Veerabhadra: 'वीरभद्र' मराठी-कन्नड संस्कृतीचा मिलाफ

Goa Folk Culture: वीरागासे युद्धनृत्याच्या कर्नाटकी परंपरेतून बहुधा गोव्यात वीरभद्र सादरीकरणाची लोकपरंपरा निर्माण झाली असावी अस्गी शक्यता वाटते.
Veerabhadra
VeerabhadraDainik Gomantak
Published on
Updated on

वीरागासे युद्धनृत्याच्या कर्नाटकी परंपरेतून बहुधा गोव्यात वीरभद्र सादरीकरणाची लोकपरंपरा निर्माण झाली असावी अस्गी शक्यता वाटते. गोव्यात सांगे, डिचोली आणि फोंडा तालुक्यातल्या काही मोजक्याच मंदिराच्या वार्षिक उत्सवाच्या प्रसंगी वीरभद्राचे रौद्र भीषण आणि वीररसाचा आविष्कार घडवणारे हे लोकनृत्य सादर केले जाते.

भगवान शिवाचा पार्षद म्हणून वीरभद्राला भारतीय धर्म संस्कृतीत वंदनीय स्थान आहे. स्मशानात राहणाऱ्या शिवाबरोबर पार्वती विवाहबद्ध झाल्याने, दक्ष राजा नाखूष होता. जेव्हा त्याने यज्ञाचे आयोजन केले आणि सर्वाना निमंत्रित केले तेव्हा आपल्या कन्येला पार्वतीस हेतुपुरस्सर निमंत्रण देण्याचे टाळले. परंतु असे असताना पार्वती यज्ञकार्यास उपस्थित राहिली असता, दक्षाने तिला अपमानित केले.

त्यावेळी पार्वतीने धगधगत्या यज्ञकुंडात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. क्रोधीत झालेल्या शिवाने आपल्या जटा आपटल्यावर त्यावेळी वीरभद्राचा जन्म झाला. शिवाच्या आज्ञेनुसार त्याने दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करून दक्षाचे मस्तक तोडले. तेव्हापासून रिपुसंहारक म्हणून वीरभद्राला स्थान प्राप्त झाले. त्याच्या अष्टभुज आणि रौद्रभीषण स्वरूपातल्या मूर्तीची पूजा करण्याची परंपरा निर्माण झाली.

मुंबईजवळच्या घारापुरी त्याचप्रमाणे औरंगाबादजवळील वेरुळच्या लेण्यात मूर्ती आहेत. उत्तर कन्नड आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यात वीरभद्राचे स्वतंत्ररीत्या त्याचप्रमाणे परिवार दैवत म्हणून पूजा करण्याचे मोठे प्रस्थ आहे. वीरभद्राच्या अष्टभुज मूर्ती इथे पाहायला मिळतात.

कर्नाटकासारख्या गोव्यातल्या मंदिरात वीरभद्राच्या मूर्ती नसल्या तरी उत्सवाप्रसंगी वीरभद्राचे युद्ध नृत्य साकारण्याची परंपरा आहे. सांगे, डिचोलीसारख्या ठिकाणी गुढी पाडव्याच्या पूर्वरात्रीला तर फोंडा, बोरीत हनुमान जयंतीला तर फोंडा महालात पौषातल्या धालोत्सवाच्या समारोपाला वीरभद्राचे युद्ध नृत्य सादर केले जाते.

Veerabhadra
Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा वाढला! पारा 34 अंशांवर, घामाच्या धारांनी गोवेकर हैराण

गोव्यात ठिकठिकाणी वीरभद्र युद्ध नृत्याची जी परंपरा प्रचलित आहे ती डिचोलीतल्या कारापूरच्या विठ्ठलमंदिराच्या चैत्र पौर्णिमेच्या उत्सवातून तेथे गेली असण्याची शक्यता आहे. सुमारे सहाशे वर्षांचा इतिहास असलेले वाळवंटीच्या उजव्या तीरावरचे श्रीविठ्ठल मंदीर जेव्हा कारापूरच्या मारुती गडावरती आले तेव्हा तेथील चैत्र पौर्णिमेच्या उत्सवात वीरभद्राच्या नृत्याचे सादरीकरण आकर्षण बिंदू ठरले.

रामनवमीनंतर हनुमान जयंतीपर्यंत होणाऱ्या चैत्रोत्सवात प्रत्येक रात्री दशावतारी लोकनाट्याचे सादरीकरण होते. शेवटच्या रात्री नाटकांनंतर दक्ष आख्यान सुरू होते, तेव्हाच उपस्थित लोकांची चित्तथरारक रौद्रभीषण अशा वीरभद्राचे युद्धनृत्य पाहण्याची उत्कंठा शिगेला पोहोचते. वीरभद्राचे चैत्र पौर्णिमेच्या उत्सवात आगमन होऊन शस्त्रसज्ज अशा वीरभद्राचे नृत्य होते.

पारंपरिक वाद्यांनी निर्माण केलेल्या लोकसंगीताच्या माध्यमातून वीररसाची निर्मिती होते आणि दोन्ही हाती नग्न तलवारी धारण केलेला आणि त्याच्या रौद्रभीषण स्वरूपाला साजेल अशी वेशभूषा, रंगभूषा केलेला वीरभद्र पारंपरिक पदन्यासावरती युद्धनृत्य पेश करतो. चर्मवाद्याच्या ठेक्यावरती मध्यरात्रीला जेव्हा वीरश्री संचारलेला वीरभद्र विठ्ठल मंदिराच्या डाव्या बाजूला प्रवेश करतो तेव्हा झोपी गेलेले खडबडून जागे होऊन वीरभद्राचे थरारक नृत्य साऱ्या चित्तवृत्ती एकवटून पाहतात.

श्रीविठ्ठल रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्या सुबक पाषाणी मूर्तींनी समृद्ध असलेले हे कारापुरातले मंदिर, आज प्रतिपंढरपुराच्या लौकिकास पात्र ठरलेले आहे. परंतु असे असले तरी त्याचे स्वरूप ‘कानडा हो विठ्ठलु! कर्नाटकु!’ असेच आहे. हंपी येथील विजयनगर साम्राज्यातली श्रीविठ्ठल भक्तीची परंपरा केळ घाटमार्गाच्या पायथ्याशी असलेल्या कृष्णापूर, करंझोळ मोर्ले, पंढरिणी येथून कारापूरच्या विठ्ठलापुरात पोहोचली की आषाढी कार्तिकीच्या एकादशीबरोबर वारकऱ्यांनी पंढरपुराहून इथे आणली हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे. परंतु असे असले तरी वैष्णव, शैव संप्रदायाच्या समन्वयाचे प्रतीक असणाऱ्या श्रीविठ्ठलाच्या चैत्र पौर्णिमेच्या उत्सवात शिवगणातल्या वीरभद्राचे युद्ध नृत्य वेगळीच उंची प्रदान करते.

‘कैलासवळिगे वीरभद्र आण्णा.... हा उदो’. असे म्हणत महाप्रतापी पार्वतीपुत्र म्हणत वीरभद्राचे सादरीकरण करणाऱ्या नर्तकाला प्रोत्साहन दिले जाते. कन्नड भाषेतील विविध विशेषणांचा केला जाणारा उल्लेख वीरभद्राची कन्नड संस्कृतीतील यक्षगानाला साजेल अशी वेशभूषा आणि एकंदर रंगकाम या साऱ्यातून कानडी संस्कृतीचा आविष्कार अनुभवायला मिळतो. सत्तरी आणि डिचोली महालांच्या मध्यभागी आणि जलमार्गाने युक्त वाळवंटीच्या तीरावरती चोर्ला घाट, रामघाट आणि केळघाटाकडे जाणाऱ्या मार्गाजवळ वसलेल्या विठ्ठल मंदिरातले हे युद्धनृत्य आपल्यातल्या मूलभूत अशा कानडीपणाचेच दर्शन घडवत असते.

गोव्याच्या एकंदर संस्कृतीवरती विविध देश, धर्माच्या प्रवाहांचे प्रभाव जाणवत असले तरी इथल्या सण उत्सवावरती मराठी, कोकणी आणि कानडी भाषा भगिनींचा प्रभाव वीरभद्राच्या युद्धनृत्यातून प्रकर्षाने अभिव्यक्त होतो. कानडी संस्कृतीतून कारापुरात स्थिरावलेले वीरभद्राचे युद्धनृत्य आपले कानडीपण प्रकट करते.

Veerabhadra
Goa Crime: टँकर चालकावर जुन्या मालकाकडून खुनी हल्ला! पणजीतील प्रकार; संशयित समीर खानला अटक

कर्नाटक राज्यातली यक्षगान आणि कोकणातली दशावतारी लोकनाट्याच्या सादरीकरणाचा प्रभाव वीरभद्राच्या एकंदर नृत्य सादरीकरणात पाहायला मिळतो. वीरभद्राची भूमिका साकारणाऱ्या लोककलाकाराचे युद्धनृत्य करण्यासाठी प्रवृत्त व्हावे म्हणून त्याच्या सभोवताली असणारे साखळी कारापूर परिसरातील लोक कन्नड भाषेत प्रचलित असलेल्या विविध विशेषणांचा उपयोग करून आवाहन करतात.

चैत्र पौर्णिमेच्या उत्सवात कोकणातल्या मोचेमाड गावातल्या दशावतारी मोचेमाडकर नाट्यमंडळीचे लोककलाकार अंतिम दिवशी शिवपुराणातील दक्ष आख्यानावरती नाटकाचे सादरीकरण करतात आणि देवी पार्वती सती गेल्यावर क्रोधीत शंकराची रौद्र भीषण शक्ती वीरभद्राच्या रूपात पारंपरिक स्थळी प्रकट होते.

नाटकावरती दशावतारी लोकनाट्य तर वीरभद्राच्या सादरीकरणात यक्षगान लोकपरंपरेचा विलोभनीय समन्वय युद्ध नृत्यातून प्रकट होतो. यावेळी भाविकांच्या विलक्षण गर्दीत आणि मध्यरात्रीला आगीचा भडका उडवून आणि त्याला साजेल असे पार्श्‍वसंगीत निर्माण करून वीरभद्राचे सादरीकरण मराठी कन्नड संस्कृतीचा मिलाफ घडवत असते.

कर्नाटकातल्या वीरशैव पंथीयांत विजयादशमीच्या पर्वकाळात त्याचप्रमाणे श्रावण कार्तिकात वीरागासे लोकनृत्य जंगमाकडून सादर केले जाते. गळ्यात रुद्राक्षमाळा, नागभूषणे, नरमुंडमाळेचे प्रतीकात्मक रूप आणि वीरभद्राच्या रौद्रभीषणतेला साजेल अशी रंगरंगोटी करून लोकवाद्यांच्या संगीतावरती लोककलाकार दक्ष आख्यानावरती हे नृत्य पेश करतो. वीरागासे युद्धनृत्याच्या कर्नाटकी परंपरेतून बहुधा गोव्यात वीरभद्र सादरीकरणाची लोकपरंपरा निर्माण झाली असावी अस्गी शक्यता वाटते.

गोव्यात सांगे, डिचोली आणि फोंडा तालुक्यातल्या काही मोजक्याच मंदिराच्या वार्षिक उत्सवाच्या प्रसंगी वीरभद्राचे रौद्र भीषण आणि वीररसाचा आविष्कार घडवणारे हे लोकनृत्य सादर केले जाते. डिचोली शहरात येणाऱ्या बोर्डे येथील महामाया देवस्थानात तर आतील पेठेत श्रीशांतादुर्गा देवीच्या मठात वीरभद्राचे सादरीकरण स्वतंत्ररीत्या होते.

शिरोड्यात हनुमान जयंतीच्या दुसऱ्या रात्री महामायेच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराकडून सुरू झालेले नृत्य हनुमान मंदिरापर्यंत जोशपूर्ण होते. कारापुरातल्या विठ्ठलापूर येथील मंदिर परिसरात वीरभद्राचे सादरीकरण होते. गोव्यातल्या लोकसंस्कृतीला वीरभद्र नृत्याने समृद्ध केले आहे. आपली लोकसंस्कृती देशाच्या इतिहास भूगोल आणि जनतेतील वैविध्यामुळे आकारास आली, त्याची प्रचिती वीरभद्रयुद्ध नृत्यातून प्रकर्षाने येते.

राजेंद्र पां. केरकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com