मडकईत पुन्हा होणार ‘सिंहगर्जना’?

मगोपच्या बालेकिल्ल्यात मतदारांचा कौल नेमका कुणाला?
Political Fight in Madkai Constituency
Political Fight in Madkai ConstituencyDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा : मडकई मतदारसंघ हा मगोपचा बालेकिल्ला. इथे आतापर्यंत मगोचेच वर्चस्व दिसून आले आहे. ही निवडणूक त्याला अपवाद असणार नाही, असे संकेत मिळू लागले आहेत. सध्या या मतदारसंघात ‘एकतर्फी’ वातावरण दिसते आहे. विशेष म्हणजे मतदारसंघातील मगोपचे उमेदवार असलेले माजी उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर हे प्रचाराकरिता फिरताना दिसत नाहीत. त्यांच्या ऐवजी त्यांचे पुत्र व बंधू तसेच इतर कार्यकर्ते मतदारसंघ पिंजून काढताना दिसताहेत. सुदिन मात्र राज्यातील मगोपच्या इतर उमदेवारांच्या प्रचारात व्यग्र आहेत. सुदिन हे मडकईतून पाच वेळा निवडून आले असून सहाव्यांदा विधानसभेत प्रवेश करण्याच्या तयारीला लागले आहेत. त्यांची खरी लढत आहे, ती भाजपचे सुदेश भिंगी व कॉंग्रेसचे लवू मामलेदार यांच्याशी. नाटक सुरु होण्यापूर्वीच ‘क्लायमॅक्स’ माहीत असावा ,असे मडकईतील हे राजकीय नाट्य पाहून वाटू लागले आहे. सुदेश भिंगी व लवू मामलेदार हे एकेकाळचे सुदिन ढवळीकर यांचे निकटवर्तीय असल्यामुळे ही ‘लुटपुटूची’ लढाई तर नाही ना असेच वाटू लागले आहे. (Political Fight in Madkai Constituency News Updates)

Political Fight in Madkai Constituency
भाजप 'जुमला पार्टी' आहे; गोमंतकीयांनी कॉंग्रेसलाच मत द्यावे: अशोक चव्हाण

सुदेश भिंगी हे वाडी तळावलीचे माजी उपसरपंच असल्यामुळे त्यांचा याच पंचायतीशी जास्त संबंध आहे. पण मडकईत वाडी तळावली शिवाय कवळे, बांदोडा, मडकई, कुंडई, दुर्भाट-आडपई-आगापूर या पाच पंचायती येतात. आणि या सहाही पंचायतीवर सध्या सुदिनांचेच सरपंच व पंच दिसताहेत. यातून सुदिनांचे या मतदारसंघावर असलेले वर्चस्व प्रस्थापित होते. भिंगी सुदिन यांना ‘झुंज’ देण्याचा प्रयत्न करीत असले तरी, त्यांची झेप कुठपर्यंत जाईल,हे सांगता येणे कठीण आहे. मागच्या जि.पं. निवडणुकीत मगोपने कवळे जि.पं.ची उमेदवारी गणपत नाईक यांना दिल्यामुळे सुदिन व सुदेश यांच्यात बिनसले होते. त्यामुळे सुदेश यांनी रिंगणात उतरून गणपत यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. पण हा त्यांचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला. आता पुन्हा याच प्रयत्नांची सुदेश भिंगी पुनरावृत्ती करू पहात आहेत. पण त्यात ते किती यशस्वी होतील, हे सांगणे बरेच कठीण आहे.

Political Fight in Madkai Constituency
Goa Election: नितीन गडकरी यांच्या हस्ते भाजपचे संकल्प पत्र जाहीर

दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसतर्फे (Congress) फोंड्याचे माजी आमदार लवू मामलेदार हे निवडणूक लढवित आहेत. ते सध्या दुहेरी पेचात पडल्यासारखे दिसताहेत. एक म्हणजे मडकईत कॉंग्रेस असून नसल्यासारखीच. त्यामुळे लवूंना सध्या कार्यकर्त्यांची जमवाजमव करावी लागत आहे. दुसरे म्हणजे लवू हे फोंड्याचे माजी आमदार असल्यामुळे त्यांचा तसा मडकईशी वैयक्तिक असा संबंध नाही. त्यामुळे त्यांची इथे वैयक्तिक ‘मतपेढी’ नाही. याकरिता सध्या लवूंना जबरदस्त आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे. सुदिनांना तोंड देण्याकरिता जी पूर्वतयारी पाहिजे तीही लवू यांची दिसत नाही. कॉंग्रेसपक्ष अजून एकदाही मडकईतून विजयी झालेला नाही, हा इतिसहास ही लवूच्या विरोधात जात आहे.आपतर्फे उमेश तेंडूलकर हे रिंगणात आहेत. खरेतर ही उमेदवार गुरुनाथ नाईक यांना जाहीर झाली होती. पण शेवटच्या क्षणी गुरुनाथ नाईक यांनी अंग काढून घेतल्यामुळे ही उमेदवारी तेंडूलकरांच्या गळ्यात पडली. सध्या ते प्रचार करताना दिसत असले तरी त्यांचा किती प्रभाव पडेल हे सांगता येत नाही. रिव्होल्युशनरी गोवन्सतर्फे प्रेमानंद गावडे हे रिंगणात असून गोंयचो स्वाभिमान या पक्षाने संतोष तारी यांना उमेदवारी दिली आहे. जय महाभारत तर्फे हरिश्चंद्र नाईक हे रिंगणात उतरले आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) रवींद्र तळावलीकर यांना उमेदवारी दिली असली तरी मडकईत राष्ट्रवादीचे कार्यच नसल्यामुळे उमेदवार रिंगणात उतरविण्याचे प्रयोजन काय, हेच कळत नाही. ते जेवढी मते घेतील तेवढी ती कॉंग्रेसला महाग पडू शकतात. आणि असे झाल्यास काँग्रेसची अवस्था ‘आधीच उल्हास त्यात फाल्गून मास’ अशी होऊ शकते. एकंदरीत मडकईचे चित्र हे एकांगी वाटत असून इथले मतदार निकाल माहीत असल्यासारखे वागताना दिसत आहेत. सुदिन तर आपला ‘प्रचार’ पाचही वर्षे चालू असल्याचे सांगताना दिसतात. त्यातून त्यांचा जबर आत्मविश्वास दिसून येतो. आणि हा त्यांचा आत्मविश्वास इतर आमदारांना ‘अंतर्मुख’ करायला लावणारा ठरू शकतो. सध्या बऱ्याच मतदारसंघातील आमदारांची अवस्था ‘ पळा पळा, कोण पुढे पळे तो ’ अशी झाली असताना मडकईत ‘आलबेल’ का हा प्रश्न उपस्थित होतो. आता हे ‘आलबेल ’ मतदानाद्वारा प्रत्यक्षात दिसते, की हे ‘मृगजळ’ ठरते याचे उत्तर निकालानंतरच मिळेल.

Political Fight in Madkai Constituency
गोवा निवडणूक प्रचारादरम्यान TMC नेते बाबुल सुप्रियो यांच्यावर हल्ला?

...तर हाय व्होल्टेज लढत झाली असती

खरेतर सुरुवातीला माजी मुख्यमंत्री रवी नाईक हे मडकईतून सुदिन यांच्या विरूध्द उतरणार अशी ‘हवा’ होती. रवी जर सुदिन ढवळीकरांविरोधात उतरले असते तर मात्र ती एक ‘हाय व्होल्टेज’ लढत झाली असती. रवींनी मडकईतून उतरायला हवे होते,अशी प्रतिक्रिया मडकईतील अनेक मतदार आजसुध्दा व्यक्त करताना दिसताहेत. त्याचबरोबर नंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा विद्या गावडे यांना भाजप (BJP) उमेदवारी देणार, असे संकेत होते. पण शेवटच्या क्षणी ही उमेदवारी सुदेश भिंगीच्या गळ्यात पडली. त्यामुळे सुदिन यांना मैदान मोकळे करून देण्याचे हे राजकीय ‘सेंटिग’ तर नव्हे ना, असा संशय बरेच राजकीय विश्लेषक घेताना दिसत आहेत.पण सध्याची समीकरणे ही सुदिन ढवळीकर यांच्या पथ्यावर पडताना दिसत आहेत, एवढे मात्र खरे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com