

US Classified Military Info leak 2026: अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने लष्कराचे माजी लेफ्टनंट जनरल ब्रेट सिल्विया यांच्यावर प्रसारमाध्यमांना अत्यंत गोपनीय लष्करी माहिती पुरवल्याचा गंभीर आरोप केला. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी सिल्विया यांना उच्चस्तरीय लष्करी पदावरुन हटवल्यानंतर काही वेळातच हे आरोप समोर आले. सिल्विया हे 'जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ'मध्ये रणनीती, नियोजन आणि धोरण प्रमुख म्हणून कार्यरत होते.
हे पद अमेरिकन सैन्य नेतृत्व आणि राष्ट्राध्यक्षांसाठी लष्करी योजना तयार करणे तसेच समन्वय साधण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पेंटागनच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सिल्विया यांच्या हकालपट्टीचा थेट संबंध एका सुरु असलेल्या तपासाशी आहे, ज्यामध्ये त्यांच्यावर इराण (Iran) युद्ध, रशिया-युक्रेन संघर्ष आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती मीडियाला लीक केल्याचा संशय आहे.
तपासादरम्यान कथित माहिती लीक प्रकरणात ब्रेट सिल्विया तब्बल तीन पॉलीग्राफ चाचण्यांमध्ये अपयशी ठरल्याची माहिती समोर आली. पेंटागनचे प्रवक्ते शॉन पारनेल यांनी स्पष्ट केले की, गोपनीय माहितीच्या सुरक्षेसाठी विभागाने त्यांच्यावर कठोर कारवाई केली असून पुढील संभाव्य कायदेशीर कारवाईसाठी हे प्रकरण थेट न्याय विभागाकडे सोपवण्यात आले. या कारवाईबाबत विचारले असता, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रशासनाकडून संवेदनशील माहिती लीक करणाऱ्यांचा शोध घेण्याची मोहीम तीव्र करण्यात आल्याची माहिती दिली.
ब्रेट सिल्विया यांचा लष्कर सेवेचा तब्बल 32 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांनी केंटकी येथील 101व्या एअरबोर्न डिव्हिजनचे नेतृत्वही केले. त्यांच्या कार्यकाळात त्यांना सहा 'ब्रॉन्झ स्टार मेडल' आणि युद्धादरम्यान जखमी झाल्याबद्दल 'पर्पल हार्ट' सन्मानाने गौरवण्यात आले. दरम्यान, संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्या कार्यकाळात माहिती लीकप्रकरणी झालेली ही पहिली कारवाई नसून, याआधीही त्यांनी आपल्या तीन जवळच्या सहकाऱ्यांना अशाच आरोपांवरुन हटवले. या घटनेनंतर पेंटागनने वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारांवरही कठोर निर्बंध लादले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.