Assembly Elections: निवडणूक आयोगाने अखेर निवडणुका जाहीर केल्या असून प्रत्यक्ष निवडणुकीसाठी केवळ 36 दिवस शिल्लक आहेत. त्यासाठी भाजप अधिक सज्ज आहे, असे निदर्शनास येते. 21 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर पक्षीय पातळीवरची निवडणुकांची (Goa Assembly Elections 2022) तयारी लक्षात घेता केवळ सत्ताधारी भाजपचे (BJP) संघटनात्मक पातळीवरचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. हे काम संघटनमंत्री सतीश धोंड आणि केंद्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले आहे. हे दोघेही संघाच्या मुशीत तयार झालेले असल्याने कामाच्या पातळीवर ते अत्यंत बारकाईने काम करतात, हे त्यांनी भाजपच्या बांधलेल्या संघटनेवरून मान्य करावे लागेल.
पक्षीय निवडणुकांमध्ये कार्यकर्ता हा केंद्रबिंदू मानून अलीकडच्या वीस वर्षांमध्ये भाजपने अत्यंत कौशल्याने संघटनात्मक काम उभे केले आहे. महिला मोर्चाचे नेतृत्व डॉ. शीतल नाईक करत असल्या तरी त्यांना कुंदा चोडणकर आणि सुलक्षणा सावंत मदत करत आहेत. युवा मोर्चाचे काम समीर मांद्रेकर अखिल पर्रीकर अत्यंत चोखपणे पार पाडत आहेत. याशिवाय कला आणि संस्कृती मोर्चा, माजी सैनिक सेल, डॉक्टर सेल, ओबीसी मोर्चा अशा विविध पातळ्यांवर भाजपने संघटनात्मक काम सुरू केले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मतदारसंघ गट मंडळ, भाजपने सर्वच मतदारसंघांमध्ये गट मंडळाची स्थापना केली असून त्या ठिकाणी किमान 10 आणि कमाल 25 कार्यकर्ते कार्यरत आहेत. त्यामुळे गोव्यात इतर पक्षांच्या दृष्टिकोनातून भाजपकडे सध्या तरी कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा आहे, हे नमूद करावे लागेल. याशिवाय भाजपने शक्ती केंद्र प्रमुख, उपप्रमुख, साहाय्यक कार्यकर्ते, बुथ प्रमुख, उपप्रमुख आणि साहाय्यक कार्यकर्ते व मतदारसंघ प्रमुख यांची ही फळी उभी केली आहे. हे भाजपच्या दृष्टीने निवडणुका लढवण्यासाठीची अत्यंत जमेची बाजू आहे.निवडणूकपूर्व वेगवेगळ्या प्रकारच्या झालेल्या सर्वेक्षणानुसार गोव्यात भाजप सत्तेच्या जवळ जाईल.
उमेदवारांची पळवापळव
राज्यात भाजपने जिंकून येणाऱ्या उमेदवारांची पळवापळवी केली. मोदी (Narendra Modi), शहांनी (Amit Shah) जिंकणाऱ्यांकडे लक्ष देण्याचा सल्ला दिल्याने भाजपने गोवा फाॅरवर्ड, मगो, कॉंग्रेसह आजीमाजी आमदार, नेत्यांना उचलले. त्यामुळे भाजपचे यश निकट येऊनही पक्षात मात्र असंतोष पसरला आहे.केडरमध्ये असलेला हा असंतोष पक्षासाठी धोकादायक आहे, असे निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांचे मत बनले आहे. त्यामुळे भाजपला सावध पावले उचलावी लागणार आहेत.
बंडखोरीची शक्यता
भाजपमध्ये निवडून येण्याच्या क्षमतेला प्राधान्य दिल्यानेच भाजपच्या मूळ केडरमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. पर्वरी, मये, साळगाव, शिवोली, वास्को, कुठ्ठाळी, पेडणे या मतदारसंघातील कार्यकर्ते दुखावले असून भाजपसोबत राहण्यास ते अनुत्सुक आहेत. याशिवाय सांगे, पर्ये, शिवोली, कळंगुट, सावर्डे, काणकोण या मतदारसंघात भाजपांतर्गत बंडखोरीचा संभव असून उमेदवारीसाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे बंडखोरीचा दणकाही भाजपाला बसू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.