दक्षिण गोव्याचा विकास झाला; पण त्यात सातत्य नाहीच..

गैरप्रकारांचा तिटकारा : नियोजनबध्द विकासाच्या दूरदृष्टीची मतदारांना अपेक्षा
Goa Election
Goa ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोवा विधानसभेची निवडणूक अवघी आठवडाभर आलेली आहे विविध पक्षांचे उमेदवार तसेच अपक्ष यांचा आक्रमक प्रचार सुरू आहे. विरोधकांवर प्रखर टिका तसेच आपला जाहीरनामा मतदारांच्या गळी उतरविण्यासाठी विविध पक्ष तसेच उमेदवारांची प्रयत्नांची शर्थ सुरू केली आहे. पण, उमेदवारांचा जाहीरनामा वा वचननामे यांच्यावर मतदाराला कितपत विश्र्वास आहे, मतदाराला काय हवे आहे याचा विचार कुणीच करताना तसेच त्याच्या मनांत काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न कोणी करताना दिसत नाही. या प्रतिनिधीने मडगाव व दक्षिण गोव्यातील (Goa) काही मतदारांशी संपर्क साधला असता त्यांना स्थिर प्रशासन, नियोजनबद्ध विकासाची त्याचप्रमाणे लोकांना सहज उपलब्ध होणारा उमेदवार हवा असेच दिसून आले. (Public accusations against goa Government backround of goa election 2022)

Goa Election
कुंभारजुवे मतदारसंघात मडकईकरांचे स्थान ‘धोक्यात’

बहुतेकांनी असे मत व्यक्त केले की, गेल्या पाच वर्षात राज्याला व लोकांना स्थिर सरकार मिळाले खरे; पण ते अनेक भानगडी व गैरप्रकारांनी गाजले. विशेषतः सरकारी नोकऱ्यांच्या लफड्याने त्याची सारी पत वाया गेली. लोकांना सरकारी नोकऱ्या (Government Job) हव्या असतात त्या भविष्यकालीन शाश्र्वतीसाठी. पण, सत्ताधाऱ्यांतील एका आमदारानेच सरकारी नोकऱ्यांसाठीचा घोटाळा उघड केला व त्यामुळे त्या नोकऱ्या रहीत ठेवल्या गेल्या व त्यामुळे अनेक उमेदवार अडचणीत आले.

बहुतेक मतदारांना (Voter) सरकारी नोकऱ्या व विविध सरकारी सवलती मिळवून देणाराच मतदार हवा. त्यांची सारी भिस्त राजकीय पक्षावर नाही तर उमेदवारावरच आहे. काही मुस्लीम मतदारांनी आजवर सर्व राजकीय पक्षांनी आपला वापर करून घेतला. पण, आपल्या विशेषतः कब्रस्तान विषयक समस्या तशाच आहेत व आता तर त्यासाठी संपादन केलेल्या जमिनीचा झोन बदलून संबंधितांनी आपले खरे रुप दाखवून दिल्याचे सांगितले.मोजक्याच मतदारांनी आपला कोणत्याच पक्षावर वा उमेदवारावर विश्र्वास नसल्याचे सांगितले. नोटाच्या बाजूने आपण राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मडगाव (Margao) बाजारातील व्यापारी देविदास बोरकर यांनी सांगितले की, उमेदवार हा लोकांना सहज उपलब्ध होणारा असावा. ज्याला ते शक्य नाही त्याने निवडणुकीच्या फंदातच पडू नये. उमेदवारांप्रती लोकांची बदललेली दृष्टी हेच दर्शवते. कोणी फोन केला व त्यावेळी ते गडबडीत असतील तर नंतर स्वतः त्या व्यक्तीशी संपर्क करून त्याची बाजू समजून घेण्याची तसदी संबंधिताने घ्यायलाच हवी. उमेदवाराने आश्र्वासने देताना त्या बाबत गांभिर्याने विचार करावा जी शक्य नसतील ती आश्र्वासने देऊ नयेत असे सांगताना त्याने मडगावांतील गेली दहा वर्षे शीतपेटीत पडून असलेल्या बसस्थानकाचा उल्लेख केला.

..तर पश्चिम बगल रस्ता का रखडला?

एका अभियंत्याने सांगितले, दक्षिण गोव्याचा विकास झाला; पण त्यात सात्यत नाही. नियोजनबध्द विकासाची दूरदृष्टी असलेले लोकप्रतिनिधी विधानसभेत यायला हवेत. कारण एका वर्षात मांडवीवरील ‘अटल सेतू’ उभा राहू शकतो; पण मडगावचा पश्र्चिम बगल रस्ता गेली काही दशके रखडलेला आहे, याकडेही या अभियंत्याने लक्ष वेधले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com