साखळी: गरिबांना प्रति महिना 6 हजार रुपये तर सामान्य जनतेसाठी 80 रुपयांत पेट्रोल देण्याचे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज साखळी येथील जाहीर सभेत दिले. शेती, पर्यटन, वीज, पाणी, खाण, पर्यावरण यासारख्या विविध प्रश्नांची काँग्रेसची भूमिका मांडणाऱ्या रोड मॅप गोवा व्हिजन 2035 असा जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. भाजप सरकारने सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार माजवला. हुकूमशाही सत्तेला हटवून पुन्हा एकदा गोव्यात काँग्रेसचे सरकार बनवा असे आवाहन राहुल यांनी मतदारांना केले. (Rahul Gandhi Goa News)
उमेदवार धर्मेश सगलानी यांच्या प्रचारार्थ राहुल गांधीची सभा साखळी येथे पार पडली. यावेळी काँग्रेस (Congress) निरिक्षक दिनेश गुंडुराव, पी.चिदंबरम, अलका लांबा, माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, दिगंबर कामत, खा.फ्रान्सिस सार्दिन, प्रताप गावस, प्रदेश कॉग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर आदींची उपस्थिती होती. राहुल गांधी म्हणाले, सरकार चालविण्याच्या पद्धतीत भाजप व काँग्रेसमध्ये जमिन-आसमानचा फरक आहे, तो जनतेने जाणून घ्यावा. जनमत कौलच्या वेळी काँग्रेसने गोव्यावर सरकारी निर्णय न लादता जनमत कौल देण्यास सांगितले. त्यातून गोवा स्वतंत्र राज्य बनले.
आता गोव्यात पर्यटन की प्रदुषण यापैकी एक निवडताना भाजपने (BJP) पर्यटनला तिलांजली देऊन प्रदुषण निवडले आहे. म्हणूनच भाजप गोवा कोळसा हब बनवू पाहत आहेत. काँग्रेस हे होऊ देणार नाही. गोव्यातील हजारो लोक, लहान व्यावसायिक, आपले पोट पर्यटन व्यवसायावर भरतात. त्यांना विश्वासात घेऊनच पर्यटन विकास योजना बनवू. काँग्रेस सरकार प्रत्येक निर्णय घेताना जनतेला विश्वासात घेते. जनतेला सरकारचे भागीदार बनवून भागीदारीने सरकार चालवून गोव्यातील हरवलेली सुखशांती पुन्हा मिळवून देऊ असे आश्वासनही राहुल गांधी यांनी कोळ दिले.
कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष
साखळीतील सभेसाठी राहुल गांधीचे (Rahul Gandhi) सायंकाळी 5 वाजता आगमन झाल्यावर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. कोविड मार्गदर्शक तत्वाचे पालन करून एक हजार लोकांना सभेसाठी सोडण्यात आले. अनेकांनी बाहेर थांबूनच भाषण ऐकले. राहुल गांधीच्या सभेमुळे कार्यकर्त्यांचा हुरुप वाढला.
मुख्यमंत्री सावंत यांनी भ्रष्टाचार करून गोवा संपविला व लुटला. जनतेला केवळ आश्वासनेच दिली. बेकारी, महागाई वाढवली. जनतेने या मुख्यमंत्र्याला व भाजप सरकारला अद्दल घडवावी.
- फ्रान्सिस सार्दिन, खासदार
मुख्यमंत्री सावंत साखळीचाही विकास करू शकले नाहीत. साखळीच्या विकासाचे श्रेय प्रतापसिंह राणे यांचेच आहे. कोविडच्या चुकीचे व्यवस्थापनामुळे लोक मेले तरी मुख्यमंत्री म्हणतात भिवपाची गरज ना. मुख्यमंत्र्यांचा पराभव करुन साखळीच्या लोकांनी पुन्हा इतिहास घडवावा.
- दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते
भाजपने गोव्यात नोकऱ्या विकल्या, खाण व्यवसाय सुरू न केल्याने बेकारी वाढली. काँग्रेसने नवीन स्वच्छ चरित्र्याचे नवीन व युवा उमेदवार दिले आहेत. पक्षाने लोकहिताचा जाहिरनामा तयार केला आहे.
- गिरीश चोडणकर, प्रदेशाध्यक्ष
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.