Margao Dindi Utsav: 'पंढरपूरला पोर्तुगीज जायला देत नाही तर प्रत्‍यक्ष पंढरपूरच मडगावी आणायचं’, आनंद पर्वणी दिंडी महाेत्‍सव

Margao Dindi Utsav 2025: पूर्वी मडगावात काही वारकरी मंडळी पोर्तुगीज राजवटीत पंढरपूरला कार्तिकी एकादशीला जाण्‍यासाठी अंतरात विठ्ठलाची भक्‍ती ठेवून निघाले होते.
Margao Dindi History
Margao Dindi HistoryDainik Gomantak
Published on
Updated on

पूर्वी मडगावात काही वारकरी मंडळी पोर्तुगीज राजवटीत पंढरपूरला कार्तिकी एकादशीला जाण्‍यासाठी अंतरात विठ्ठलाची भक्‍ती ठेवून निघाले होते. गोव्‍याच्‍या हद्दीत त्‍यांना पाेर्तुगीज शिपायांनी अडवलं आणि पंढरपूरला जाऊ न देता परत मडगावात पाठवलं.

श्रीकृष्‍णाच्‍या राधेसारखी त्‍यांच्‍या अंतरांत पांडुरंगाची ओढ होती. कधी पंढरपूरच्‍या विठ्ठलाचं दर्शन घेईन, असे झाले होते. परत मडगावला पाठवले गेले तरी ती ओढ स्‍वस्‍थ बसू देत नव्‍हती. भक्‍ती कणाकणांत ओतप्रोत भरलेली.

भक्‍ती म्‍हणजे पिकलेले प्रेम. राधा-कृष्‍णाच्‍या ओढीनं भरून त्‍याची वाट पाही आणि श्रीकृष्‍णाची वाट पाहाण्‍यातूनच ती तृप्‍त व्‍हायची. अशीच तृप्‍ती मडगावच्‍या त्‍या वारकऱ्यांच्या अंतरंगांत बहरली.

पण ह्या परतलेल्‍या वारकऱ्यांनी निराश न होता, पाेर्तुगीज राजवटीच्‍या भयावरही मात केली. एक सुंदर कल्‍पना त्‍यांच्‍यात उगवली. भक्‍ती, प्रेम, आपुलकी, शांती, आनंद आदींतून एक सकारात्‍मक विचार आला. ‘आम्‍ही पंढरपूरच्‍या विठ्ठल रखुमाईला ह्या मठग्रामांत आणायचं’.

भक्‍तीत एक शक्‍ती असते. मग त्‍यातून क्रियाशीलता बहरते, कर्तृत्‍व खुलतं, काही नसताना प्रत्‍यक्ष विठ्ठल भेटल्‍याची तृप्‍ती ही कणाकणांत खुलते आणि मग प्राक्‍तनानुसार घडणाऱ्या एका दिव्‍य भव्‍य घटनेला दहाजणांचा हात लागतो. तो संकल्‍प सिद्धीस जातो.

एका नव्‍या उमेदीनं मन खुललं, उत्‍सवाचा उत्‍साह बहरला, कुणाची क्रियाशीलता बहरली. एक विचार सर्व मनांत, ‘पंढरपूरला पोर्तुगीज जायला देत नाही तर प्रत्‍यक्ष पंढरपूरच मडगावी आणायचं’. अंतरांत भक्‍तीला पूर आलेला आजवर या पांडुरंगाच्‍या कृपेनं जीवनांत क्रियाशीलता बहरली.

अडचणींवर मात करून अनेक कार्यांत यशप्राप्‍ती झाली. आज कृतार्थ झालो. आज विठ्ठलनामाच्‍या गजरांत,अडचणींवर मात करीत आणि दैवी गुण अंगिकारीत स्‍वत:तल्याच देवाला भेटायचे.

मडगावी दिंडी साजरी करायची. तोपर्यंत कार्तिकी एकादशी संपून वैकुंठ चतुर्दशी सुरू झाली तरी भक्‍तांना वेळ, काळ आणि तिथीचेही भान नव्‍हते.

मडगावची दिंडी हरि मंदिरांतून सुरू होते. एका सुंदर रथात विठ्ठल रखुमाई मूर्तिरूपांत असते. ते दर्शन घेतां घेतां भक्‍तीला उधाण येतं. गोवेकरांच्‍या अंगची कला खुलते. अंतरांतले अभंग कंठातून गोड आवाजांत आणि भावपूर्ण. भाव भक्‍तीचा भुकेला. मग अभंगाचे शब्द भावपूर्ण आवाजांत संगीताच्‍या गोड सुरांत आणि टाळ-मृदंगाच्‍या नादात आसमंत भारून टाकतात.

Margao Dindi History
Dindi Utsav : 1909 साली गोव्यात पोर्तुगीज राजवट होती, लोटलीकर चाळीत मंदिराची स्थापना करण्यात आली; 'दिंडी उत्सवा'चे बदलते रुप

अध्‍यात्‍म अभंगांतून आणि नामस्‍मरणांतून सहज उगवतं. मग अशा आध्‍यात्‍मिक उर्जेत स्‍वत:चं अस्‍तित्‍वही विसरणं होतं. कणाकणांतून बहरलेल्‍या भक्‍तीच्‍या उर्जेतून, कंठात नव्‍हे, काळजांत ‘विठ्ठल रखुमाई’ हे नाम उगवतं.

आध्‍यात्‍मिक शक्‍ती मग शरीरांत मावत नाही. आपोआप हातांतले मृदंग, वीणा, टाळ वाजू लागतात. पावलं तालावर नाचू लागतात. भक्‍तिरंगांत सर्व मिसळतात आणि मग ‘मी तूं पणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्‍यान’ याचा अनुभव येतो. आनंद गगनांत न मावणारा आणि सहज सोप्‍या पद्धतीने ध्‍यान ह्या अध्‍यात्‍माच्‍या अत्‍युच्‍च शिखरापर्यंत जाणारे बरेच.

Margao Dindi History
Margao Dindi Mahotsav: विठ्ठल विठ्ठल!मडगावात 116 व्या दिंडी उत्सवास प्रारंभ; मंत्री कामत यांच्या हस्ते समई प्रज्वलन

हरिमंदिरांतून दिंडी निघते, नाम गजर करीत. वाटेत भजनाच्‍या, अभंगाच्‍या बैठका एखाद्या श्रेष्‍ठ कलाकारांच्‍या, वारकऱ्यांचा वारसा सांगत नाचणारे अनेक. वातावरणंही रंगून दंग होतं. नाचत गात दिंडी श्री दामाेदर सालात येते.

तिथे एक अत्‍युत्तम सोहळा भजनाच्‍या रंगात दंग झालेल्‍यांनी प्रत्‍यक्ष अनुभवावा. मडगावचा ग्रामदेव श्री दामोदर, हरी मंदिरांतल्‍या हरीला आणि विठ्ठल मंदिरांतल्‍या विठ्ठलाला भेटण्‍याचा सोहळा. खरं तर मुख्‍यत्‍वे ह्यातून स्‍वत:मधल्‍या देवाला भेटायचं आणि प्रेमाने अनेकांना भेटायचं. उत्‍सव म्‍हणजे मानवी मूल्‍यांचा बहर. प्रेम, आनंद, शांती, आपुलकी, करुणा यांचा संगम प्रत्‍येकाच्‍या हृदयात.

- डाॅ. व्‍यंकटेश हेगडे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com