Goa Election: अँटी-इन्कंबंसीचा धाक; युतीला चाप!

भाजपाच्या अकार्यक्षम व भ्रष्ट कारभारामुळे बारा ते चौदा टक्के विस्थापन दिसते. बारा हिंदुबहुल मतदारसंघात ख्रिस्ती उमेदवार दिल्यास भाजपा मतदार मगोपकडे वळतील. त्यातच चाळीस तिकिटासाठी भाजपाचे दावेदार पंचावन्न!
goa cm pramod sawant and mgp leader sudin dhavalikar
goa cm pramod sawant and mgp leader sudin dhavalikarDainik Gomantak
Published on
Updated on

येत्या निवडणुकीत (Goa Elections) भाजपाशी (BJP) कसलाही संबंध असणार नाही असे मगोप (MGP) अध्यक्ष दीपक ढवळीकर (Deepak Dhavalikar) यांनी स्पष्ट केले. "एकला चलो रे" हा नारा घेऊन सध्या तयारी चालू आहे; गैरभाजपा पक्षांशी बोलणी पण चालली आहेत. ढवळीकर असेही म्हणाले की बारा मतदारसंघांत काम जोमाने चाललेय व अजून सहा ते आठ ठिकाणी उमेदवार निवड चालू आहे; पांच डिसेंबरपर्यंत वीस जाग्यांवर उमेदवार निश्चित होतील.

भाजपा हायकमांडचा नंगानाच प्रजा पाहत आहे. गावागावांतून फीडबॅक मिळत आहे की प्रादेशिक पक्षाची गोव्याला अत्यंत गरज आहे. भाजपाबरोबर जाण्यास कोणाचीही संमती नाही; कार्यकर्त्यांची नाही, केंद्रीय समितीची नाही व मतदारांचीही नाही. त्यामुळे भाजपाबरोबर युतीचा प्रश्नच उद्भवत नाही. भाजपाने मगोला संपवण्याचे कित्येक प्रयत्न केले; आतासुद्धा उमेदवार व कार्यकर्ते फोडण्याचे प्रयत्न होताहेत. भाजपाने जनाधार लाथाडला; नंतर घोडेबाजार मांडला. जनता त्यांना कंटाळली आहे व त्यामुळे राजधर्म मानणाऱ्या लोकांसाठी मगोप हा एकमेव पर्याय राहिला आहे. युतीचा निर्णय घेण्यापूर्वी गोव्यासाठी, प्रजेसाठी व पक्षासाठी काय चांगले हे बघावे लागते. निवडणूकपूर्व सहकार्याविषयी बिगरभाजपा पक्षांशी बोलणी चालू आहेत. भाजपा सोडून इतर कुठल्याही पक्षाशी सहकार्य करण्यास मगोप तयार आहे; परंतु मगोच्या अटींवर. कुठल्याही परिस्थितीत मगोपने तय केलेल्या बारा जाग्यांवर तडजोड केली जाणार नाही. आचार संहिता लागू झाल्यानंतरच बोलणी फलदायी होतील.

goa cm pramod sawant and mgp leader sudin dhavalikar
'गोमंतकीयांच्या स्वाभिमानासाठी, ‘आरजी’चा पुढाकार'

भाजपशी कसा संबंध ठेवणार? ज्यांनी आम्हाला वापरले, डच्चू दिले त्यांच्या जवळ परत जाण्याचा मूर्खपणा कोण करेल? असा सवाल करणाऱ्या ढवळीकराना भाजपाच्या नेत्यांना मगोप-भाजपा युतीची खात्री असल्याची वक्तव्ये ते करतात, असे सांगण्यात आले. यावर ढवळीकर म्हणाले की, ते मगोपच्या मतदारांची व उमेदवारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. रणनीतीतला हा एक डावपेच आहे. कैकवेळा ते हेच करत आले आहेत. प्रत्येक मतदारसंघात मगोपचे तीन-साडेतीन हजार निष्ठावान मतदार आहेत. स्वबळावर एकवीस आमदार निवडून आणायची भाषा आमचे कार्यकर्ते करत आहेत. केंद्रीय समिती त्यांच्या आकांक्षाना अव्हेरू शकत नाही. गोव्याची भरभराट होण्यासाठी भाजपा सोडून इतर पक्षांनी मगोप बरोबर यावे; महागठबंधनाचे नेतृत्व करण्यास मगोप सक्षम आहे, असेही ढवळीकर सांगतात. अध्यक्षांच्या या मुलाखतीने मगोपचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला आहे याची जाणीव होते.

आगामी निवडणुकीत हिंदू मतांचे भाजपाकडून मगोप असे मोठ्या प्रमाणात विस्थापन होईल. मगोपचा आत्मविश्वास या वस्तुस्थितीतून उपजला आहे. अँटी-इन्कंबंसी भाजपाविरुद्ध; जितके भाजपाचे नुकसान तितका मगोपचा फायदा. जितके जास्त उमेदवार तितकी जास्त मतें व तितकाच मोठा मगोपचा मतांचा वाटा. 18-20 टक्के मतांचा वाटा व 9-10 आमदार हे त्यांचे लक्ष आहे. एरवी युती व्हायची तेव्हा भाजपा 25 तर मगोप 10 जाग्यांवर लढायचे. अशा असमतोल युतीत मोठा पक्ष अजून मोठा तर छोटा पक्ष अजून छोटा होत जातो. महाराष्ट्रात शिवसेनेने हा समतोल ढळल्याबरोबर भाजपाला सोडचिट्ठी दिली. शिवाय या वेळेस पतन भाजपाचे; कारण ते दीर्घकाळ सत्तेत आहेत. भ्रमनिरास झालेले मतदार सत्तेत नसलेल्या मगोपला पसंती देण्याची शक्यता अधिक.

"मगोशी युतीसाठी एका पायावर राजी आहे" असे फडणवीस म्हणाले. ढवळीकरांचे उत्तर की "मतांच्या वाट्यांत वृद्धी" हे मगोपचे ध्येय असल्याने "युती शक्यच नाही". भाजपा विरोधी वातावरण असतानाच हे ध्येय साध्य होऊ शकते. कालांतराने हवा भाजपाची होईल तेव्हा भाजपा मगोपची मते खाईल; त्यासाठी मतांचा प्रोविडेंट फंड मगोपने आताच संकलित केला पाहिजे. नपेक्षा सिंह निशाणी सुद्धा जाऊ शकते. भाजपाने केलेल्या दोन मगोप सदस्यांच्या फितुरीचा मित्रद्रोह ताजा आहे; लाचारपणाची युती केल्यास विस्थापित मतें मगोप ऐवजी इतर पक्षांकडे वळतील. भाजपाच्या अकार्यक्षम व भ्रष्ट कारभारामुळे बारा ते चौदा टक्के विस्थापन दिसते. बारा हिंदुबहुल मतदारसंघात ख्रिस्ती उमेदवार दिल्यास भाजपा मतदार मगोपकडे वळतील. चाळीस तिकिटासाठी भाजपाचे दावेदार पंचावन्न. पार्सेकर, तवडकर, साळकर, कुंकळ्येकर लढले नाहीत तर त्यांची कारकीर्द संपेल. दोन कांदोळकर, सत्यविजय नाईक, विश्वजित कृष्णराव राणे यांनी भाजपा सोडली. अजून तब्बल सोळा नेते आचार संहिता जाहीर झाल्याबरोबर उड्या मारतील. परत परत त्याच नेत्यांना तिकीट दिल्यामुळे भाजपाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा गेले दशकभर भिजत पडल्यात; प्रस्थापितांना आपटल्याशिवाय आपला नंबर लागणार नाही ह्याची जाणीव त्यांना आहे.

goa cm pramod sawant and mgp leader sudin dhavalikar
‘तृणमूल’चे तांबडे गोव्यात फुटेल?

अशा परिस्थितीत युती झाली तर मगोपच्या वाट्याच्या जाग्यांवर भाजपाचे दावेदार नेते अपक्ष म्हणून लढतील व युतीचा फायदा मगोला मिळणार नाही. महाराष्ट्रात भाजपाने शिवसेनेबरोबर युती केली; परंतु शिवसेनेच्या वाट्याच्या पांच मतदारसंघात चक्क अधिकृत उमेदवार घालून भाजपाने युती निवडणुकीआधीच तोडली होती. कित्येक मतदारसंघात भाजपा बंडखोर पक्षाच्या छुप्या समर्थनावर अपक्ष म्हणून लढले. खुद्द मगोशी अनेकदा दगाबाजी करणाऱ्या अशा मित्रद्रोही पक्षाबरोबर परत सलगी करणे खुळेपणा नव्हे कां?

-राजेंद्र काकोडकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com