फोंडा तालुक्‍यात भाजपचे वर्चस्‍व

शिरोडा, फोंडा, प्रियोळ केले काबीज: मडकईत मात्र ‘सिंहा’चीच डरकाळी
BJP in Ponda
BJP in Ponda Dainik Gomantak

फोंडा: राज्यातील विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी अनपेक्षित तर काही ठिकाणी धक्कादायक निकालही लागले असले तरी भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारत अखेर सत्तास्थापनेवर दावा ठोकला आहे.

फोंडा तालुक्यातील फोंड्यात भाजपचे रवी नाईक, मडकईत मगोचे सुदिन ढवळीकर, शिरोड्यात भाजपचे सुभाष शिरोडकर तर प्रियोळात भाजपचे गोविंद गावडे यांनी बाजी मारली. विशेष म्हणजे फोंड्यात कधी नव्हे ते यावेळी रवी नाईक यांच्यामुळे ‘कमळ’ फुलले.

BJP in Ponda
गोवा विधिमंडळ गटनेतेपदी डॉ.प्रमोद सावंत

प्रियोळात चालली गावडेंची जादू

प्रियोळ मतदारसंघात खरी लढत ही भाजपचे गोविंद गावडे व मगोचे दीपक ढवळीक यांच्यातच झाली. शेवटपर्यंत अटीतटीच्या ठरलेल्या या निवडणुकीत शेवटी गावडे यांनी बाजी मारली. वास्तविक या मतदारसंघात मूळ भाजपचे पण तिकीट नाकारल्याने अपक्ष उमेदवारी दाखल केलेले संदीप निगळ्ये यांना तिसऱ्या स्थानावर रहावे लागले.

‘आरजी’चा बोलबाला

नव्यानेच राजकारणात आलेल्‍या रेव्होल्युशनरी गोवन्सचा (आरजी) यावेळी फोंडा तालुक्यात बऱ्यापैकी बोलबाला झाला. सर्वच मतदारसंघांत आरजीवाल्यांनी पंधरा ते वीस टक्के मतांची टक्केवारी मिळवली. सांतआंद्रे मतदारसंघात आरजीचा उमेदवार निवडून आल्याने प्रथमच या पक्षाने विधानसभेत पाय ठेवला. विशेष म्हणजे युवा मतदारांचा जबरदस्त पाठिंबा आरजीवाल्यांना मिळाला. आताची आरजीवाल्यांची घोडदौड पाहिली तर भविष्यात या पक्षाला चांगले दिवस येतील हे नक्की.

BJP in Ponda
लोबो दाम्पत्य जिंकूनही सत्तेपासून राहणार दूरच

फोंड्यात प्रथमच फुलले ‘कमळ’

फोंडा मतदारसंघात यावेळी काँटे की टक्कर झाली. मूळ काँग्रेसचे आमदार मात्र त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करून रवी नाईक यांनी आपली ‘पॉवर'' खऱ्या अर्थाने दाखवून दिली. या मतदारसंघात भाजपचे रवी नाईक, काँग्रेसचे राजेश वेरेकर तर मगोचे डॉ. केतन भाटीकर यांच्यात सरळ लढत झाली. सुरूवातीपासून काँग्रेसचे राजेश वेरेकर यांचा बोलबाला होता, पण शांत राहून रवींनी आपल्या परीने ही निवडणूक हाताळताना ‘हम भी कुछ कम नही’चा प्रत्यय आणून दिला. मतमोजणीवेळी प्रारंभी मगोचे केतन भाटीकर आणि काँग्रेसचे राजेश वेरेकर यांच्यातच लढत रंगली होती. मात्र नंतर रवी नाईक यांनी जोरदार मुसंडी मारत विजयश्री खेचून आणली.

ढवळीकरांचे वर्चस्‍व

मडकई मतदारसंघात मगो पक्षाचे उमेदवार तथा माजी उपमुख्यमंत्री व आमदार सुदिन ढवळीकर यांचे वर्चस्व शेवटपर्यंत कायम राहिले. अपेक्षेप्रमाणे विजयश्री खेचून आणली. मडकई मतदारसंघात भाजपचे सुदेश भिंगी दुसऱ्या क्रमांकावर तर रेव्होल्युशनरी गोवन्सचे प्रेमानंद गावडे तिसऱ्या स्थानावर राहिले.

शिरोड्यात सुभाष शिरोडकरांची किमया

शिरोडा मतदारसंघात यावेळीही सुभाष शिरोडकर यांनी भाजपचे आसन घट्ट केले. २०१७च्या निवडणुकीत काँग्रेस तिकिटावर व नंतर पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून येण्याची किमया सुभाष शिरोडकर यांनी साधली. मात्र या विधानसभा निवडणुकीवेळी शिरोडकर यांना मोठ्या दिव्यांना सामोरे जावे लागेल असाच बोलबाला होता. पण धुरंदर राजकारणी असलेले सुभाष शिरोडकर यांनी यावेळीही बाजी मारत त्यांचे जवळचे निकटवर्तीय असलेले आम आदमी पक्षाचे महादेव नाईक यांच्यावर मात केली. या मतदारसंघात रेव्होल्युशनरी गोवन्सने तिसऱ्या स्थानावर येण्याची किमया साधली. काँग्रेसचे तुकाराम बोरकर यांचा तेवढा प्रभाव पडला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com