महिलांची मते मिळवण्यासाठी भाजपाच्या भुलभुलय्या

भजपाच्या जाहीरनाम्यात गोव्यातील महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत तसेच सहा महिन्यांत कायदेशीर खाणी सुरू करणार अशी आश्वासने दिली आहेत.
BJP
BJPDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: भजपाच्या जाहीरनाम्यात गोव्यातील महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत तसेच सहा महिन्यांत कायदेशीर खाणी सुरू करणार अशी आश्वासने दिली आहेत, त्याची खिल्ली उडवणारी चर्चा सध्या सुरू आहे. महिला म्हणतात, यापूर्वी भाजपा सरकारने गॅस सिलिंडरच्या किंमती एवढ्या वाढवल्या आहेत, की आम्ही हतबल झालो तेव्हा यांना महिलांची दया आली नाही आणि आता मते मिळवण्यासाठी प्रलोभने दाखवत आहेत.

दुसरीकडे, केंद्रात भाजपाचे भक्कम सरकार असताना गोव्यातील खाणी का सुरू झाल्या नाहीत, तेव्हा खाण अवलंबितांवर उपासमारीची पाळी आली असता भाजपाने फक्त आश्वासने देऊन झुलवत ठेवले आणि आता निवडणूक आली तशी सहा महिन्यांत खाणी सुरू करणार असे सांगून दिशाभूल करत आहेत. यापूर्वी अनेक आश्वासनांना भाजपाने हरताळ फासला आहे अशी खोचक टीका होत आहे.

BJP
यावेळी शिवोलीत कॉंग्रेसच बाजी मारणार: दिलायला लोबो

फातोर्ड्यातील घडामोडी

निवडणुकीची तारीख दारात येऊन ठेपली तरी विविध भागांत विविध स्तरावरील मंडळींचे पक्षबदल चालूच आहेत. मडगावला टेकून असलेल्या फातोर्डा मतदारसंघात हे प्रमाण जरा जास्तच आहे. काहीजण घुस्मटमारीमुळे तर काही मानपानाचा मुद्दा घेऊन पक्ष बदलताना दिसत आहेत, पण प्रत्यक्षात ही अदलाबदल का होते ते फातर्डेकारांना चांगलेच माहीत आहे. गतवेळीही अशाच प्रकारे मतदान तारखेपर्यंत कार्यकर्ते आयात केले गेले, पण काहीच साध्य झाले नव्हते. खरे म्हणजे त्यावरून शहाणे होण्याची गरज होती, पण म्हणतात ना जित्याची खोड.

कळकळ गोव्याच्या विकासाची

मतदानाला आता अवघे दोनच दिवस उरलेले असताना भाजप, काँग्रेस ते तृणमूल व आता शेजारच्या महाराष्ट्रातील शिवसेनेसह सगळेच पक्ष गोव्याच्या चौफेर प्रगतीची भली मोठी आश्वासने गोमंतकीय मतदारांच्या तोंडावर फेकू लागले आहेत. खरे तर मुक्तीनंतर गोव्याने सर्व क्षेत्रात जी चौफेर प्रगती केली आहे, ती पाहिली तर सेना वा तृणमूलने गोमंतकीयांना विकास वा प्रगतीचे आमिष दाखवणे हास्यास्पद आहे. तसे गोवेकर त्यांच्या भूलथापांना बळी पडणे कठीणच आहे. कारण हे लोक केवळ मतविभाजनासाठी आलेले आहेत याची त्यांना कल्पना आहे.

BJP
स्वाभिमानी मयेकर भाजपला चांगलाच धडा शिकवतील: संतोषकुमार सावंत

एक नंबर जाहीरात

गोवा निवडणुकीत प्रत्येक पक्षाच्या विविध जाहिराती प्रसिध्द झाल्या, सर्वांच्याच जाहिराती मतदारांना आकर्षित करणाऱ्या आहेत. काहींनी आपल्या वैयक्तीक जाहिराती देखील प्रसिध्द केल्या. मात्र, वैयक्तीक जाहिरातीत वाळपईचे आमदार आणि आरोग्यमंत्री विश्‍वजीत प्रतापसिंह राणे यांची जाहीरात अव्वल ठरते. कारण त्यांच्या जाहिरातीत वृध्द, महिला, तसेच युवांचा देखील समावेश आहे. एकंदरीत जाहीरात एक नंबरची आहे. आता राज्यातील निवडणूक सर्वाधिक मते घेऊन हा एक नंबरचे मताधिक्य जर त्यांना प्राप्त झाले, तर त्यात नवल करण्याचा प्रश्‍नच उद्भवणार नाही.

प्रचारासह गोवा दर्शन

राज्यात निवडणूक प्रचारार्थ राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची पलटणच गोव्यात आली आहे. गोवा हे पर्यटन स्थळ असल्याने हे बहुतेक कार्यकर्ते प्रचाराच्या नावाने समुद्रकिनाऱ्यांचा आश्‍वाद घेत आहेत. काहीजण तर आपल्या कुटुंबियासमवेत आले आहेत. प्रचार करण्याऐवजी हे कार्यकर्ते गोवा देवदर्शन करण्यात गुंतले आहेत. ज्या ठिकाणी सभा किंवा घरोघरी नेत्याचा प्रचार असेल तेथील प्रसिद्ध असलेली मंदिरे तसेच समुद्रकिनाऱ्यांना भेटी देऊन मौजमजा करत आहेत. बहुतेक हे कार्यकर्ते शेजातील राज्यातून आलेले आहेत.

महाराष्ट्र व कर्नाटकमधील पक्षाचे ज्येष्ठ नेते किंवा मंत्री व आमदारांचा कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आपला दबदबा दाखवण्याचा प्रयत्न असतो. गोव्यात मात्र या उलट आहे. गोव्याचे नेते इतर राज्यात गेल्यास त्यांच्यासोबत एक दोनच कार्यकर्ते वा नेते असतात. ही तर निवडणूक प्रचाराच्या नावाखाली गोव्यात या कार्यकर्त्यांची ‘पिकनिक’च झाली आहे.

BJP
ओल्ड गोव्यातील वादग्रस्त बंगला पाडण्याचे आदेश

...आणि खेडेकर स्टेजवर!

मागच्या निवडणुकीत ढवळीकरांचे समर्थक असलेले लक्ष्मीकांत खेडेकर गेली पाच वर्षे गोविंद गावडेचे कट्टर समर्थक म्हणून वावरत होते. परंतु सहा महिन्यांपूर्वी खेडेकर गोविंद गावडेंच्या विरोधात जावून प्रियोळ पंचायतीचे सरपंच बनले व दोघांमधील घनमैत्री संपली. प्रचारसभा सुरू झाल्या, तरी खेडेकर कुठल्याच व्यासपीठावर चढत नव्हते, त्यामुळे ते गावडेंना घाबरले अशी चर्चा होती. शेवटी ते बुधवारी माशेल येथील सभेत ढवळीकर यांच्या व्यासपीठावर चढले व गोविंद गावडेंवर जोरदार टीका केली.

सभेसाठी सोबत आलेल्या खेडेकर यांच्या समर्थकांच्या मते, गोविंद गावडेंनी खेडेकर यांच्यावर दबाव ठेवण्यासाठी खेडेकर चेअरमन असलेल्या सहकारी पथसंस्थेची निवडणूक प्रक्रिया याच दिवसात चालू केली. खेडेकर यांचे पॅनल बुधवारी दुपारी बिनविरोध निवडून आले व संध्याकाळी ते ढवळीकरांच्या स्टेजवर चढले. या उलट, गोविंद समर्थक त्यांना आता गद्दार म्हणून हिणवत आहेत, पण आता काय फायदा, ‘जब चिडीया चुग गई खेत’.

हेलिपॅड लगेच तयार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी म्हापशात विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ सभा झाली. ते हॅलिकॉप्टरने येणार म्हणून त्यासाठी तात्काळ हेलिपॅड बनवले गेले. ते हेलिकॉप्टरने आले नाहीत. मात्र, यावर या सभेतच प्रतिक्रिया उमटल्या की म्हापशावरून जे रस्ते जातात त्याची पावसाळ्यात खड्डे पडून एवढी दैना झाली होती की खड्डे मृत्यूचे सापळे बनले होते व या सापळ्यात पडून बरेचजण जायबंदी झाले. काहीजणांना जीव गमवावा लागला तरी सरकारला जाग आली नव्हती आणि आता मात्र हेलिपॅड लगेच तयार कसे झाले यावर सध्या चर्चा रंगली आहे.

उदेश गेला कुणीकडे!

अति शहाणा त्याचा बैल रिकामा ही म्हण आपण ऐकली असणारच. कुंकळ्ळी नगरपालिकेचे युवा नगरसेवक उदेश देसाई जे युरी आलेमाव यांना आपले मेंटर मानत होते व युरीमुळेच आपण नगरसेवक बनलो म्हणून गर्वाने सांगत होते ते सध्या कुंकळ्ळीतून गायब झाले आहेत. युरीच्या प्रचारात उदेश दिसत नाहीत. युरीने देमानी प्रभागात घरोघरी फिरून उदेशसाठी मते मागितली होती. मात्र, जेव्हा युरीला युवा नगरसेवकाची गरज होती, तेव्हा हे शिष्य गायब. उदेश कुठे आहे पत्ता नाही उदेशने पक्ष बदलल्यामुळे ते युरीचा हात सोडून फातोर्ड्यात नारळाचा प्रचार करण्यात गुंग झाल्याची चर्चा आहे. उदेश बाब फ्रेंड इन नीड फ्रेंड इंडिड म्हणतात ते खरे.

सावर्डेची समरगाथा

जात्यावर बसले की तोंडी ओव्या म्हणे आपोआप येतात. निवडणुकीच्या व्यासपीठाचेही तसेच. निवडणुकीच्या प्रचार सभेत समोर माईक दिसला की कुणाला बोलायचे कसे भरते येते ते कळणे कठीण. आता उदाहरण घ्यायचे असल्यास मोलेचे पंच समर कदम यांचे घेता येईल. दोन दिवसांपूर्वी ते दीपक पाऊसकर यांच्या व्यासपीठावर चढले आणि चक्क लोक मावळत्या सूर्याला नमस्कार करत नाहीत असे बोलले.

एव्हढ्यावरच ते थांबले नाहीत. त्यांनी मावळता सूर्य म्हणजे दीपक पाऊसकर असे विधानही केले. पुढे ते बरेच काही असे बोलले की ते पाऊसकर यांची स्तुती करतात की अन्य काही असा कुणालाही प्रश्न पडावा. त्यामुळे पाऊसकर बंधूंची स्थिती समर्थन नको पण भाषण थांबवा असे म्हणण्यासारखी झाली असावी हे नक्की!∙∙∙

छोटे मियाँ, बडे मियाँ

शिवसेना खासदार व गोवा प्रभारी संजय राऊत तसेच महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे यांचे महाराष्ट्रात युतीचे सरकार आहे. हे दोन्ही नेते गोव्यात आपापल्या पक्षाच्या प्रचारार्थ गोव्यात आहेत. आज ते एकमेकांसमोर आले असता त्यांनी ‘फोटोपोज’ दिली आहे. या फोटोमध्ये संजय राऊत यांनी पटोळे यांच्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला असे त्यात दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यामध्ये हे दोघे दिग्गज नेते ‘छोटे मियाँ व बडे मियाँ’सारखे वाटत आहेत. खासदार संजय राऊत हे गोव्यातील त्यांच्या पक्षाच्या प्रचारार्थ वारंवार येत होते. मात्र, नाना पटोळे हे गोव्यात काही दिवसांपूर्वी आले आहेत ते अजूनही आहेत. प्रचाराची रणधुमाळी उद्या संपुष्टात आल्यानंतर हे सर्व नेते परतीच्या वाटेला लागणार आहेत. ∙∙∙

पर्यावरणवाद्यांची हाक

नेहमीप्रमाणे यावेळीही गोव्यातील पर्यावरणवाद्यांनी एकत्र येऊन गोवा वाचवू शकणार असल्याचा विश्वास असणाऱ्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. गोवा एन्वायरमेंट ॲण्ड इकोलॉजी टीम नावाने ही मंडळी एकत्र आलेली असून त्यांनी विद्यमान सर्व आमदारांना घरी पाठवून गोव्याची तळमळ असलेल्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे आवाहन केले आहे, पण सर्वच नवे चेहरे गोव्याप्रती प्रामाणिक असतीलच का याचे उत्तर मात्र ते देऊ शकले नाहीत.

गुंतवणुकदारांच्या आशा

सत्तेवर आल्यास म्हापसा अर्बन बँकेचे पुनरुज्जीवन करू असे पिल्लू आपच्या राज्यप्रमुखांनी सोडले आहे ते कितपत शक्य आहे हा मुद्दा बाजूला ठेवला तरी त्यांच्या या निवेदनाने केवळ म्हापसा अर्बनच नव्हे, तर त्या बँकेमागोमाग लिक्विडेशनमध्ये निघालेल्या दि मडगाव अर्बन को - ऑपरेटिव्ह बँकेतील भागधारक व गुंतवणूकदारांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. मात्र, अजून कोणा राजकीय पक्षाने वा उमेदवाराने त्याबाबत आश्वासन दिलेले नाही. म्हापसा अर्बनचे जर पुनरुज्जीवन होऊ शकते, तर मडगाव अर्बनचे का नाही असे सवालही ही मंडळी आता करू लागली आहे.

BJP
ओल्ड गोव्यातील वादग्रस्त बंगला पाडण्याचे आदेश

‘कपाटात’ दडलंय काय?

भाजपाला गोव्यात सत्ता स्थापनेचे वेध लागलेले असले, तरी एक दोन वगळता सर्वच मतदारसंघाचा आढावा घेतल्यास भाजपात बंडाळी आहे. जुन्या व नव्या कार्यकर्त्यांत एकमत नाही. त्याचा फायदा ना काँग्रेसला ना मगोला. काही ठिकाणी अपक्ष बाजी मारू शकतो अशी चर्चा आहे. मांद्रे मतदारसंघात लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा अंदाज तसाच आहे. मांद्रेत इतिहास घडणार आहे. 2017 साली मुख्यमंत्रिपदी असताना पराभूत झाले होते, तो इतिहास व 2022 मध्ये अपक्ष निवडून आल्यास इतिहास घडणार की योगायोग ठरणार.

भाजपने तत्त्वे व विचारसरणीच नष्ट केल्याने पक्षात दृष्ट व क्षुद्र विचारांचे लोक पक्ष कवेत घेऊन आहेत, परंतु त्याचा कसलाही परिणाम ज्येष्ठ नेत्यांना होणार नाही अशीही चर्चा आहे. दुसरीकडे ज्येष्ठ नेते पक्ष सोडून गेले त्याचाही परिणाम होणार नाही, असे भाजपचे नेते सांगत आहेत. त्याचा पार्सेकर यांनी खरपूस समाचार घेतला. सध्या पार्सेकर यांच्या ‘कपाटात’ किती गंडगज ‘मत’रूपी मतदार आहेत त्यांची चावी 10 मार्चला उघडेल हे नक्की. तूर्तास पार्सेकर सुसाटपणे भाजपला अद्दल घडवल्याच्या थाटात असल्याचीही चर्चा होत आहे.

‘जय जय महाराष्ट्र’

मांद्रे मतदारसंघात ‘जय जय महाराष्ट्र’ गीत मोठ्याने ऐकू येऊ लागले व दर निवडणुकीत हेच गीत का? अशी प्रतिक्रिया भाजप व अपक्ष समर्थकांची आहे. मगोची युती तृणमूल पक्षाशी असल्याने गीतांचे प्रेमी संतप्त होत आहेत. ‘जय, जय महाराष्ट्र’ या गीतांचा हक्क मगोने गमावला असून त्या स्फूर्तीगीताला मगोच्या ढवळीकर यांनी बंगालच्या गोठ्यात बांधले आहे.

भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मगोने गोमंतकीय लोकांचा घात केला या वक्त्यावर ज्येष्ठ नागरिकांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. मांद्रे मतदारसंघात मगो ‘बॅक फूट’वर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अपक्ष पार्सेकर यांनी प्रथम क्रमांक म्हटल्याने मगो - भाजपप्रेमी चिंतेने ग्रासले आहेत. पाहूया १० मार्चचा सोनियाचा दिनू काय सांगतो ते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com