काँग्रेसमधील गळती; खरी कुजबूज..!

अखेर पक्षाने उमेदवारी जाहीर करुनही कुडतरीतील रेजिनाल्डने काँग्रेसला हात दाखवलाच.
Goa Assembly 2022 Khari Kujbuj

Goa Assembly 2022 Khari Kujbuj

Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Assembly 2022

अशी होती पर्रीकरांची ताकद

मनोहर पर्रीकरांची जयंती हल्लीच साजरी झाली. त्यानिमित्ताने काही कार्यक्रम जरूर झाले असतील. परंतु पक्षाच्या नेत्यांना मात्र त्यांची दरदिवशी वेगवेगळ्या कारणाने आठवण येत असते. परवा एकजण म्हणाला, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर सध्या पक्षाचे काही नेते वारंवार जात असतात. मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत बैठका सुरू असतात, तेव्हाही ते डोकावायला कमी करीत नाहीत. पर्रीकरांची सत्ता होती, त्यावेळी असे काही करण्याची कुणाची बिशाद नसायची. एक उदाहरण असे आहे, की एक नेता वारंवार मुख्यमंत्री बंगल्यावर घुटमळायचा. त्याचा पर्रीकरांनी सर्वांसमोर पाणउतारा केला होता. अत्यंत महत्त्वाचे काम असेल तर मला बोलवा, मी पक्षाच्या कार्यालयात येईन. परंतु तुम्ही मुख्यमंत्री बंगल्यावर घुटमळू नये, असा आदेशच त्यांनी दिला होता. पर्रीकरांची ताकदच होती तशी. त्यामुळे पक्षाचा नेताही त्यांना गृहीत धरू शकत नव्हता. ∙∙∙

कार्लुस आणि रेजिनाल्ड!

पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात असेपर्यंत कोणा भाजपा आमदाराने राजीनामा देऊ नये, असे नेत्यांना वाटत होते आणि त्याप्रमाणे घडलेही. परंतु पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना मात्र कार्लुस आल्मेदा यांनी राजीनामा दिलेला पहावा लागला. परंतु त्यांना एकमेव समाधान लाभले असेल, ते म्हणजे कॉंग्रेसचा पाया रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या रूपाने खचला. कार्लुस आल्मेदा आतातरी काँग्रेस किंवा तृणमूल या पक्षांमध्ये जाऊ पाहत असले, तरी भाजपने तेथे ठरवून त्यांचा काटा काढला आहे. ते आजारी आहेत आणि त्यांना चालताही धड येत नाही, त्यामुळे मतदार त्यांना जवळ करणार नाहीत, असा भाजपचा कयास आहे. परंतु मनाने पेटलेला नेता आजारी असतानाही लोकांना जागवू शकतो आणि भल्याभल्यांना धोबीपछाड देऊ शकतो. राजकारणात कित्येक पावसाळे पाहिलेल्या नड्डा यांना ही गोष्ट माहीत नाही असे नाही. ∙∙∙

श्रीपाद नाईक यांचे चालेना!

श्रीपाद नाईक यांनी आपला पुत्र सिद्धेश याला कुंभारजुवेमधून भाजपचे तिकीट मिळावे, यासाठी केलेल्या साऱ्या प्रयत्नांवर पाणी पडले आहे. सूत्रांच्या मते, हे तिकीट पांडुरंग मडकईकर यांना दिले नाही, तर त्यांचा भाऊ किंवा पत्नीला मिळू शकते. भाजपने केलेल्या सर्वेक्षणात पांडुरंग मडकईकर यांची लोकप्रियता या मतदारसंघात अजूनही शाबीत आहे, असे आढळून आले. त्यामुळे श्रीपाद नाईक यांनी कितीही खुंटा हलवला तरीही तो बळकट होण्याची शक्यता सुतराम नाही. गेल्या महिन्यात जे. पी. नड्डा गोव्यात आले, त्यावेळी श्रीपाद नाईक त्यांना भेटण्यासाठी अक्षरशः रांगेत उभे राहिले होते. त्यावेळी नड्डा यांनी ‘आपण दिल्लीला भेटू शकतो की हो’ असे सांगून वेळ मारून नेली होती. ∙∙∙

विश्वजित यांचे बॉक्सिंग

सिनिअर राणे यांनी पुन्हा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर पुत्र विश्वजित यांचे पित्त खवळले आणि त्यांनी वडिलांविरुद्ध केलेली मल्लिनाथी गोव्यातील भल्याभल्यांना आवडली नाही. वास्तविक पिता-पुत्रांमध्ये तसा काही घोळ नाही. परंतु विश्वजित यांचेच एक चुकले - ते म्हणजे वडील आता निवृत्त होणार आणि आपल्या सौभाग्यवतींना आपण पर्येमध्ये उभे करू, असा ढोल ते पीटत राहिले. वास्तविक वडिलांनी कधीतरी निवृत्तीची भाषा जरूर केली होती. परंतु माणूस वडील असो किंवा आणखी कुणी निवडणुकीतून निवृत्ती घेण्याचा सल्ला त्याला कधी आवडत नाही. वडिलांपेक्षा खूपच कमी पावसाळे पाहिलेल्या विश्वजितना हे कसे कळणार? त्यात आततायीपणा करण्यात विश्वजित यांचा हात कुणी धरू शकणार नाहीत. ही घटना घडल्यानंतर विश्वजितने आपल्या दोनापावला येथील घरात जाऊन खूप बॉक्सिंग केली, असे सांगितले जाते. या घरात त्यांचा जीम ट्रेनर त्यांना बॉक्सिंगचे प्रशिक्षण देतो. जेव्हा राग अनावर होतो, तेव्हा विश्वजित बॉक्सिंगचे ग्लोव्हज घालून तेथे आपली सारी ताकद पणाला लावतात. विश्वजितच्या कालच्या या प्रतिक्रियेमुळे भाजपातील अनेकांना धक्का बसला. ∙∙∙

<div class="paragraphs"><p>Goa Assembly 2022 Khari Kujbuj </p></div>
Goa Elections: मतदारसंघातील बूथवर जास्त लक्ष केंद्रित करा...

भाजपामध्ये आनंदाचे वारे

गोव्यात तृणमूल कॉंग्रेसने (TMC) सुरू केलेल्या कारवायांमुळे सर्वात अधिक कोण खूश असेल तर ते आहेत भाजपाचे नेते. भाजपाचे संघटन प्रमुख बी. एल. संतोष मागच्यावेळी गोव्यात आले, तेव्हा त्यांची राज्य भाजपा (BJP) निवडणूक समितीबरोबर बैठक झाली होती. त्यावेळीच त्यांनी आपल्या भाषणात तृणमूलला धन्यवाद दिले होते. ‘आता मनामध्ये खात्री बाळगा भारतीय जनता पक्ष संपूर्णपणे स्वतःच्या ताकदीवर सत्तेवर येणार आहे.’ तुम्ही तुमचे काम सुरू ठेवा पुन्हा सत्तेवर येण्यासाठी तयार रहा, असा कानमंत्र त्यांनी या बैठकीत दिला होता. भाजपने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात पक्ष एकवीसहून अधिक जागा मिळवून सत्तेवर येणार आहे, असा कौल त्यांना मिळाला आहे. त्यात तृणमूलचे वादळ आणि कॉंग्रेसची झालेली पडझड यामुळे तर भाजपला अधिकच गुदगुल्या झाल्या तर नवल ते काय? ∙∙∙

लोबोंचा डाव सफल

मायकल लोबो (Michael Lobo) यांनी आता आपली योजना पूर्णपणे रहित केल्याचे वृत्त हाती आले आहे. परंतु त्यासाठी त्यांना पक्षश्रेष्ठींनी आश्वस्त केले असल्याची माहिती मिळते. लोबो यांना त्यांची पत्नी दिलायला यांना शिवोलीमध्ये अपक्ष उभे राहण्यास पक्षश्रेष्ठींनी मान्यता दिली आहे. यापूर्वीही अशी व्यवस्था व्हावी, म्हणून लोबो दिल्लीला पक्षश्रेष्ठींना भेटले होते. परंतु त्यावेळी ती नामंजूर करण्यात आली. त्याच्या परिणामी लोबो कॉंग्रेसला जायला निघाले होते. परंतु भाजपने रोहन खंवटे आणि जयेश साळगावकर यांना फोडून त्यांचा डाव परतवून लावला. असे घडले तरी भाजपा हा एक सूत्रबद्ध पक्ष आहे आणि तो नियोजनानेच साऱ्या गोष्टींची आखणी करतो. त्याचाच भाग म्हणून लोबोंच्या पत्नीला अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी मंजुरी दिली आहे. लोबो जिंकून येतीलच. परंतु दिलायला जिंकून आल्या तर त्या पक्षासाठी आणखी भर ठरतील, असे हे राजकीय गणित आहे. ∙∙∙

चर्चिल-रेजिनाल्ड दोस्ती

रेजिनाल्ड यांच्या तृणमूल प्रवेशामुळे २००७ मधील चर्चिल-रेजिनाल्ड दोस्तीला नवी झळाळी मिळाली आहे. त्यावेळी ते सेव्ह गोवा पार्टीच्या उमेदवारीवर विधानसभेत पोचले होते. काही काळाने त्यांनी काँग्रेस प्रवेश केला होता. उभयतांचे नंतर बिनसले व रेजिनाल्ड तेथेच राहिले तर चर्चिल राष्ट्रवादीत व आता तृणमूलमध्ये पोचले आहेत. हो ना करत करत रेजिनाल्डनेही त्या पक्षाची कास धरली असून त्यांना कुडतरीत तिकीट दिले जाईल, असे सांगितले जाते. एका तपानंतर का असेना चर्चिल आणि रेजिनाल्ड एकत्र आले हेही नसे थोडके. ∙∙∙

त्रिमूर्तींची अस्वस्थता

गोवा मुक्ती दिनानिमित पेडणे, डिचोली व धारबांदोडा येथे ज्या मान्यवरांहस्ते ध्वजारोहण झाले, त्यांनी ते कोणत्या मनस्थितीत केले असेल असा प्रश्न कोणालाही पडणे स्वाभाविक आहे. कारण येत्या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष त्यांना उमेदवारी देणार नाही, असे वृत्त आहे. खरेच आपणाला ती मिळणार नाही का? असेच तर ते स्वतः ला त्या वेळी प्रश्न करत असतील का? ∙∙∙

आधी आरमांद, नंतर रेजिनाल्ड !

तीन महिन्यांपूर्वी आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स आम आदमी पक्षात जाऊ पाहत होते, त्यावेळी त्यांना रोखून धरण्यास महत्वाची भूमिका साकार केली होती. ती त्यांचे मित्र आरमांद गोंसालवीस यांनी. ते रेजिनाल्ड यांचे जवळचे मित्र होते. हे आरमांद बाब पूर्वी मनोहर पर्रीकर यांचे मोठे समर्थक होते. नंतर त्यांचे भाजपशी फाटले आणि ते कडवे काँग्रेस समर्थक झाले. गिरीश वगैरेना तेच सल्ला द्यायचे. मात्र महिनाभरापूर्वी हेच आरमांद स्वतःच तृणमूलवासी झाले आणि त्यानंतर आता रेजिनाल्ड. तृणमूलमध्ये वातावरण कसे आहे, हे पाहण्यासाठी रेजिनाल्ड यांनीच त्यांना तिथे पाठविले तर नसणार? गिरीशना विचारावे लागेल. कारण हे आरमांद गिरीशच्या थिंक टँक मधील एक सदस्य होते ना! ∙∙∙

काँग्रेसमधील गळती

अखेर पक्षाने उमेदवारी जाहीर करुनही कुडतरीतील रेजिनाल्डने काँग्रेसला हात दाखवलाच. त्यांच्या जाण्याचा पक्षावर काहीच परिणाम होणार नसल्याचे काँग्रेसनेते जरी सांगत असले तरी त्यांच्या जाण्याने सर्वसामान्य कार्यकर्त्याचे मनोबल ढासळले हे मान्य तर करावे लागेलच, पण त्यांच्याबरोबर आणखी कोणी, त्या वाटेवर तर नाही ना? अशी शंका घेतली जाऊ लागली आहे. मागे एकदा बाबूशने काँग्रेसची उमेदवारी नाकारून युगोडेपाचा आमदार बनून तर विश्वजितने तशीच उमेदवारी नाकारून अपक्ष म्हणून निवडून येऊन दाखवले होते, तर दुसऱ्या वेळी आमदारकी सोडून भाजपचे आमदार झाले आणि मंत्रिपद पटकावले होते. काँग्रेसची अशी गळती चालूच आहे. ∙∙∙

म्हणे भाजपला शिंगावर घेण्यासाठी!

आपल्या मतदारसंघातील सर्व मतदारांना आणि काँग्रेस नेत्यांना गाफील ठेवून कुडतरीचे माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे तृणमुलच्या गोटात शिरल्यावर त्यांच्या मतदारसंघात तीव्र पडसाद उमटणे साहजिकच. त्यामुळे आता रेजिनाल्ड आपल्या निर्णयाची सावरासावर करू लागले आहेत. भाजपला शिंगावर घेण्याची ताकद फक्त तृणमुल पक्षाकडे असल्याने आपण त्या पक्षात सामील झाल्याचा दावा केला आहे. मात्र आता कुडतरीत लोक त्यांना प्रश्न करू लागले आहेत. जो माणूस आपल्या वाढदिवसाला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना प्रमुख पाहुणा म्हणून बोलवितो तो भाजपला शिंगावर घेण्याची भाषा बोलतो, हे जरा अतीच झाले ना! ∙∙∙

हा तर योगायोग

पर्वरीचे माजी अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आठवडाही उलटला नाही तोच त्याच्याविरुद्ध भाजपच्या एका नेत्याने दाखल केलेली तक्रारीसंदर्भातचा गुन्हा उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला आहे. त्यामुळे अशी काय जादू घडली असा प्रश्‍न लोकांना पडला होता पर्वरी पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर मध्यरात्री त्यांना पोलिसांनी उठवून पोलिस स्थानकात आणले होते. त्यामुळे भाजपने त्यांची केलेली सतावणूक व त्याविरुद्ध त्यांनी केलेले आरोप हे या निकालानंतर सर्व काही संपले अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र प्रकरण वेगळेच आहे. खंवटे यांनी या तक्रारीविरुद्ध तसेच आरोपपत्राला काही महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ही आव्हान याचिका न्यायालयात अंतिम सुनावणीसाठी प्रलंबित होती. काही दिवसांपूर्वीच त्यावर सुनावणी झाली होती व त्यावरील निवाडा आज न्यायालयाने दिला. ∙∙∙

<div class="paragraphs"><p>Goa Assembly 2022 Khari Kujbuj </p></div>
वास्कोचे माजी भाजप आमदार कार्लुस आल्मेदा यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

तृणमूलच्या घोषवाक्यांमुळे ‘गोंधळ’

करायला गेलो एक आणि झाले भलतेच असे म्हणण्याची पाळी कधी कधी येते. गोव्यात सध्या धडाका लावलेल्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे ‘दोन फुलांचो काळ’ हे घोष वाक्य कोंकणी माणसांना गोंधळात टाकत असल्याचे लोक म्हणतात. कोंकणीत ‘काळ’ हा शब्द चांगली वेळ या अर्थाने घेत नाहीत, तर ‘काळ’ म्हणजे वाईट वेळ, देवचार, म्हारु, वाईट प्रसंग, दुष्काळ या अर्थाने घेतात दोन फुलांची वाईट वेळ असा त्या घोषवाक्याचा अर्थ होतो. एका साबण कंपनीने जाहिरात केली होती, एक मळका कपडा, साबणाच्या पावडरच्या बादलीत घालून नंतर पुन्हा स्वछ पाण्यात टाकला तर साफ पांढरा शुभ्र होतो, अशी ती जाहिरात. मात्र पाकिस्तानात या जाहिरातीचा वेगळाच अर्थ लावला कारण उर्दूमध्ये उजव्यापासून डाव्याकडे वाचले जाते, त्यांना वाटले शुभ्र कपडा त्या साबणाच्या पाण्यात टाकला, तर मळका होतो, तशी गत तृणमूलच्या दोन फुलांचो काळ या घोष वाक्याची झाली, तर ‘करायला गेलो गणपती आणि झाला मारुती’ असे म्हणण्याची पाळी येणार का? ∙∙∙

हा तर योगायोग

पर्वरीचे माजी अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आठवडाही उलटला नाही तोच त्याच्याविरुद्ध भाजपच्या एका नेत्याने दाखल केलेली तक्रारीसंदर्भातचा गुन्हा उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला आहे. त्यामुळे अशी काय जादू घडली असा प्रश्‍न लोकांना पडला होता पर्वरी पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर मध्यरात्री त्यांना पोलिसांनी उठवून पोलिस स्थानकात आणले होते. त्यामुळे भाजपने त्यांची केलेली सतावणूक व त्याविरुद्ध त्यांनी केलेले आरोप हे या निकालानंतर सर्व काही संपले अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र प्रकरण वेगळेच आहे. खंवटे यांनी या तक्रारीविरुद्ध तसेच आरोपपत्राला काही महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ही आव्हान याचिका न्यायालयात अंतिम सुनावणीसाठी प्रलंबित होती. काही दिवसांपूर्वीच त्यावर सुनावणी झाली होती व त्यावरील निवाडा आज न्यायालयाने दिला. ∙∙∙

लवू कुठे जाणार?

फोंड्याचे माजी आमदार लवू मामलेदार तृणमूलवासी झाले, पण मगोची तृणमूलशी युती झाल्याने ते काय करणार? कुठे जाणार? याबाबत मतदारांत चर्चा सुरू झाली आहे. तेही ‘थांबा आणि पहा’ असे म्हणतात. म्हणजे ते नेमके कुठे जाणार, भाजप, कॉंग्रेस की आपमध्ये? रवी पात्रांव भाजपात गेल्याने तेथे संधी नाही, मगोचे दरवाजे बंद आहेत. रवींचा पराभव करणारे महानायकाचे भवितव्य अंधकारमय आहे की उज्ज्वल आहे. याबाबत ते कुठे जाणार यावर अवलंबून आहे. ∙∙∙

लाख मोलाचा प्रश्न

गोवा मुक्तीचे हीरक महोत्सवी वर्ष हे राज्याच्या दृष्टीने लाखमोलाचा विषय आहे. कारण गेल्या ६० वर्षात राज्याने राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अनेक चढ-उतार पाहिले. अनेक राजकारणी बदलले, अनेकांनी पक्षांतर केले. त्यामुळे विकासाला खिळ बसली. गोवा मुक्ती नंतर राज्यस्तर ते पंचायत स्तरावरील राजकारण आणि आताच्या राजकारण्यामध्ये जमीन असमानाचा फरक असल्याची चर्चा हीरक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने सुरू झाली आहे. यंदा हीरक महोत्सवी वर्ष धूमधडाक्यात साजरे करण्यासाठी सरकारने सढळ हस्ते प्रत्येक पंचायतीला तीन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. लाख मोलाच्या निधीचा विनियोग करण्यासाठी सध्या पंचायत मंडळांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. चढाओढीच्या मंथनातून विष बाहेर पडते, की अमृत ते या हीरक महोत्सवी‌ वर्षात पहावे लागणार आहे. कारण थोड्या महिन्यांनी विधानसभा व त्यानंतर पंचायत निवडणुकीचा बार उडणार आहे. ∙∙∙

घोषणाबाजीला मुक्ती द्या!

गोवा मुक्तिदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यात सर्वत्र जल्लोषात मशाल मिरवणुकीद्वारे हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पित केली जाते. पण सांगेत मात्र विचित्र परिस्थिती निर्माण होत आहे. मशाल मिरवणूक काढतानाही भारतीय जनता पार्टीचा विजय असो, सुभाष भाई तुम आगे बडो, हम तुमारे साथ है। अशा घोषणा देऊन हे काय साध्य केले? याबाबत ग्रामस्थांत चर्चा रंगली. कारण राज्यात अनेक प्रश्‍न, समस्या असूनही फक्त घोषणाबाजी, आरोप-प्रत्यारोप काहीही होणार नाही. अशा प्रवृत्तीला मुक्ती द्यायला हवी आणि विकासासाठी कार्य करायला हवे, अशीही मतदारांची अपेक्षा आहे, त्यात गैर काही नाही. ∙∙∙

आपची सभा आणि बसेस

आपने पणजीत पहिलीच जाहीर सभा घेत गाजवली. केजरीवाल यांनी तर विविध राजकीय पक्षांना शिंगावर घेत टीकास्त्र सोडले. सत्ताधारी भाजपाची चक्क धुलाई केली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रिमंडळात घेतलेल्या एकेक हिऱ्यांची कार्यकर्तृत्व महान असल्याचे म्हणत भाजप मंत्रिमंडळातील मंत्री वासनाकांड, नोकरभरतीत भ्रष्ट्राचार, खंडणी वसुली, लहान मुलांवर अत्याचार करणारे असल्याचे सांगितले. या सभेसाठी आपने मोठी गर्दी केली असली तरी संभाव्य उमेदवारांना बसेसचे टार्गेट देण्यात आले होते. यात सर्वांत दूरवरून म्हणजे सत्तरीतून ३५ बसेस आणल्याचे विश्‍वजित कृ. राणे यांनी सांगितल्याची सभेच्या ठिकाणी चर्चा होती. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com