

म्युझियम ऑफ गोवा (मोग)च्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘गोवा महोत्सवा’तील प्रदर्शनात 90 पेक्षा अधिक कलाकारांच्या 100 हून अधिक कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन 9 नोव्हेंबर ते 18 जानेवारीपर्यंत मोगच्या कलादालनात चालणार आहे.
गोव्याचा इतिहास, आंतरधर्मीय प्रथा आणि काळानुसार विकसित होत गेलेल्या परंपरा या प्रदर्शनात प्रतिबिंबित झालेल्या दिसतात. प्रदर्शनात मांडली गेलेली छायाचित्रे, इन्स्टॉलेशन, मल्टीमीडिया कलाकृती, मुलांच्या कलाकृती यामधून हा महोत्सव गोव्यातील लोकांनी स्वीकारलेल्या जीवनशैलीचा, त्यातून निर्माण झालेल्या स्मृतींचा आणि त्यांच्या ओळखीचा जणू एक आरसा आणि नकाशा बनला आहे.
या महोत्सवाबद्दल सांगताना मोगच्या संचालिका शारदा केरकर म्हणाल्या, 'मोगचा दहा वर्षांचा टप्पा साजरा करताना आम्ही अभ्यागतांना गोव्याच्या कलांकडे पहायला आणि त्यांची ओळख करून द्यायचा प्रयत्न करतो आहोत. गोव्यात साजरे होणारे सुमारे 30 विविध महोत्सव- मॅक्रो तसेच मायक्रो- या महोत्सवाचे भाग बनले आहेत. राज्याची संस्कृती आणि विपुल विविधता अनुभवण्याचा हा महोत्सव एक मार्ग असेल या संकल्पनेतून गोवा महोत्सव साजरा होत आहे.'
रामदास गडेकर, विराज नाईक, चैताली मोराजकर, हर्षदा केरकर, सिद्धेश च्यारी, सोनिया सबरवाल, आसावरी गुरव, डॅनियल डिसूजा, नलिनी अल्विनो डिसोजा या नामवंत गोमंतकीय कलाकारांच्या कलाकृती या प्रदर्शनात मांडल्या गेल्या आहेत.
मोगच्या दहा वर्षांच्या प्रवासाबद्दल बोलताना म्युझियम ऑफ गोवाचे संस्थापक आणि प्रसिद्ध कलाकार सुबोध केरकर म्हणाले, ‘भारत १.४ अब्ज लोकांचे घर आहे तरीही केवळ एक छोटासा भाग समकालीन कलेशी जोडला गेला आहे. कलेचे लोकशाहीकरण करणे आणि कला सर्वांसाठी असणे हे आज आवश्यक झाले आहे आणि या हेतूनेच मोगचा जन्म झाला आहे. कलांचे कार्य हे आपल्या आणि इतरांमध्ये असलेले द्वैत नाहीसे करणे हे आहे. कला प्रजासत्ताकात कोणतेही विभाजन नसते.'
‘फेस्टिवल ऑफ गोवा’ राज्यातील उत्सवांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकते. ख्रिसमस ट्री, नरकासुर, माटोळी वगैरेमधून समुदायाला एकत्र आणण्याची आणि त्यांच्यात कलात्मक जाणीव तयार करण्याची शक्ती कशी निर्माण होते हे हा महोत्सव सांगतो. बालकला प्रदर्शन, 'फेस्टिवल अॅज प्लेग्राउंड्स' मुलांच्या नजरेतील सर्जनशीलता आणि उत्सवांचा शोध घेते.
‘साईड बाय साईड’ हे प्रदर्शन गोव्यातील ज्ञात आणि अज्ञात उत्सवांमधून गोव्यातील समाजमन समजून घेण्याचा प्रयत्न करते. प्रशांत पंजियार, इंद्रजीत खांबे, आणि शारदा केरकर यांनी मांडलेले ‘सीन/अनसीन’ हे छायाचित्र प्रदर्शन म्हणजे दृष्यामागील दृश्यांचा शोध आहे.
गोवा महोत्सवाच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला गोव्यातील नामवंत गायिका सोनिया शिरसाट आणि लोकप्रिय स्थानिक बँड रोझ आंगोन यांनी आपल्या विशेष संगीत कार्यक्रमाने उपस्थित लोकांना रिझवले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.