गावातली जागा हेरून, साधे नेपथ्य - वादक बसवून 'कार्निव्हल'मध्ये रंगणाऱ्या लघुनाटीका! गोव्याची समृद्ध नाट्यपरंपरा 'जमनीवेले खेळ'

Goa carnival village free form drama: कार्निव्हलची मौज गोव्यातील ग्रामीण भागात, विशेषतः सासष्टी तालुक्यामधील गावांमध्ये वेगळी असते.‌
Goa Carnival Jaminivele Khel
Goa Carnival Jaminivele KhelDainik Gomantak
Published on
Updated on

जमिनीवरील खेळ हे आपल्याकडील खुल्या स्वरूपाचे (free form) लोकनाट्य आहे असे म्हणायला हरकत नाही. फोनवर एका खेळाच्या दिग्दर्शिकेची मुलाखत घेत असताना (तिचा खेळ चालू होता ते मला ठाऊक नव्हते) ती सहजपणे मला ‘मात्सो राव’ म्हणत हातात मोबाईल तसाच धरून रंगभूमीवर गेली व आपली दोन वाक्ये म्हणून पुन्हा परतली आणि मला म्हणाली, ‘आता उलय...!’

कार्निव्हलची मौज गोव्यातील ग्रामीण भागात, विशेषतः सासष्टी तालुक्यामधील गावांमध्ये वेगळी असते.‌ गोव्यातील शहरांमध्ये कार्निव्हलच्या निमित्ताने आयोजित होणाऱ्या चित्ररथांच्या

मिरवणुकीतील रंगीबेरंगी मौज पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी उसळते तर गावातील कार्निव्हलमध्ये तिथे पाच दिवस चालणाऱ्या ‘जमिनीवरील खेळा’ची हवा असते. या जमिनीवरील खेळात सुमारे अर्ध्या तासांच्या तीन लघुनाटीका, ज्यांना ‘स्टोरी’ म्हटले जाते, एका मागोमाग एक, सादर होतात.‌

सामाजिक किंवा कौटुंबिक आशय, विनोद आणि गाणी (एका खेळात किमान पाच ते सहा गाणी असायलाच हवीत, असा संकेत आहे.) यातून नटलेल्या या लघुनाटिका स्थानिक प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतात.‌ 

या नाटिकांसाठी कुठल्याही प्रकारचा रंगमंच उभारलेला जात नाही तर गावातील एखादी सोईस्कर जागा हेरून तिथे आवश्यक असलेल्या फुटकळ नेपथ्याची आणि वादकांच्या जागेची मांडामांड केली जाते, आजूबाजूला लोक जमायला सुरुवात होते आणि ‘जमिनीवरील खेळा’ची सुरुवात होते.

पूर्वीच्या काळात ‘जमिनीवरील खेळां’ना स्थानिक लोकांचे आर्थिक पाठबळ लाभायचे आणि जमिनीवर खेळ करणारे कलाकार एका गावातून दुसऱ्या गावात फिरत राहायचे. मात्र आता शासन (गोवा तियात्र अकादमी मार्फत) जमिनीवरील खेळ सादर करणाऱ्या संस्थाना आर्थिक सहाय्य पुरवते.

जमिनीवरील खेळाची परंपरा अशाप्रकारे अजूनही चालू राहिलेली आहे. यंदा तियात्र अकादमीने जमिनीवरील खेळ‌ सादर करत असलेल्या सुमारे ३५ संस्थांना आपले आर्थिक पाठबळ दिले आहे.  प्रत्येक ग्रुप, प्रत्येकी सुमारे ५ ते ६  जमिनीवरील खेळांचे शो, त्यांना ठरवून दिलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी, सादर करत जातो. साधारण सकाळी ९ वाजता त्यांच्या सादरीकरणाला सुरुवात होते. रात्री ९ ते १० वाजेपर्यंत त्यांचे शो चालतात. 

मीनाक्षी चौगुले

मीनाक्षी चौगुले ही ‘जमिनीवरील खेळां’ची निर्माती आणि दिग्दर्शिका आहे. आगशी गावातील मीनाक्षीला ती सातवीत असतानाच गावातील तियात्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि तियात्र कलाकार बनली. गेली कित्येक वर्षे ती खेळ तियात्र लिहून सादर करत आली आहे. यावर्षी देव घोडटा, तूच मोडटा आणि किद्याक रोडटा या तीन लघुनाटीका ती आपल्या जमिनीवरील खेळात सादर करते आहे.‌‌

तिच्या ग्रुपमध्ये वादक धरून सुमारे १५ कलाकार आहेत.‌ कार्निव्हलच्या दिवसात सादर होणाऱ्या या खेळांसाठी सुमारे महिनाभर ती तयारी करत असते. ती म्हणते, अजूनही जमिनीवरील खेळांना गावात चांगला प्रतिसाद असतो. लोक अगदी समोर काही फूट अंतरावर उभे किंवा बसलेले असतात त्यामुळे त्यांच्या प्रतिसादाचे स्वरूप स्पष्ट कळते आणि सादरीकरणाची मजा वाढते. 

Goa Carnival Jaminivele Khel
Konkani Drama: गेल्या 50 वर्षांत नाट्यक्षेत्राने घेतलेली हनुमानउडी अधोरेखित होते! सुवर्णमहोत्सवी कोकणी-नाट्यस्पर्धेचे कवित्व

मेलिशा कॉस्ता

तुजे कोस्ट, विसोरचोना आणि जीवित भोर ही मेलिशा कॉस्ता सादर करत असलेल्या ‘स्टोरीं’ची नावे आहेत.‌ त्यापैकी दोन कथा कौटुंबिक आशयावर आधारित आहेत. त्याग, बंधू-भगिनी प्रेम हे त्यातील घटक आहेत तर तिसरी ‘स्टोरी’ चक्क ‘तियात्र’ या विषयावर आधारलेली आहे.

तियात्र निर्मिती होताना जे विनोदी प्रसंग साधारणत: घडतात त्यावर ती बेतलेली आहे.‌ मेलीशाचा ग्रुप ३ वादक धरून ९ लोकांचा आहे.  तीन स्टोरी असलेला शो तयार करण्यासाठी किमान एक महिना तयारी करावी लागतेच, असे मेलिशा म्हणते. तालमीसाठी सारेजण सातत्याने एकत्र जमणे कठीणच असते, असे तिचेही म्हणणे आहे.

Goa Carnival Jaminivele Khel
Goa Culture: गोव्यातील पारंपरिक लोकवादनाचा ठेवा संवर्धित करण्यासाठी कोणी तारणहार सापडेल का?

अँथनी फर्नांडिस

अँथनी फर्नांडिसचे आई-वडील जमिनीवरील खेळ सादर करायचे. अँथनी रियल इस्टेटच्या व्यवसायात आहे. मात्र आपल्या आई-वडिलांची परंपरा चालू ठेवण्यासाठी तो वर्षातील पाच दिवस बाजूला काढून ठेवतो आणि आपले खेळ गावागावात करतो.‌ तो व्यावसायिक तियात्रांमध्ये काम करत नाही मात्र गेली पाच वर्षे तो ‘जमिनीवरील खेळ’ लिहून सादर करत आला आहे.

तो म्हणतो,‘तो या क्षेत्रात नवीन असल्याकारणाने खेळासाठी कलाकार जमवणे त्याच्यासाठी थोडी कठीण बाब असते. अनुभवी कलाकार मिळणे कठीण असते आणि नवीन कलाकारांना घेऊन खेळ तियात्र बसवणे ही किचकट बाब असते. मात्र जमिनीवरील खेळाची परंपरा आता त्याच्या रक्तात भिनली आहे. ‘शिदूका रावता, तान भागोयता आणि पोडला ते खांयात’ या तीन लघु नाटिका तो आपल्या खेळात सादर करतो आहे. हल्लीची तरुण पिढी ‘जमिनीवरील खेळ’ पाहण्यासाठी उत्सुक नाही, ही खंत तो बोलून दाखवतो. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com