‘मनोहर पर्रीकर तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है !!’ अशा घोषणा देत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तरुणाचा वयस्कर झाला. सतत एका ऊर्जेत राहून 25 वर्षे पणजीत भाजपचा झेंडा त्याने फडकवत ठेवला. कार्यकर्त्यांना ‘पणजीत पर्रीकर’ हे नावच कोरून ठेवायचे होते. पण मनोहरभाईंचा अस्त झाला आणि फासे पलटले. कार्यकर्त्यांना हवा होता तो उमेदवार मिळाला नाही, तरी कार्यकर्त्यांनी ती जखम सोसली. मतदानातून हिसका दाखवला. किल्ला कोसळला, घाव भरला नाहीच.
याला आता दोन वर्षांचा काळ गेलाय. मनोहरभाईंच्या आत्म्याला शांती मिळवून द्यायची असेल तर त्यांच्याच प्रतिबिंबाला, त्यांचे आदर्श, त्यांचे विचार आणि विकासाची आस असलेल्या खणखणीत नाण्याला रिंगणात उतरवणे गरजेचे आहे. कार्यकर्त्यांनी नेता निवडला आहे. भाईंचा वारस सर्वगुणसंपन्न आहे. 25 वर्षांच्या भाईंच्या पुण्याईवर पणजीकर सहसा पाणी सोडणार नाहीत, हा आत्मविश्वास हळूहळू रुजायला लागलाय. वणवा खदखदतो आहे. एका म्यानात दोन तलवारी राहूच शकत नाही, हे कार्यकर्त्यांना मनोमन पटलेय. दुकानात मांडलेली ‘वस्तू’ पाहून न भुलता ब्रँड जपणारे कार्यकर्ते एकत्र आले आहेत. आता अनब्रँडेड वस्तू दुकानदाराकडे साभार परत करायची तयारी कार्यकर्ते करत आहेत.
मागच्या वेळी ठेच लागल्याने आता शहाणे झालेले कार्यकर्ते निवडणुकीचा संघर्ष लढायला सज्ज झाले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या मुशीत घडलेले संघटन किती कडवे असते, याची प्रचीती द्यायची हीच उत्तम वेळ. शिक्षण कुठलेही असो, ते वाया जात नाही. राष्ट्र प्रथम हे प्राथमिक बाळकडू भारतीय जनता पार्टीकडूनच प्रत्येक शाळेत मिळते. भारतीय जनता पार्टी नवख्या उमेदवारांपासून 22 आमदारांपर्यंत पोहोचली ती केवळ संघटनात्मक कौशल्यामुळे. आता संघटनेच्या कसलेल्या फौजेने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. ‘मोडेन पण वाकणार नाही’चा बाणा कायम होताच. आता कार्यकर्त्यांनी वर्मावर घाव लागल्यागत धनुष्य पेलले आहे. याच कार्यकर्त्यांच्या धीरोदात्तपणामुळे यशाचा सुगंध पसरत गेलाय, कक्षा उंचावल्यात. डाव्या - उजव्यांचा भेदभाव न करता कार्याला सुरुवात झालीय. काम खडतर आहे; पण सोबतीला पित्याची पुण्याई आहे. मतदारसंघासाठी घेतलेले परिश्रम, दिल्या गेलेल्या नोकऱ्या हे सर्व मतदारांच्या ध्यानात आहे. बेईमानपणा पणजीकरांच्या रक्तात नाही. कार्यकर्त्यांची संख्या वाढायला लागलीय. सुशिक्षित उत्पल मनोहर पर्रीकरांची पकड पणजीवर बसायला लागलीय.
घरातच बालपणापासून पाहात आलेले राजकारण उत्पलना नवीन नव्हते. ते उत्तम शिष्य आहेत आणि गुरूही घरचाच होता. हातोड्याने बडवून भारतीय जनता पक्षाची तत्त्वे त्याला सांगण्याची आवश्यकता नाही. सोन्याचा लेप लावलेली आभूषणे अशांना घालावी लागतात जे बेगडी असतात. कल्पवृक्षाखाली बसल्यावर विद्या आपसूकच अवगत होते. सामान्यांचा रक्षणकर्ता, जनतेचे हित सांभाळणारा, अशी वडिलांची ख्यातीच होती. पण उत्पलला हे ठाऊक असूनही त्याच्या डोक्यात वारे कधीच गेले नाही, ही त्याची खासियत. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे त्याच्या स्वभावात नाही. वडिलांच्या नावाचा वापर करून तो आकाशात झेप घेऊ शकला असता; पण नाही! तो स्थिर राहिलाय. पक्षाचे बरेचसे निर्णय मान्य करून घेतलेत. अडचणींचा डोंगर पार करणे सोपे नाही; पण ते तो सातत्याने करत राहिलाय. अवहेलना, अपमान अती झालाय, असे कार्यकर्त्यांना वाटत होते. विखारी नसलेला साप फणा काढून फुसफुस करून दाखवायला लागला की त्याला त्याची नेमकी जागा दाखवायची गरज आहे, हे एव्हाना कार्यकर्त्यांनी ताडले आहे. हाताबाहेर गेलेल्या घटकांना जरब बसवायची तर कार्यकर्त्यांची ताकद ठामपणे उभी करून वारसा म्हणजे काय असते, हे दाखवायचे आहे.
उत्पलच्या वाढदिवसानिमित्ताने महालक्ष्मीसमोर नारळ ठेवून त्याच्या राजकीय कारकिर्दीचा शुभारंभ झाला. प्रखर निष्ठा असलेले कार्यकर्ते आता उत्पलची ज्योत होणार आहेत. कुणी टीचभर कापूस आणील, कुणी त्याची वात होईल. कुणी तेल होईल. सर्वांची साथ उत्पलला हवीय. तो उच्चशिक्षित आहे. 1998 पासून 2002 पर्यंत तो गोव्यात विद्यार्थी होता. अभियांत्रिकीचा पदवीधर होऊन उच्च शिक्षणासाठी परदेशात गेला. तेथे एम.एस.ची पदवी प्राप्त केली. अमेरिकेच्या मिशिगन या ख्यातकीर्त विद्यापीठाची ही पदवी. काही काळ तिथेच एका नामांकित कंपनीत नोकरी केली. मग गोव्याच्या ओढीने मायदेशी आला. आपला व्यवसाय थाटत उत्कृष्ट दर्जाची वैद्यकीय उपकरणे बनवून त्यांची निर्यात करून यश मिळवले. आपला व्यवसाय सांभाळताना वडिलांनी थाटलेला उद्योगही सांभाळला. सत्तरहून अधिक लोकांना पोटापाण्याला लावले. याच दरम्यान आपले विचारविश्व प्रगल्भ केले. गोव्याचा विकास, भवितव्य या विषयांवर विचारमंथन घडवून आणले. त्याची घोडदौड सुरूच आहे. सुशिक्षित, सुसंस्कृत उत्पल आता सक्रिय राजकारणात प्रवेश करतोय. पणजीची अधिष्ठात्री श्री महालक्ष्मीच्या प्रांगणात आज, गुरुवारी सकाळी 8.45 वाजता त्याला आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी शुभचिंतकांचा ओघ घेतला आहे. आपल्यालाही निमंत्रण! त्याचा प्रवास यशोगामी होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.