जो राजनेता खऱ्या इतिहासाची कदर करीत नाही, वोट बँकसाठी खरा इतिहास कथन करण्यास घाबरतो. त्याला इतिहास माफ करीत नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) गोवा मुक्तीच्या हिरकमहोत्सवात (Goa Liberation Day) संबोधित करताना कुंकळळीच्या क्रांतीचा उल्लेख करण्यास विसरले. सतराव्या शतकातील पिंटोचे बंड मोदीना आठवले, मात्र परकीय सत्ते विरुद्धची प्रथम रक्त रंजीत क्रांती ठरलेला कुंकळळीच्या (Cuncolim) 1583 च्या क्रांतीची आठवण मोदींना झाली नाही. गोवा मुक्तीच्या पंचविसाव्या मुक्तीदिनाला जी चूक माजी राष्ट्रपती दिवंगत शंकर दयाळ शर्मा (Shankar Dayal Sharma) यांनी केली, तीच चूक 35 वर्षांनी मोदीने केली, म्हणून कुंकळ्ळीकर म्हणायला लागले आहेत मोदीजी कोंबडा झाकला म्हणून दिवस उजाडायचा राहत नाही.
कुंकळ्ळीत पुन्हा भीतरलो, भायलो वाद!
‘मोडिल्या खुर्साक कोण चेपें काढता?’ अशी कोकणीत एक म्हण आहे. निवडणुका आल्या की नको असलेले आव्हान देण्यास अनेक जण पुढे येतात. कुंकळळीत काही जणांनी येऊन मुक्तीचे आव्हान ‘मिशन’ सुरू केले असून कुंकळळीला म्हणे हे भायलो म्हणजे मतदारसंघा बाहेरील आमदारापासून मुक्त करणार. ‘ना टूटेंगे ना टूटने देगे, ना हारेंगे ना हारने देंगे’ असे घोष वाक्य घडविले आहे. आता हा सगळा खटाटोप युरी आलेमाव यांना विरोध करण्यासाठी आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. युरीने भायलो हा टॅग काढण्यासाठी कुंकळळीत घर घेतले, आपले मतदान कुंकळ्ळीत आणले तरी युरी भायलोच? भायलो नाका, हे मिशन तीनदा फसले तरी पुन्हा तेच करण्याचा फायदा काय? साहेबांनो तुमचा बॅंनर नव्हे तर मतदार ठरविणार भायलो कोण? व भीतरलो कोण? ∙∙∙
भाजपाकडून पंतप्रधानांची सभा हायजॅक
गोवा मुक्तिदिनाचा आजचा कार्यक्रम पूर्णतः शासकीय होता. गेल्या पंधरा दिवसांपासून मुख्यमंत्री तसे सांगत होते, आणि कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका सर्वांना अगदी सर्व स्वातंत्र्यसैनिकांना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र मुख्य सभागृहाच्या बाहेर भाजपचे झेंडे पंतप्रधान, मुख्यमंत्री, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रतिमांशिवाय मुख्यसभागृहात भाजपा नेत्याचा वावर होता. त्यामुळे ही सभा भाजपाने हायजॅक केल्याचे स्पष्ट होते. ∙∙∙
उपाशीपोटी बंदोबस्त
‘रेड्या-पाड्यांच्या भांडणात आड्यावर काळ’ अशी एक कोकणीत म्हण आहे. कोणीही व्हीव्हीआयपी गोव्यात आले, की बंदोबस्त करण्यासाठी जे पोलीस तैनात केले जातात, त्यांना प्रत्येकवेळी हा अनुभव येतोच. कारण गोव्यात येणारे तुपाशी होतात, तर हे पोलिस बापडे उपाशी राहतात. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गोवा भेटीच्यावेळीही हाच अनुभव आला. शनिवारी या पोलिसांना तालमीसाठी बोलावून तळपत्या उन्हात ठेवले. पण त्यांना जेवण सोडा साधी पाण्याची बाटलीही कोणी दिली नाही. काल रविवारीही त्यांना हाच अनुभव आला. गोवा मुक्तीदिन असल्यामुळे असेल कदाचित काही पोलिसांना एक पाण्याची बाटली आणि एक केक स्लाईस आणि पेटीस असलेला बॉक्स मिळाला, मात्र जेवणासाठी फ्राईड राईसचे पाकीट दिले होते. त्यातील फ्राईड राईस तोंडातही घालण्या सारखा नव्हता. कदाचित तुम्ही तर पोलिस, तुमची व्यवस्था बाहेरच्या बाहेर करण्यास काय हरकत असे पोलीस प्रमुखच म्हणत नसतील ना? ∙∙∙
मुख्यमंत्र्यांचे एक्स्प्रेस भाषण!
राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना एखाद्या ठिकाणी भाषण करायचे म्हटले, की ते आपली नेहमीची ‘आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा’ टेप सुरू करतात. आजही त्यांनी गोवा मुक्तिदिनाच्या सोहळ्यावेळी सुरू केली. मात्र आजच्या भाषण करण्याची गती काही वेगळी होती. राज्यात केलेली विकासकामे व लोकांसाठीच्या विविध योजनांचा आढावा त्यांनी ज्या ‘एक्स्प्रेस’ गतीने घेतला, त्यासाठी त्यांची प्रशंसा करायला हवी. पुरस्कार देऊ सन्मानित करतानाही त्यांची घाई दिसत होते. गोवा मुक्तिदिनाच्या सोहळ्यापेक्षा त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी दाबोळी विमानतळावर पोहचायचे होते. त्यामुळे त्यांची ही लगबग सुरू होती. पुरस्कार लाभलेल्या व्यक्तींकडून वेळ होऊ नये, म्हणून ते स्वतःच हातवारे करून लवकर येण्याचे संकेत देत होते. त्यामुळे त्यांना झालेली घाई ही मोदी यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर जाण्यासाठी होती हे जाणवत होती. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.