फोंडा : फोंड्यात काँग्रेसतर्फे राजेश वेरेकर, म.गो. पक्षातर्फे डॉ. केतन भाटीकर तर भाजपतर्फे माजी मुख्यमंत्री व फोंड्यातून पाच वेळा निवडून आलेले आमदार रवी नाईक हे रिंगणात आहेत. फोंड्यात साडेपंचवीस हजाराच्या वर मतदान झाले असून साधारण 8500 ते 9000 पर्यंत मते मिळविणारा ‘जैतवंत’ ठरणार आहे. गेल्या खेपेला काँग्रेसचे रवी नाईक यांनी 9450 मते प्राप्त करून 3050 मतांनी विजय प्राप्त केला होता, पण यावेळी विजयी उमेदवारांचे मताधिक्य पाचशे ते हजाराच्या आत असेल, असा अंदाज व्यक्त होत आहे, त्यात परत यावेळी फोंड्यात बरीच गद्दारी झाल्याचे ऐकायला मिळत असून ‘वरुन कीर्तन आतून तमाशा’ असे प्रकारही प्रत्यक्षात आले आहेत. (Ponda Constituency News Updates)
‘सायलंट व्होटर्स’नीही महत्त्वाची भूमिका बजावली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्याचप्रमाणे मुस्लिम मतदारही महत्त्वाचे ठरणार आहेत. काँग्रेसला हमखास जिंकून देणारी मते असा पूर्वी या मतांचा बोलबाला होता. यावेळी या मतांवर काँग्रेसचा वरचष्मा आहे असे वाटत असले, तरी रवींच्या ‘गुडविला’मुळे काही प्रमाणात भाजपलाही (BJP) मते प्राप्त झाल्याचे मतदारांचा कानोसा घेतल्यावर आढळून आले आहे. त्याचप्रमाणे काही मते मगोप.कडे तसेच आम आदमी पक्षाकडे वळल्याचेही दिसून आले आहे.
कॅथलिक मतांबाबतही असे चित्र दिसते आहे. बिगर गोमंतकीयांनी कोणाच्या पारड्यात कौल घातला हे स्पष्ट दिसत नसले तरी त्यांची मते काँग्रेस वा भाजपकडे वळण्याची शक्यता अधिक दिसत आहे. फोंड्यात भंडारी समाजाचीही जवळ जवळ साडेपाच हजार मते असून ही मते निर्णायक ठरणार आहेत. विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) झाल्यानंतर आता उमेदवारांचा टपाल मतांवरही डोळा लागून राहिला आहे. मागच्या वेळी ह्याच मतांत रवींनी आघाडी घेतली होती. यावेळीही त्यात फरक पडेल अशी संभावना नाही. यावेळी प्रत्येक मताला किंमत आल्यामुळे ‘इंच इंच तथ्य’ अशी उमेदवारांची अवस्था झाली आहे.
रवींचा फोंड्याशी पारंपारिक संबंध असल्यामुळे त्यांना ‘पात्रावा’चा फायदा झाला आहे, असा दावा रवींचे कार्यकर्ते करताना दिसताहेत, तर फोंड्यात काँग्रेसची (Congress) पारंपरिक मते असल्यामुळे काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचा प्रतिदावा काँग्रेस कार्यकर्ते कताना दिसताहेत. आता प्रत्यक्षात काय होते, ‘नेहले पे देहला’ कोण ठरतो, फोंड्याचा ‘राजा’ कोण बनताे याची उत्तरे 10 मार्चलाच मिळणार हे निश्चित.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.