प्रियोळचा ‘दीपक’ पुन्‍हा बुजणार?

राजकारण गतिमान : ढवळीकरांसमोर मंत्री गावडे यांचे कडवे आव्‍हान.
Deepak  Dhavalikar 
Goa Election
Deepak Dhavalikar Goa ElectionDainik Gomantak

Goa Election: प्रियोळ मतदारसंघात (Constituency) सध्या राजकीय वातावरण गतिमान झाले असून कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर व उद्योजक संदीप निगळ्ये यांनी प्रचारास जोर लावला आहे. या संभाव्य तिरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Deepak  Dhavalikar 
Goa Election
चोडणकर साहेब हवेत कसले बार काढताय?

मागच्या निवडणुकीत (Election) मंत्री गोविंद गावडे यांनी तत्कालीन आमदार दीपक ढवळीकर यांचा पाच हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. आता ही कसर भरून काढण्याचा प्रयत्न ढवळीकर करायला लागले आहेत. संदीप निगळ्ये हे या लढतीचा तिसरा कोन असल्यामुळे गेल्या खेपेला गावडे-ढवळीकर यांना मिळालेल्या मतांपैकी काही मते आपल्या बाजूला कशी वळविता येतील या प्रयत्नात ते आहेत. आपल्याला भाजपची उमेदवारी मिळणार असा ते दावा करीत आहेत. पण त्‍यात विशेष तथ्य आहे असे मिळालेल्या माहितीवरून दिसत नाही. परवा रवी नाईक यांनी केलेल्या भाजपप्रवेशावेळी मंत्री गोविंद गावडे हेही उपस्थित होते. त्यावेळी रवींमागोमाग आता गावडेही भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा तिथे सुरू होती. अर्थात गावडे यांनी याचा इन्‍कार केला असला तरी मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांत मंत्री गावडे यांचा भाजपप्रवेश होण्याची शक्यता आहे.

गुरुनंतर शिष्‍य भाजपच्‍या वाटेवर?

सध्या गोविंद गावडे हे भाजप (BJP) सरकारमध्‍ये (Government) मंत्री आहेत. त्यांना पक्षात प्रवेश दिल्यास भाजपला हा मतदारसंघ काबीज करणे सोपे जाईल असा तर्क लढवला जात आहे. त्यात परत रवी व गोविंद यांचे गुरु-शिष्याचे नाते असल्यामुळे गुरुच्या पावलावर पाऊल ठेवून शिष्य ही भाजपची वाटचाल करू शकतात असे मत व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे मगोच्या दीपक ढवळीकरांचा प्रचार नेटाने चालला असून ते वाड्यावाड्यावर फिरताना दिसताहेत. मात्र मगोने तृणमूलशी (TMC) केलेली युती त्यांच्या अंगलट येऊ शकते. तृणमूलतर्फे लोककलाकार कांता गावडे, स्वाती केरकर हे रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू होती. कांता गावडेंनी तर घरोघरी फिरत आपल्या प्रचाराची सुरुवातही केली होती. आता हा मतदारसंघ मगोकडे जाण्याचे निश्चित असल्यामुळे कांता गावडे, स्वाती केरकर व इतर तृणमूलवासी मगोपच्या प्रचाराला जुंपून घेतात का वेगळी भूमिका घेतात हे बघावे लागेल.

तृणमूल आहेही आणि नाहीही!

तसे पाहायला गेल्यास प्रियोळात तृणमूलची अशी स्वतःची मते नाहीत. त्यामुळे इच्छुक उमदेवार वैयक्तिक मतांवरच भर देऊन प्रचार करताना दिसत होते. पण आता त्यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेल्यातच जमा आहेत. त्याचप्रमाणे मगोपचे पारंपरिक मतदारही तृणमूलला आपला ‘पार्टनर’ म्हणून मानायला तयार नसल्याचे त्यांच्याशी बोलल्यानंतर समजते. याचाही परिणाम मगोवर किती होतो हे बघावे लागेल.

संदीप निगळ्‍ये संभ्रमावस्‍थेत

संदीप निगळ्ये यांनीही आपल्या प्रचाराला नेट लावला असून तेही प्रत्येक मतदाराशी वैयक्तिक संपर्क साधताना दिसत आहेत. वाड्यावाड्यावर त्यांच्याही बैठका आहेत. लोकांना ते आपली भूमिका पटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘व्होकल फॉर लोकल’ याचा नारा देऊन आपणच कसे प्रियोळचे स्थानिक उमेदवार असल्याचे ते लोकांना सांगत आहेत. भाजपने उमेदवारी न दिल्यास त्यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरविणार असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगितले जातेय. त्याचबरोबर भाजपने उमेदवारी न दिल्यास ‘बंडाचा झेंडा’ फडकवण्याचा इशाराही काही भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे. त्‍यामुळे निगळ्ये यांची भूमिका सध्या ‘त्रिशंकू’ अवस्थेत असल्यासारखी झाली आहे. ते कोणत्या दिशेने जातील हे सांगणे सध्‍या तरी कठीण आहे.

Deepak  Dhavalikar 
Goa Election
गोव्यात काँग्रेस-शिवसेना एकत्र लढणार?

‘आप’तर्फे नोनू, ‘आरजी’तर्फे विश्‍‍वेष

आम आदमी पक्षातर्फे (AAP) नोनू नाईक यांनी तयारी चालविली असून त्यांनी माशेलमध्ये आपले प्रचारकार्य सुरू केले आहे. तर, मंत्री गावडे हे मतदारसंघातील विकासकामांवर शेवटचा हात फिरवताना दिसत आहेत. आपण केलेल्या कामांची जंत्री घेऊनच ते मतदारांपर्यंत जात आहेत. रिव्होल्युशनरी गोवन्सतर्फे विश्वेष नाईक हे रिंगणात उतरण्याच्या तयारीला लागले आहेत.

काँग्रेस पक्षात अजूनही सामसूम

प्रियोळात मगोबरोबरच भाजपची स्वतःची अशी मते आहेत. मागच्यावेळी मंत्री गावडे अपक्ष म्हणून लढले असले तरी त्यांना भाजपने पाठिंबा दिला होता हे विसरता कामा नये. म्‍हणूनच अपक्ष म्हणून रिंगणात उतरून प्रियोळात बाजी मारणे शक्य होईल की काय, हे सांगणे सध्या तरी कठीण आहे. काँग्रेसच्या (Congress) गोटात मात्र निरव शांतता दिसत आहे. वेलिंग-प्रियोळ-कुंकळ्येचे पंच तसेच काँग्रेसचे युवा नेते ॲड. वरद म्हार्दोळकर यांचे प्रियोळातील उमेदवारीबाबत नाव घेतले जात आहे. काँग्रेसने या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. कदाचित त्‍यामुळेच काँग्रेस पक्ष एकदाही या मतदारसंघातून विजय मिळवू शकलेला नाही. आता म्हार्दोळकर ही कोंडी फोडू शकतात काय, हे बघावे लागेल.

सात पंचायती ठरणार प्रभावी

प्रियोळ हा ग्रामीण मतदारसंघ असला तरी क्षेत्रफळदृष्ट्या बराच विस्तारीत आहे. या मतदारसंघात सात ग्रामपंचायती असून, तेथील राजकारणावरही प्रियोळचे भवितव्य बऱ्याचअंशी अवलंबून आहे. बेतकी-खांडोळा ही पाच पंचायतींचा समावेश असलेली, प्रियोळ ही प्रियोळ पंचायतीचा समावेश असलेली व कुर्टी ही वेरे-वाघुर्मे पंचायतीचा समावेश असलेली जिल्हा पंचायत प्रियोळ मतदारसंघात येते. गतसाली झालेल्या जिल्‍हा पंचायत निवडणुकीत बेतकी-खांडोळा येथे भाजपने तर कुर्टी व प्रियोळ येथे मगोपने बाजी मारली होती. बेतकी-खांडोळा जिल्हा पंचायत जिंकण्यात मंत्री गावडे यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांचे समर्थक श्रमेश भोसले हे निवडून आले होते.

विजयाबाबत तर्क-वितर्क सुरू

प्रियोळ मतदारसंघातील समीकरणे अजूनही अस्पष्ट असली तरी भाजप व मगो यांची अटीतटीची लढत ‘कार्डावर’ असणार यात संशयच नाही. यदाकदाचित निगळ्ये यांनी माघार येऊन ढवळीकर यांना पाठिंबा दिला तर मात्र त्‍यांची गावडे यांच्याशी जोरदार लढत होऊ शकेल, असा राजकीय विश्लेषकांचा होरा आहे. पण एकंदरीत सध्या तरी प्रियोळ मतदासंघाचे राजकीय वातावरण रंगतदार झाले असून कोण बाजी मारणार, यावर आताच तर्क-वितर्क काढायला सुरूवात झाली आहे एवढे मात्र निश्चित.

- मिलिंद म्हाडगुत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com