
क्रीडा आणि सामाजिक क्लबपैकी एक म्हणून ओळखला जाणारा गोव्यातील सर्वात जुना क्लब, ‘टेनिस दे गास्पर डायस’ 100 वर्षांचा झाला आहे. मिरामार किनाऱ्यावर, १९२० च्या दशकात, बांबूच्या चटया घालून हा क्लब सुरू झाला होता. पणजीतील हा प्रतिष्ठित क्लब केवळ एक क्रीडासंकुल नसून सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणूनही ओळखला जातो.
अनेक मान्यवर व्यक्तींना या क्लबने आपले सदस्य बनवून आपला गौरवशाली वारसा तयार केला आहे. पोर्तुगीज राजवटीपासून ते गोव्याचे भारतात विलीनीकरण होईपर्यंतच्या प्रवासाचा साक्षीदार असलेल्या या क्लबने एक सुवर्णयुग अनुभवले आहे. 100 वर्षांचा हा ऐतिहासिक टप्पा उत्साहात साजरा करण्यासाठी क्लब आता २,४०० हून अधिक सदस्यांना एकत्र आणण्याच्या तयारीत आहे.
क्लबच्या १००व्या वर्धापनदिनानिमित्त वर्षभर विविध आकर्षक आणि संस्मरणीय कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरले आहे. ‘वेस्ट टू वेल्थ’ यासारख्या विषयांवर जनजागृती सत्रे आणि विविध स्पर्धा शिक्षण संचालनालय व गोवा सायन्स सेंटरच्या सहकार्याने घेतल्या जातील. कुटुंबांसाठी पारंपरिक खेळ आणि मनोरंजनाची खास मेजवानी ठेवण्यात आली असून त्यात मिरामार समुद्रकिनार्यावर मुलांसाठी रंगतदार पतंगोत्सव तर पालकांसाठी वाळूचा किल्ला बनवणे यासारख्या स्पर्धा पर्यटन विभागाच्या सहकार्याने आयोजित केल्या जाणार आहेत. छायाचित्रण स्पर्धा, पणजीच्या गल्ल्यांमधील खजिना शोध मोहीम आणि मुलांसाठी विशेष ‘चिल्ड्रन्स डे, ख्रिसमस डान्स’ असे अनोखे उपक्रमही या सोहळ्याचा भाग असतील.
वर्षभर चालणाऱ्या शताब्दी महोत्सवात दर महिन्याला सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण कार्यक्रम हाती घेतले जातील. यात गोवा तसेच राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांच्या माहितीपूर्ण व्याख्यानांचा समावेश असेल. १०० व्या वर्षानिमित्त क्लबमध्ये आठवडाभर विविध मनोरंजक उपक्रमांची रेलचेल असेल. हाऊसी (तंबोला), व्हिस्ट ड्राइव्ह (पत्त्यांचा खेळ), महिलांसाठी खास संध्याकाळ आणि कराओके नाईट्स यांसारखे कार्यक्रमपारंपरेला उजाळा देत उत्साहात साजरे केले जातील. ख्रिसमस आणि दिवाळीच्या विशेष कार्यक्रमांमध्ये लाईव्ह संगीत, रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा आणि दिवे रंगवण्याचे कार्यक्रम असतील.
क्लबच्या शतकपूर्तीस्तव तिसवाडी तालुक्यातील कोणालाही त्यांचा १०० वा वाढदिवस किंवा शंभर वर्षांचा कोणताही विशेष सोहळा साजरा करायचा असल्यास, क्लबमधील हॉल मोफत (उपलब्धतेनुसार) उपलब्ध करून दिला जाईल. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने, क्लब ‘आर्ट ऑफ लेटर रायटिंग’ (हस्तलिखित पत्रलेखन) स्पर्धेचे आयोजन करेल, ज्यामुळे लोकांना पुन्हा एकदा पत्रलेखनाची जुनी सुंदर परंपरा अनुभवता येईल.
क्लब टेनिस दे गॅस्पर डायस आपल्या शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ आज १ एप्रिल२०२५ रोजी करणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन माननीय राज्यपाल श्री. पी.एस. श्रीधरन पिल्लई यांच्या उपस्थितीत होईल. या महोत्सवाचा भाग म्हणून ‘मेगा नोइटे दे गास्पर’ या लोकप्रिय कार्यक्रमाची पुनरावृत्ती क्लब करणार आहे. क्लब वास्को द गामा, क्लुब नॅसिओनाल, क्लुब हार्मोनिया, बीपीएस क्लब आणि मोईरा क्लब या शतकोत्तर क्लब्स सोबत विशेष भागीदारी करून हा महोत्सव मार्च २०२६ मध्ये ‘ग्रँड क्लब डे’ सह एका मोठ्या उपक्रमाला आकार देईल आणि एप्रिलमध्ये भव्य डान्स फिनालेने त्याची समाप्ती होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.