
दिव्यत्व म्हणजे फक्त वेगळेपण नव्हे, तर तो आत्मविश्वासाचा तेजोमय झरा असतो. ही अनुभूती रविवारी संपलेल्या ‘पर्पल’ महोत्सवातून क्षणोक्षणी येत होती. आनंद, जोश, उत्साह आणि समतेचा संदेश देणारा हा उत्सव केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नव्हता; तर समाजाच्या प्रत्येक घटकाला एकत्र आणणारी ती भावनांची पर्वणी होती.
कला, खेळ, संगीत, संस्कृती आणि आत्मविश्वासाच्या माध्यमातून या उत्सवात दिव्यांगत्व नव्हे, ‘दिव्यत्व’ साजरे केले गेले. देशभरातील दिव्यांग इथे एकाच व्यासपीठावर आपले कलागुण सादर करताना दिसले. त्यांच्यातील आत्मविश्वास इतर सामान्यांमध्येही जगण्याची उमेद वाढवणारा ठरला.
९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या या चार दिवसांच्या कालावधीत या आंतरराष्ट्रीय महोत्सवाने गोव्याला एका मोठ्या स्तरावर नेले आहे.
सुमारे २५ हजार दिव्यांग, पालक आणि विविध संस्थांचे पदाधिकारी या महोत्सवात सहभागी झाले होते. अपंग व्यक्तींच्या क्षमतांना व्यासपीठ देणारा एक उपक्रम म्हणून सुरू झालेला गोव्यातील ‘पर्पल फेस्ट’चा प्रवास आता आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवला जाणारा महोत्सव बनून राहिला आहे.
युनिफाइड बास्केटबॉल, युनिफाइड टेबल टेनिस आणि व्हीलचेअर बास्केटबॉलसह इतर क्रीडा स्पर्धांनी आणि साहसी खेळांनी सिद्ध केले की शारीरिक अडथळे सहज दूर करता येतात.
अशा क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून दिव्यांगांतील शारिरीक क्षमतेची ‘ताकद’ दिसून आली. या महोत्सवात तंत्रज्ञान आणि समावेशक डिझाइनवरील कार्यशाळा, रोजगांरावरील अधिवेशने आणि ‘अपंगत्व कायदा’ या सत्रांनी सहभागींना आपल्या हक्कांबद्दल व्यावहारिक अंतर्दृष्टी दिली. या दिव्यांगांचे मनोरंजन करण्यासाठी बॉलीवूडमधील गायकांनी सादर केलेली गाणी स्फूर्ती देणारी होती.
दिव्यांग व्यक्ती स्कूबा डायव्हिंग किंवा पॅरासेलिंगमध्ये सहभागी होतील, अशी कल्पना कोणीही केली नव्हती. विविध साहसी जलक्रीडा प्रकारांमध्ये दिव्यांगजनांनी घेतलेला सहभाग आणि त्यांनी सादर केलेले कौशल्य पाहताना, पाण्याच्या लाटा आणि हास्याचे, आनंदाचे आणि जयजयकाराचे तरंग असा अनोखा मिलाफ अनुभवायला मिळाला. बहुतांश सहभागींसाठी, साहसी क्रीडाप्रकारात सहभागाचा पहिलाच अनुभव होता.
‘टाटा स्टील फाउंडेशन’च्या सहकार्याने आयोजित झालेले, ग्रामीण समावेशासंबंधीचे ‘पर्पल कन्व्हेन्शन’ हे महोत्सवातील आणखी एक प्रमुख आकर्षण ठरले. पंचायतींमध्ये सुलभ पायाभूत सुविधा, डिजिटल साक्षरता आणि प्रशिक्षणाची गरज वक्त्यांनी अधोरेखित केली. पर्पल मार्केटप्लेसमध्ये, अपंगत्व असलेल्या कलाकारांनी आणि उद्योजकांनी त्यांचे कार्य प्रदर्शित केले.
हस्तकला, डिजिटल कला आणि अन्न उत्पादने तयार करण्याचे हे प्रशिक्षण दिव्यांगांना ‘स्वयंपूर्ण’ बनवण्याचा एक प्रयोग होता. या महोत्सवाने भागीदारी, जागरूकता आणि सहानुभूती वाढवली आणि त्याचबरोबर समावेशकता ही आपल्या हृदयातून, घरातून आणि समुदायातून सुरू झाली पाहिजे, याची जाणीवही करून दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.