गोवा: गोवेकर सध्याच्या भाजप सरकारला विटले आहेत. कारण हे काही मूठभर ‘पुंजीपतीं’चे सरकार असल्याची जाणीव लोकांना झाली आहे. गोवेकरांना आपले स्वतःचे सरकार यावे असे वाटते आणि असे सरकार केवळ काँग्रेस पक्ष देऊ शकतो, हेसुद्धा जनतेला समजले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर गोव्यात ‘गोंयकरांचे सरकार स्थापन होणार ही काळ्या दगडावरील रेघ आहे, असा ठाम विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी ‘गोमन्तक’ला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त केला.
यावेळी काँग्रेस सत्तेवर येईल याची खात्री तुम्ही कशाच्या बळावर देत आहात?
कारण गोव्यातील 80 टक्के जनता भाजप सरकारच्या कारभाराला विटली आहे. भाजपचे ‘अच्छे दिन’ हे फक्त कागदावरच दिसतात याची त्यांना पूर्ण खात्री पटली आहे. काँग्रेस सरकार असताना राज्यात सुबत्ता होती. मात्र भाजपने सामान्य गोवेकरांना देशोधडीला लावले. याची प्रचंड खदखद लोकांच्या मनात आहे. सोमवार दि. 14 फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानातून लोक आपल्या या भावना व्यक्त करणार याची मला खात्री आहे. आम्हाला यावेळी 22 ते 25 जागा मिळतील अशी अपेक्षा आहे.
का वाटते तुम्हाला की लोक काँग्रेसलाच मते देणार?
कारण लोकांना जे काय पाहिजे तेच काँग्रेस पक्ष करीत आला आहे. गोवेकरांनी ‘सेझ’ला विरोध केला, आम्ही तो रद्द केला. प्रादेशिक आराखड्याला विरोध केला, आम्ही तोही रद्द केला. आम्ही आंदोलकांचा आवाज चिरडण्याचा प्रयत्न केला नाही, उलट त्यांच्याशी संवाद साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. आताही आम्ही लोकांना पाहिजे तेच करत आहोत. आम्ही आमचा जाहीरनामा तयार करताना लोकांना भेटून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.
लोकांना थ्री लिनियर प्रकल्प नको आहेत. या प्रकल्पाविरोधात ठाम भूमिका फक्त काँग्रेसने घेतली आहे. लोकांनी आम्हाला पक्ष बदलूंना उमेदवारी देऊ नका, नव्या दमाचे उमेदवार द्या अशी मागणी केली. आम्ही गद्दारांना जवळ न करता 80 टक्के नवीन आणि तरुण उमेदवार दिले. भाजपला जवळ असलेल्या रवी नाईक, आलेक्स रेजिनाल्ड यांना उमेदवारी देऊ नका अशी मागणी केली, आम्ही तीही मान्य केली. त्यामुळे आता मतदारांना खात्री पटली आहे, काँग्रेस बदलली आहे. त्याचा आम्हाला भरपूर फायदा होईल.
यावेळी तुमची काही वेगळी रणनीती होती का?
मुख्य म्हणजे आम्ही लोकांच्या अपेक्षांना खरे उतरण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सोशल मीडिया आणि सर्वसाधारण मीडिया यांचे चांगले व्यवस्थापन केले. आम्ही बूथ यंत्रणा सक्षम केली. याचाच फायदा आज आम्हाला होत आहे.
आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस तुमची मते खाणार असे वाटत नाही का?
मुळीच नाही. कारण हे दोन्ही पक्ष भाजपच्याच ‘बी’ आणि ‘सी’ टीम आहेत लोकांना कळून चुकले आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालील वाळू सरकू लागली आहे. आता भाजप आणि त्यांचे हे सहयोगी पक्ष खोटारडी स्टिंग ऑपरेशन्स करून काँग्रेसची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण जिंकू शकणार नाही हे कळून चुकल्यावर ते वैतागले आहेत याची ही लक्षणे आहेत. आम्ही गोवेकारांना वचन दिले आहे, ‘गोंयचो फुडार गोयकारांच्या हातात’ आणि जनतेने आम्हाला वचन दिले आहे, ‘नव्या वर्सा नवे सरकार’. या दोन्ही गोष्टी निश्चितच होणार आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.