गेल्या विधानसभा निवडणुकीत नगण्य ठरलेल्या आम आदमी पक्षाने (आप) यावेळी बराच जोर धरला असून त्यामुळे काही मतदारसंघातील समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 2017 साली आपचे उमेदवार रिंगणात होते. पण त्यावेळी त्यांना अगदीच कमी मते प्राप्त झाली होती. 40 पैकी 39 मतदारसंघात आप पक्षाच्या उमेदवारांना आपली अनामत रक्कम सुध्दा वाचविणे शक्य झाले नव्हते. बाणावली मतदारसंघात मात्र आपच्या रॉयला फर्नांडिस यांनी 4182 मते प्राप्त करून आमदार चर्चिल आलेमाव यांना बऱ्यापैकी लढत दिली होती. त्यावेळी सासष्टींत काँग्रेसनेच बाजी मारली होती. (‘AAP’ will change equations for goa assembly election)
आठ मतदारसंघापैकी वेळ्ळी, मडगाव, नावेली, कुठ्ठाळी, कुडतरी, कुंकळ्ळी व नुवे या सहा मतदारसंघात काँग्रेसने विजय प्राप्त केला होता. पण यावेळी आपचा प्रभाव वाढायला लागला असून अनेक मतदारसंघात त्यांनी आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसायला लागली आहेत.
बाणावलीत आपचे व्हिएगस यांनी चर्चिलापुढे (Charchil Alemao) जबरदस्त आव्हान निर्माण केले असून प्रचारात आघाडी घेतली आहे. यामुळे चर्चिलवर ही आपली शेवटची निवडणूक असून आपल्याला एक संधी द्यावी असे भावनिक आवाहन करण्याची वेळ आली आहे. नावेलीत आपच्या प्रतिमा कुतिन्हो यांनी मतदारसंघ पिंजून काढला असून त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसच्या (Goa Congress) हातून निसटतो की काय असे वाटायला लागले आहे. वेळ्ळी, नुवें, कुडतरी येथेही आपचा प्रभाव वाढताना दिसत आहे. सासष्टीत यावेळी आप चमत्कार करेल असेच वातावरण दिसते आहे. फातोर्ड्यात आपचे संदेश तळेकर हे घरोघरी फिरताना दिसत आहेत. त्यामानाने मडगावात मात्र त्यांचा विशेष संचार दिसत नाही. दक्षिण गोव्यातील इतर मतदारसंघातही आपने वातावरण निर्मिती केली असून त्याचा फटका प्रामुख्याने काँग्रेसला बसू शकतो. केपे मतदारसंघात आपचे राऊल परेरा हे प्रभावी उमेदवार आहेत.
बहुतेक मतदारसंघात कॉग्रेस व आप आमनेसामने असून त्याचा फायदा भाजपला (Goa BJP) मिळतो की काय हे ही बघावे लागेल. डिचोलीत मात्र आपने अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रकात शेट्ये यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांचे पारडे जड झाल्यासारखे वाटते. या मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीबद्दल अजूनही अनिश्चितता असल्यामुळे आपच्या पाठिंब्याचा भाजप फायदा घेऊ शकेल असे सध्या तरी दिसत नाही. पणजीत वाल्मिकी नाईक हे गेल्या खेपेप्रमाणेच मतांचे विभाजन करतात का स्वतःचे अस्तित्व दाखवतात. यावरही अनेकांचे डोळे लागले आहेत. तेथे बाबुश मोन्सेरात व पर्रीकर पुत्र उत्पल पर्रीकर यांच्या लढ्यात वाल्मिकी कोठे बसतात? म्हापश्यात काँग्रेस व भाजपमध्ये लढाई होणार हे निश्चित असले तरी आपचे राहुल म्हांबरे हे या लढतीचा तिसरा कोन ठरतात का मतांचे विभाजन करतात याचे अवलोकन करावे लागेल. फोंड्यातही हीच परिस्थिती असून आपचा उमेदवार कुठवर उडी घेतो यावरही लोकांचे लक्ष आहे. इतरही मतदारसंघातही आप हा कॉग्रेसला नुकसान करतो का स्वतःचे अस्तित्व प्रस्थापित करतो हे बघावे लागेल. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका सर्वेक्षणाप्रमाणे यावेळी आप सहा ते सात जागा मिळवू शकेल असा अंदाज आहे. अर्थात हे सर्वेक्षण किती खरे होते हे सांगता येणे कठीण. पण सासष्टींत मात्र सध्या आपचाच प्रभाव दिसत असून तिथे आप दोन वा तीन जागा मिळवू शकेल असे दिसते आहे. येथे भाजपचे विशेष अस्तित्व नसल्यामुळे लढत आप व काँग्रेस मध्ये होईल अशी चिन्हे दिसायला लागली आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घरोघर फिरून लोकांना आपला मत देण्याचे आवाहन केल्यामुळे त्याचा काय परिणाम होतो हे ही पाहावे लागेल. भाजप सोडून आपमध्ये आलेल्या माजी आमदार एलिना साल्ढाणा या सध्या कुठ्ठाळी मतदारसंघात घरोघर फिरत असून त्या भाजपला व खास करून माविन गुदीन्होंना कसे तोंड देतात त्यावरही अनेकांच्या नजरा केंद्रीत झाल्या आहेत. या मतदारसंघातला भाजपचा उमेदवार हा माविन गुदीन्हो प्रणित असेल. त्यामुळे लढत ही एलिना साल्ढाणा व अप्रत्यक्षपणे माविन गुदिन्हो यांच्यात होणार आहे. मागच्या वेळी सुध्दा काही कॉग्रेसच्या उमेदवारांना आपमुळे निकटचा
पराभव स्वीकारावा लागला होता. यंदाही याची पुनरावृत्ती होऊ शकते.
सध्या लढत ही काँग्रेस व भाजपमध्ये नसून आपचा त्या मतदारसंघात किती प्रभाव आहे हे आप किती मते घेऊ शकणार आहे यावरही आहे. त्यामुळे सध्या अनेक मतदारसंघातील समीकरणे बदलायला लागली आहेत. याचा फायदा खरोखर भाजपला होतो की काय हे बघावे लागेल. पण राजकीय विश्लेषकांच्या मताप्रमाणे आप हा प्रामुख्याने काँग्रेसच्या मतपेढीलाच ‘डॅमेज’ करू शकतो. आता खरेच आप काँग्रेसला डॅमेज करतो की भाजपला फायदेशीर ठरतो की काय याची उत्तरे येणाऱ्या काळात मिळतील.
मिलिंद म्हाडगुत
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.