग्रेस कधीच बलवान नव्हती. यावेळीही त्या पक्षाचे पूर्वीसारखेच पानिपत झाले आहे. यावेळी मडकईतून कॉंग्रेसने फोंड्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांना रिंगणात उतरविले होते. पण ते विशेष काही करिश्मा दाखवू शकले नाहीत. त्यांची मजल फक्त 1,090 मतांपर्यंत पोहचू शकली. प्रियोळात तर कॉंग्रेसचे दिनेश जल्मी यांना केवळ 303 मतेच मिळाली. उर्वरित पक्षांचे या मतदारसंघातले मताधिक्य पाहता मडकई व प्रियोळ हे दोन मतदारसंघ कॉंग्रेसपासून अजूनही बरेच दूर असल्याचे परत एकदा दिसून आले आहे. आता शिरोडाही याच वाटेवर असल्याचे प्रतीत होत आहे. फोंड्यात त्यामानाने थोडे आशादायी वातावरण असले तरी रवी नाईक मंत्री झाल्यास हे वातावरण किती टिकेल, हे सांगणे कठीण आहे.
शिरोड्यात निवडणूक झाल्यानंतर गटसमिती बरखास्त केल्यामुळे कॉंग्रेस (Congress) अधिकच मागे गेली आहे. ही गटसमिती का बरखास्त केली, हे कळायला मार्ग नाही. कदाचित शिरोडा कॉंग्रेसमध्ये चाललेल्या सुंदोपसुंदीचा हा परिणाम असावा, असे वाटते. तरीही 2017 पर्यंत फोंडा तालुक्यावर बऱ्याच प्रमाणात राज्य करणाऱ्या कॉंग्रेसची ही दुरवस्था खटकण्यासारखी झाली आहे. येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत तसेच पुढील वर्षी होऊ घातलेल्या फोंडा नगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेस कितपत बाजी मारतो, यावर त्या पक्षाचे तालुक्यातील भवितव्य अवलंबून आहे. पण सध्या तरी फोंडा तालुक्यात कॉंग्रेसला मोठे खिंडार पडले आहे, हे निश्चित. आता हे खिंडार बुजवण्याचा प्रयत्न कॉंग्रेसश्रेष्ठी कसे करतात, याचे उत्तर आगामी काळातच मिळू शकेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.