गोवा: राज्यात सोमवारी झालेल्या एकाच टप्प्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये 40 जागांसाठी झालेल्या मतदानात एकूण 78.94 टक्के मतदान पार पडले. दरम्यान, काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करण्याचा विश्वास बोलून दाखवला.
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, साखळी मतदारसंघात (Sanqulim Cnstituency) सर्वाधिक म्हणजेच 89.61% मतदान झाले, तर सर्वात कमी मतदान बाणावलीमध्ये 70.2 % इतके झाले. देशातील सर्वात लहान राज्य असलेल्या गोव्यात केवळ दोन जिल्हे आहेत. उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा; उत्तर गोव्यात सर्वाधिक 79% , तर दक्षिण गोव्यात 78% मतदान झाले. (Dinesh Gundu Rao statment aginst Goa BJP on goa election 2022)
या आकड्यांद्वारे काँग्रेस पक्षाने राज्यातील राजकीय परिस्थिती आणि 10 मार्च रोजी जाहीर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे निकष मांडले या मुद्यावर राज्याचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत सांगीतले "निर्णायक मत देण्यासाठी लोक मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत आणि त्यांची अभिव्यक्ती निकालात दिसून येईल."
या भाजपशासित राज्यात "सत्ताविरोधी" लाट असल्याचे विश्लेषण करून, कॉंग्रेस नेते म्हणाले, "लोकांना भाजपला बाहेर काढायचे आहे; राज्यात प्रचंड सत्ताविरोधी लाट आहे आणि त्याचमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात मतदान झाले; ते पुढे म्हणाले, "मला वाटते की काँग्रेससाठी हा खूप चांगला निकाल असेल आणि आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल."
ते पुढे म्हणाले की, भाजपने मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांना उमेदवारी दिलेल्या साखळीमध्ये सर्वाधिक मतदान झाले, कारण लोकांचा त्यांच्याविरुद्ध तीव्र रोष दिसत आहे. "मुख्यमंत्र्यांच्या विरोधात प्रचंड संताप असल्याचे यावरून दिसून येते. या मतदारसंघात आम्ही मुख्यमंत्री हतबल होऊन घरोघरी जाताना पाहिले कारण त्यांना माहित होते की ते निवडणूक हरत आहेत. आणि ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. आमचा काँग्रेस उमेदवार या लढतीत बाजी मारेल," असा विश्वास दिनेश गुंडू राव यांनी बोलून दाखवला.
सावंत यांच्या विरोधात काँग्रेसने (Goa Congress) धर्मेश सगलानी यांना उमेदवारी दिली होती. उल्लेखनीय बाब म्हणजे, सावंत यांनी साखळी मतदारसंघातून दोनदा विजय मिळवला आहे. 2012 आणि 2017 मध्ये सावंत साखळी मतदारसंघातुन विजयी झाले होते. काँग्रेस पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP) सोबत आघाडी करून गोव्याची निवडणूक लढवत आहेत.
राव म्हणाले की, ही युती फलदायी ठरेल, परिणामी पूर्ण बहुमत मिळेल. "गोव्यातील जनतेला स्थिर सरकार हवे आहे आणि त्यांना स्पष्ट जनादेश द्यायचा आहे. काॅंग्रेसला राज्यातील 'आया राम, गया राम' राजकारण संपवायचे आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.