

Donald Trump Iran Strait of Hormuz Warning: अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामाची चर्चा फिस्कटल्यानंतर जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून (भारतीय वेळेनुसार सोमवारी सायंकाळी 7:30 वाजता) इराणच्या सर्व बंदरांची कडक नाकेबंदी करण्याची घोषणा केली. 'यूएस सेंट्रल कमांड'ने यास दुजोरा दिला असून इराणच्या बंदरांमध्ये प्रवेश करणाऱ्या किंवा तिथून बाहेर पडणाऱ्या सर्व जहाजांना अमेरिकन नौदलाद्वारे रोखले जाणार आहे.
पाकिस्तानमध्ये (Pakistan) झालेली 21 तासांची प्रदीर्घ शांतता चर्चा अपयशी ठरल्यानंतर ट्रम्प यांनी हे आक्रमक पाऊल उचलले. विशेष म्हणजे, या नाकेबंदीची कारवाई सर्व देशांच्या जहाजांवर निपक्षपातीपणे केली जाईल, असा इशाराही अमेरिकेने दिला.
एवढचं नाहीतर ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे इराणवर गंभीर आरोप केले. इराण 'होर्मुझच्या सामुद्रधुनी'वर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असून तिथून जाणाऱ्या जहाजांकडून बेकायदेशीर टोल वसूल करण्याची आणि सुरुंग पेरण्याची योजना आखत असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. "हे जागतिक स्तरावर केलेले खंडणीखोर कृत्य असून अमेरिका अशा दबावापुढे कधीही झुकणार नाही," अशा कडक शब्दांत ट्रम्प यांनी इराणला सुनावले.
जे देश किंवा जहाजे इराणला बेकायदेशीर टोल देतील, त्यांना आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात सुरक्षित प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. मात्र, 'सेंटकॉम'ने स्पष्ट केले की, जे जहाज इराणच्या बंदरांचा वापर करणार नाहीत, त्यांना या सामुद्रधुनीतून प्रवास करण्याची परवानगी असेल.
या संघर्षाचा केंद्रबिंदू ठरलेली 'होर्मुझची सामुद्रधुनी' ही जागतिक ऊर्जा पुरवठ्याची जीवनवाहिनी मानली जाते. जगातील सुमारे 20 टक्के तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा याच मार्गावरुन होतो. 28 फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या या भीषण युद्धात आतापर्यंत इराणमध्ये 3000, लेबनॉनमध्ये 2000 आणि इतर देशांत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. अमेरिकेच्या या नाकेबंदीला इराणनेही जशास तसे उत्तर दिले.
इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड'ने म्हटले की, होर्मुझची सामुद्रधुनी इराणच्या पूर्ण नियंत्रणात असून अमेरिकेच्या लष्करी जहाजांना जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. इराणचे संसदीय अध्यक्ष मोहम्मद बागेर कालीबाफ यांनी थेट इशारा दिला की, "जर तुम्ही लढणार असाल, तर आम्हीही लढायला तयार आहोत."
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी वॉशिंग्टनची भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, जोपर्यंत इराण (Iran) अण्वस्त्रे बनवणार नाही याची ठोस खात्री देत नाही, तोपर्यंत अमेरिका मागे हटणार नाही. सध्या लागू असलेला युद्धविराम 22 एप्रिल रोजी संपणार असून त्यानंतर या युद्धाचे स्वरुप काय असेल, याबाबत जगभरात चिंतेचे वातावरण आहे. पाकिस्तानमधील चर्चा निष्फळ ठरल्याने आणि ट्रम्प यांनी इराणच्या नागरी पायाभूत सुविधांवर हल्ले करण्याची धमकी दिल्याने कच्च्या तेलाच्या किमती आणि जागतिक बाजारपेठेवर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.