चर्चा गोव्यातील उत्पल पर्रीकरांच्या बॅनरची

फडणवीस-गडकरींमधील का रे दुरावा...?
Discussion of Utpal Manohar Parrikar 65 banner in Goa
Discussion of Utpal Manohar Parrikar 65 banner in Goa Dainik Gomantak

पणजी शहरापासून रायबंदरपर्यंत स्व. मनोहर पर्रीकर यांच्या छायाचित्रासह असलेले उत्पल यांचे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांचे दिवाळीच्या शुभेच्छा देणारे हे बॅनर निवडणुकीची तयारी तर नाही नव्हे ना.. असे बोलले जात आहे. उत्पल हे पणजीतून भाजपकडून लढण्यास सज्ज झाले आहेत. त्यांनी पणजीतील काही घरांना भेटीही सुरू केल्या आहेत. त्यामुळे ‘आता मागे हटायचे नाही’ या इराद्यानेच ते लोकांना भेटत आहेत. भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी आणि देंवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंगळवारी गुप्त बैठक झाल्यानंतर पत्रकारांनी उत्पलला गाठले अन्‌ बॅनरवर कमळाचे चित्र कसे, असे विचारले त्यावर उत्पलांनी केलेले स्मितहास्य बरेच काही सांगून गेले ∙∙∙

पर्रीकरांची प्रचंड उणीव...

मनोहर पर्रीकर यांची अनुपस्थिती गोव्यात भाजपा नेत्यांना निवडणुकीच्या काळात अधिकच तीव्रतेने भासू लागली आहे. याचे कारण एका बरोबरच पक्षात निर्माण झालेली अनेक संकटे आणि त्यावर मात करण्यात आलेले अपयश. पर्रीकर सुपूत्र उत्पलने जाहीर केलेला निवडणूक लढवण्याचा मनोदय, बाबूश मोन्सेरात यांचा बदललेला पवित्रा, दुसऱ्या बाजूला मायकल लोबो यांनीही बार्देशमधील 7 पैकी 6 जागांवर सांगितलेला अधिकार, मगो पक्षाबरोबरच्या युतीचे भिजत घोंगडे असे अनेक प्रश्न स्थानिक नेतृत्वाला पेचात पकडत आहेत. काही विद्यमान आमदारांना तिकीटे नाकारण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या परिस्थितीत भाजपामध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे आणि त्यावर मात करण्यासाठी सतिश धोंड-प्रमोद सावंत यांची संपूर्ण कसोटी लागलेली आहे. या कसोटीवर ते उतरले नाहीत, तर हाता-तोंडाशी आलेला घास निसटून जाईल, अशी भीती त्यांना आहे. विरोधकातील बेबनावामुळे सत्ताधारी भाजपा पुढच्या दोन महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळवू शकते, असा निष्कर्ष त्यांच्या अंतर्गत सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.

Discussion of Utpal Manohar Parrikar 65 banner in Goa
चर्चा गोवा राजकारणाची: कुंकळ्ळी रंगली ‘आप’च्या रंगात

विजय बरोबर सेटींग

फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई सध्या सत्ताधारी सदस्य खूष नाहीत, एवढे खूष झाले आहेत आणि आजची त्यांची नरकासुर स्पर्धा अधिकच जोमात होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांची रस्त्याच्या हॉटमिक्सची तब्बल 28 कोटींची कामे मंजूर करून टाकली आहेत. या मंजुरीला 24 तास उलटण्याच्या आत सरदेसाई यांनी नारळ फोडले आणि प्रत्यक्ष कामालाही सुरवात केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतर ठिकाणी कंत्राटदार वर्कऑर्डर मिळूनही काम सुरू करत नाही, तिथे फातोर्डात त्यांनी प्रत्यक्ष कामालाही सुरवात केली. विजय सरदेसाई मुख्यमंत्र्यांविरोधात प्रचंड हल्लाबोल करीत होते आणि त्यांची मुख्यमंत्र्यांना सावंतवाडीचा सावंत म्हणण्यापर्यंत मजल गेली होती. त्यांची एवढी सर्व कामे एका फटक्यात करण्यामागची गोम काय असावी, याची चर्चा सध्या भाजपातही सुरू झाली आहे. भाजपाच्या एका नेत्याने तर ही सेटींग असल्याचाही आरोप केला. परंतु मुख्यमंत्र्यांनी मात्र मी विकासकामे कुणाची अडवत नाही. विजयच काय, मी दिगंबर कामत आणि सुदिन ढवळीकर यांच्याही सर्व फायली क्लिअर केल्यात, असे त्यांनी जाहीर केले. तर विजय यांचा युक्तीवाद असा की ही कामे मी मंत्री असताना मंजूर करून घेतली होती, मुख्यमंत्र्यांकडूनच ती अडविली गेली!

फडणवीस-गडकरींमधील दुरावा

भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस गोव्यात प्रत्यक्ष उतरले त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही काही काळ राज्यात होते. परंतु तरी त्यांची भेट होऊ शकली नाही. गडकरी केवळ सरकारी कामासाठी राज्यात आले होते. त्यामुळे ते फडणवीसांना का भेटतील? असा भाजपाचा सवाल आहे. दुसऱ्या बाजूला फडणवीस केवळ राजकीय व्यूहरचना करण्यासाठी आले आहेत. ते निवडणुकीचा कार्यक्रम तयार करीत आहेत. त्यामुळे त्यांना गडकरींना भेटण्याचे प्रयोजनच नव्हते. त्यात गोवा निवडणुकीचा कार्यक्रम अमित शहांनी त्यांना आतून दिला आहे. त्यात एक मिनिटही वाया घालवण्याला ते तयार नाहीत. सूत्रांच्या मते, निवडणूक आयोग ५ किंवा ६ जानेवारीला निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतील आणि त्या दिवसापासूनच आचारसंहिता लागू होईल. गोव्यासह पाच राज्यांमध्ये १० फेब्रुवारीच्या दरम्यान मतदान होईल, असा कयास आहे. त्यामुळे ही सगळी राजकीय योजना वेगाने तयार होण्याची जबाबदारी फडणवीसांवर आली आहे. त्यातही महत्त्वाचे म्हणजे मनोहर पर्रीकरांची अनुपस्थिती तीव्रतेने जाणवत आहे आणि तिच्यावर मात करण्यासाठी अमित शहा आणि फडणवीस ही जोडगोळी गोव्यात जबरदस्त कार्यक्रम निश्चित करण्याच्या तयारीत आहेत. हे कारणही फडणवीस-गडकरी यांच्या न भेटण्यामागे असू शकते, असे भाजपाचे एका ज्येष्ठ नेत्याचे म्हणणे आहे.

Discussion of Utpal Manohar Parrikar 65 banner in Goa
CBIच्या कचाट्यात गोवण्याचा प्रयत्न झाला, पण पर्रीकर काँग्रेसला पुरुन उरले

मगोला घरघर?

विद्यमान राजकीय परिस्थितीत अन्य पक्षांच्या तुलनेत बार्देश तालुक्यात मगो पक्षाचे संघटनात्मक कार्य फारसे नाहीच, असे असतानाही काही मोजकेच कार्यकर्ते निष्ठेने पक्षाचे गोडवे गात आहेत. मगो पक्षाच्या विरोधात कुणीही काहीबाही बोलले तर त्यांचा स्वाभिमान जागृत होतो व ते विरोधकांवर अक्षरश: तुटून पडतात. परंतु, असे असले तरी या तालुक्यात या पक्षाला पाठींबा कसा मिळेल असा प्रश्‍न आहे. बार्देशमध्ये सात मतदारसंघ असले तरी त्यापैकी हणदोणे या एकमेव मतदारसंघात पक्षाच्या उमेदवारीसाठी महेश साटेलकर हे उमेदवार उत्सुक आहेत. अन्य सहा मतदारसंघात अद्याप कुणीही उमेदवारीसाठी उघडपणे दावाही केलेला नाही व त्यासंदर्भात त्यांच्या हालचालीही दिसून येत नाहीत. मगोची भाजपशी युती झाल्यास मगोला हळदोणेच्या जागेवरही पाणी सोडावे लागेल याची चाहूल लागल्याने साटेलकर हे उमेदवारीच्या हेतूने अन्य एखाद्या पक्षात प्रवेश करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही लोकांत बोलले जाते. ∙∙∙

दामूंचा पोटशूळ का उठला?

विजय सरदेसाई यांची 28 कोटींची कामे मंजूर होऊन फातोर्ड्यातील रस्ते चकाचक झाल्यावर तेथील कोणा नागरिकांना वाईट वाटेल? परंतु दामू नाईक यांचा मात्र गेले दोन दिवस जळफळाट होत असल्याची भाजपा गोटातूनच माहिती मिळते. नाईक यांनी भाजपाचे सर्व ज्येष्ठ नेते आणि सुकाणू समितीकडेही तक्रार करून आपल्याला संपविण्याची ही क्लृप्ती तर नव्हे, ना असा प्रश्न विचारला आहे. काल दामूंनी पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपला पोटशूळ त्यांच्याकडे व्यक्त केला. फडणवीस यांनाही हा सारा प्रकार माहिती असल्याने त्यांनी कशाचीही वाच्यता केली नाही. परंतु हा प्रश्न गेले दोन दिवस भाजपच्या वेगवेगळ्या व्यासपीठांवर चवीने चघळला जात आहे. एक ज्येष्ठ नेता तर म्हणाला, ‘फातोर्डामध्ये आधीच रस्ते चांगले होते. रस्त्यावर खळगेही नव्हते अशा परिस्थितीत पुन्हा तेथे हॉटमिक्स करणे म्हणजे तेथील आमदाराला राजाची वागणूक देण्यासारखी आहे.’ हे कशामुळे घडले याची चर्चा भाजपात चालते आणि काहीजण तर थेट दिल्लीपर्यंत बोट दाखवतात. यावर विजय यांचा दावा असा की, मी फातोर्डात मलनिस्सारणाची 700 कोटींची कामे केली. मला 28 कोटींसाठी कोणासमोर हात पसरावे का लागावे? ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com