Dindi Utsav : 1909 साली गोव्यात पोर्तुगीज राजवट होती, लोटलीकर चाळीत मंदिराची स्थापना करण्यात आली; 'दिंडी उत्सवा'चे बदलते रुप

Margao Dindi Utsav 2025 : भाव तोची देव या भक्तीभावाने तेव्हा दलाल, सडेकर, बागेवाडी, कामत, नेवगी, नरगुंदकर या कुटुंबांतील वडिलधाऱ्या मंडळींनी एकत्र येऊन दिंडी उत्सव साजरा करण्याचा तेव्हा निर्णय घेतला.
Margao Dindi Utsav 2025
Margao Dindi Utsav 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

१९०९ पासून सुरू झालेल्या दिंडी उत्सवाचे हे ११६ वे वर्ष असून ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर असे सहाही दिवस हा दिंडी उत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरा केला जाणार आहे. ३ नोव्हेंबर हा दिंडी उत्सवाचा मुख्य दिवस आहे.

गत ११६ वर्षांत या दिंडी उत्सवाने अनेक बदल अनुभवले आहेत. कित्येक मठग्रामस्थांनी या दिंडी उत्सवाची जबाबदारी समर्थपणे पेलली आहे म्हणूनच सलग ११६ वर्षे हा उत्सव तेवढ्याच उत्साहाने, जोमाने व भक्तीभावाने साजरा केला जातो व त्यात गोव्यातील कानाकोपऱ्यातील भक्तगण व भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात.

जेव्हा हा दिंडी उत्सव १९०९ साली सुरू झाला तेव्हा गोव्यात पोर्तुगीज राजवट होती. त्यामुळे हा उत्सव साजरा करताना पुष्कळ त्रास सहन करावा लागत असे.

भाव तोची देव या भक्तीभावाने तेव्हा दलाल, सडेकर, बागेवाडी, कामत, नेवगी, नरगुंदकर या कुटुंबांतील वडिलधाऱ्या मंडळींनी एकत्र येऊन दिंडी उत्सव साजरा करण्याचा तेव्हा निर्णय घेतला. तेव्हा कार्तिकी एकादशीला पंढरपुरला जाणे शक्य नव्हते, म्हणूनच या लोकांनी हा उत्सव इथेच साजरा करण्याचा निर्णय घेतला.

१९०९ साली तेव्हा लोटलीकर चाळीत श्री विठ्ठल रखुमाई मंदिराची स्थापना करण्यात आली. २०१७ पर्यंत दिंडी उत्सव याच मंदिरात झाला.

२०१८ साली श्री विठ्ठल रखुमाईचे नवीन मंदिर बांधण्यात आले व दिंडी उत्सव या नूतन मंदिरातून साजरा करणे सुरू झाले. यंदा या नवीन मंदिरात दिंडी उत्सव साजरा करण्याचे आठवे वर्ष आहे.

नव्या मंदिरामुळे विश्र्वस्त मंडळाला दिंडी उत्सव जास्त आकर्षकरित्या साजरा करण्याचे बळ मिळालेले आहे. दिंडी उत्सवात श्री हरिमंदिर, कोंब येथील विठ्ठल मंदिर व दामोदर साल या तीन मंदिराचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो.

दिंडीच्या दिवशी या तीनही मंदिरात भक्त व भाविकांची देव दर्शनासाठी मोठी गर्दी असते. राज्य महोत्सवाची मान्यता मिळाल्याने आता दिंडी उत्सव केवळ मर्यादीत परिसरापुरता मर्यादित न राहता मडगाव शहरातील आके, बोर्डा या भागातही दिंडी उत्सवाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

श्री हरिमंदिर देवस्थान विश्र्वस्त मंडळ दिंडी उत्सवाचा सर्वाधिक भार उचलत असते. पूर्वी दिंडी उत्सव कीर्तन, दिंडीची शहरातून मिरवणूक व गायन बैठका या पुरताच मर्यादित होता. पण आता या उत्सवाला धार्मिक तसेच सामाजिक व सांस्कृतिक महत्व प्राप्त झाले आहे.

श्री हरिमंदिर, श्री विठ्ठल मंदिर यांच्या बरोबरीने मडगावमधील अनेक सामाजिक व सांस्कृतिक संस्था या दिंडी महोत्सवात हरिरीने भाग घेऊन विविध कार्यक्रम, स्पर्धा आयोजित करू लागले आहेत. त्यामुळे दिंडी महोत्सवाला एक वेगळेच आकर्षण प्राप्त झाले आहे.

श्री हरिमंदिर देवस्थान विश्र्वस्त मंडळाने काळाच्या बदला प्रमाणे व मानवतेची सेवा हीच ईश्वर सेवा याचे भान ठेवून विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

देवस्थानात धर्म जागरण, संस्कृती संवर्धन, मानव सेवा अशा प्रकारच्या विषयांतील उपक्रम सुरू केले आहेत. ५ वर्षांवरील मुलांसाठी संस्कार वर्ग, कर्करोगा बद्दल जागृती, दिंडी महोत्सवात मनाचे श्लोक पाठांतर तसेच चित्रकला, महिलांसाठी पाककला स्पर्धा, दिपोत्सव, भजनाचे कार्यक्रम वगैरे आयोजित करून मुलांना, युवकांना व महिलांना दिंडी महोत्सवाकडे आकर्षित करण्याचा हा एक स्त्युत्य प्रयत्न आहे असे म्हणावे लागेल.

गोव्याच्या पर्यटन खात्यातर्फे ‘एकादश तीर्थ’ यात्रा योजनेअंतर्गत मडगावातील श्री हरि मंदिराचा समावेश केला आहे.

यंदा पुणे येथील ह.भ.प. संदीपबुवा मांडके यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ भाविकांना मिळणार आहे. कोंब येथील विठ्ठल मंदिरात ह.भ.प. विनोदबुवा च्यारी यांचे कीर्तन होणार आहे. दिंडी निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

या व्यतिरिक्त सम्राट क्लब, श्री दामबाबाले घोडे, सॉलिड पार्टी ट्रस्ट, युव संजीवनी या संस्थांनी दरवर्षी प्रमाणे अनेक स्पर्धा, संगीत कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामुळे यंदाच्या दिंडी उत्सवाला गतवैभव प्राप्त होणार आहे, शिवाय दिंडी उत्सवाची नाविन्यपूर्ण दिशेने वाटचाल होत आहे असेच म्हणावे लागेल.

युवा गायक राजयोग धुरी व सौ. स्वरांगी मराठे यांचे दिंडी बैठकांतील गायन हे यंदाचे खास आकर्षण आहे. त्याच बरोबर ४ नोव्हेंबर रोजी दिंडीच्य़ा समारोप सोहळ्यात अंजली व नंदिनी गायकवाड यांचा बहारदार गाण्याचा कार्यक्रम दिंडी उत्सवाच्या उत्साहात भर घालणारा ठरेल.

मडगावच्या प्रख्यात दिंडीच्या ११६ वर्षांची वाटचालीची परिक्रमा आठवताना ज्यांनी ती जागवली, वाढवली, परंपरेची गुढी उभारली त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे व कृतज्ञतेची ओंजळ त्यांना अर्पण करावी व त्यांचे भावस्मरण करावे हे आमचे कर्तव्य ठरते. आपली परंपरा व प्रथा जपून ज्यांनी ज्यानी दिंडी उत्सव साजरा केला व करीत आहेत त्यांची या उत्सवाबद्दलची आस्था, प्रेम, प्रामाणिकपणा आताच्या पिढीला मार्गदर्शक व नक्कीच प्रेरणादायी ठरणारा.

दिंडी कार्तिक शुद्ध त्रयोदशीला का?

श्री हरि मंदिर देवस्थान समितीचे उपाध्यक्ष नीलेश कांदे सांगतात, त्याप्रमाणे पूर्वी येथील वडिलधारी माणसे पंढरपूरला एकादशीला वारी करायचे व द्वादशीला परत येऊन त्रयोदशीला इथे दिंडी साजरी करायचे. ही परंपरा व प्रथा अजूनही जपण्यात आली आहे. गत ११६ वर्षांत ही प्रथा जपलेली आहे, असे कांदे सांगतात.

दिंडीतील ग्रंथ व वीणा पूजनाचे महत्व

श्री हरि मंदिर देवस्थान समितीचे सचिव मनोहर बोरकर यांनी सांगितले की, दिंडी म्हणजे केवळ गायन, स्पर्धा व इतर कार्यक्रमां पुरती मर्यादित नसून श्री हरि मंदिरात जतन करून ठेवलेले गीता व वेद यांचे ग्रंथ व वारकऱ्यांचे प्रतीक वीणा यांचे पूजन हेही तेवढेच महत्वाचे ठरते. दिंडीच्या दिवशी या ग्रंथाचे व वीणेचे पूजन केले जाते. व पुरोहितांकरवी हे ग्रंथ डोक्यावर ठेवून श्री विठ्ठल रखुमाईच्या रथामध्ये भक्तीभावाने ठेवले जातात. या ग्रंथांचे देवस्थान तर्फे जतन करून ठेवले आहे. ही प्रथा अजूनही पाळली जाते, असे बोरकर यांनी सांगितले.

Margao Dindi Utsav 2025
Margao Dindi Mahotsav: विठ्ठल विठ्ठल!मडगावात 116 व्या दिंडी उत्सवास प्रारंभ; मंत्री कामत यांच्या हस्ते समई प्रज्वलन

भक्तांच्या आवडीनुसार कार्यक्रमांत बदल

मडगावातील दिंडी उत्सवाची ११६ वर्षांची परंपरा व प्रथा अजूनही पाळली जाते. पण दिंडी महोत्सवाला मिळालेले महत्व पाहता भक्त व लोकांच्या आवडी नुसार कार्यक्रमांमध्ये थोडाफार फेरफार करणे आम्हाला भाग आहे असे श्री हरि मंदिर देवस्थानचे अध्यक्ष सुहास कामत यांचे म्हणणे आहे.

Margao Dindi Utsav 2025
Dindi Mahotsav: टाळ-मृदुंगाचा ताल आणि विठुनामाचा गजर! खरपालात ‘दिंडी महोत्सव’ उत्साहात..

नुतन मंदिराच्या बांधकामाबद्दल त्यांनी सांगितले की १९३१ साली मंदिरासाठी जागा दिली होती, नंतर मंदिर बांधण्यासाठी वेळोवेळच्या समित्यांनी अनेक प्रयत्न केले पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. २००९ पासून मंदिराच्या समितीचे अध्यक्षपद आपण सांभाळत आहे. जेव्हा पदभार सांभाळला तेव्हा सर्वप्रथम आपण मंदिर बांधण्याचा संकल्प केला. २०१६ साली दोन कोटी रुपये खर्चून या मंदिर बांधण्याच्या प्रकल्पाची सुरवात केली व २०१८ साली मंदिर बांधून मूर्तिप्रतिष्ठापना केली. हे मंदिर बांधताना कसलाही अडथळा झाला नाही. अनेकांनी या बांधकामास सढळहस्ते मदत केली, असे कामत यांनी सांगितले.

- मंगेश रा. शे. बोरकर, मडगाव-गोवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com